Monday, November 12, 2012

परदेशी गिर्यारोहक स्टीव

आल्प्सपासून हिमालयापर्यंत वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करणारे परदेशी गिर्यारोहक बहुधा वर्षभर गिर्यारोहणातच रमत असावेत असं आपल्याला वाटेल. एकट्याने आणि तेही कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट के टू हे कठीण दुसऱ्या क्रमांकांचे शिखर यासह सुमारे पाच दशकं गिर्यारोहणात रमलेल्या स्टीव स्वेन्सन यांच्याबद्दल असाच समज होऊ शकला असता. मात्र स्टीव यांनी आपली हयात इंजिनीअर म्हणून नोकरी करण्यात घालवली आणि ते करतानाच त्यांनी सर्वांपेक्षा काकणभर जास्त आव्हानं पेलतच गिर्यारोहण करायचं हे ब्रीद कायम ठेवलं. सासेर कांगरी या अगदी आताआतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या शिखरावर त्यांनी केलेलं आरोहण हे अशाच दिव्यातून पार झालेलं. त्याचीच कहाणी ऐकवायला स्टीव मुंबईत आले होते. 

मार्क रीचीच्या नेतृत्वाखाली स्टीव यांनी २००९ मध्ये काराकोरम रांगांमधील ७५१८ मीटरचं सासेर कांगरी २ 'हे शिखर काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ऑगस्ट २०११मध्ये मार्क स्टीव आणि फ्रेडी विल्किन्सन अशी त्रयी सासेर कांगरी काबीज करण्यासाठी निघाली. या मोहिमेत स्टीव यांनी कृत्रिम प्राणवायू तर घेतला नव्हताच ,पण बिव्हॉकिंग हे अचाट तंत्रही वापरलं. अत्यंत अरुंद कड्यांवर दोरांनी तंबू बांधून स्वतःला जवळपास लटकवून घेत रात्रीचा विश्राम करायचा आणि पुन्हा आरोहण सुरू करायचं. हे तंत्र रशियन आरोहकांकडून आपण शिकलो आणि त्यात थोडे बदल केल्याचं स्टीव सांगतात. या मोहिमेत शिखरचढाईपासूनच स्टीवना सर्दीखोकल्याचा प्रचंड त्रास जाणवत होता. उतरताना भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरनेच त्यांची सुटका केली. दुखणं अंगावर काढण्याचा निर्णय कदाचित महागही पडला असता. पण त्यावर स्टीव म्हणतात , ' आपलं शरीर दरवेळी आपल्याशी बोलतं आणि त्यामुळेच आणखी ताण ते सहन करू शकेल असं मला वाटत होतं. दरवेळी कृत्रिम प्राणवायूशिवाय जाण्याचा स्टीव यांचा निर्णयही अशाच कणखरपणाचा भाग असतो. कृत्रिम प्राणवायू घेणं म्हणजे एखाद्या सायकलपटूने परफॉर्मन्ससाठी उत्तेजक पदार्थ घेण्यासारखं आहे असं थेट भाष्यच स्टीव करतात. अर्थात कृत्रिम प्राणवायू वापरणाऱ्यांवर टीका करायची नाही असंही सांगतात. साहसाचं असं वेड ल्यालेल्या स्टीवना त्यांची पत्नी नेहमी बजावून सांगते , ' यू हॅव टू कम बॅक अलाइव्ह अदरवाइज आय वुईल कील यू...! 

संवेदनशून्य विक्रमांवर स्टीव तीव्र नाराजी व्यक्त करतात. गिर्यारोहणात व्यापारीकरण आलंय त्यालाही माझा विरोध नाही. पण शिखरमाथा गाठायचा हेच उद्दिष्ट आणि मग वाटेत एखादा मरणप्राय गिर्यारोहक आला तरी त्याला मदतही करायची नाही या अपप्रवृत्ती मात्र मन विषण्ण करतात ', असं मत ते नोंदवतात. दोन्ही पाय गमावून एव्हरेस्ट सर करणारा मार्क इंग्लिस यालाही शिखरचढाईच्या अंतिम टप्प्यात नेमक्या याच प्रवृत्तींमुळे टीकेच्या मोहोळाला सामोरं जावं लागलं होतं. एकमेकांना बरोबर घेऊन जाणं हा खरंतर गिर्यारोहणाचा पाया. शिवाय रौद्रभीषण निसर्ग काय चमत्कार दाखवेल ते कधीच सांगता येत नाही. पण विक्रमांची नशा डोक्यात शिरली की शिखरमाथा तेवढा दिसतो पायाखालची जमीन दिसत नाही. अनुभवी स्टीवची चिंता त्यामुळेच महत्त्वाची ठरते. 

No comments:

Post a Comment