Saturday, June 1, 2024

कुरवंडे घाटातील थरारक उतरण

 





             बोरघाट ते उंबरखिंड व्हाया कुरवंडेघाट

खोपोलीतल्या ट्रेकर ग्रुपने आयोजित केलेल्या या ट्रेकची माहिती मिळाली. खंडाळ्यातील मस्त थंडीत व धुक्यात हा ट्रेक करण्यास मिळणार असल्याने मित्रांना तयार केले. या ट्रेकमध्ये इतिहासाच्या काही गोष्टी पाहवयास मिळणार होत्या आणि बोरघाटतून जुन्या पायवाटेने  चढणार होतो व कुरवंडे घाटाने उंबरखिंडीत उतरणार असल्याने दोन्ही घाट जवळून पाहता येणार होते.

सकाळी खोपोलीतील गगणगिरी महाराजांच्या मठाच्या शेजारी वेगवेगळ्या भागातून आलेले ट्रेकर जमले, ओळख परेड झाल्यावर ट्रेकसंबंधी सुचना देण्यात आल्या. शिवगर्जना देऊन ट्रेकला छान वातावरणात सुरुवात केली. बोरघाटातील पाऊल वाटेवर खोदलेल्या पाय-या चढव्या लागल्या. थंड वातावरणात ताज्या दमात पटापट चालत पुढे दोन तीन रॉकपॅच चढून गेल्यावर चहानाष्टा केला. 

पोटात भर पडल्याने ताकद आल्यासारखे सर्व ट्रेकर जोमात चढू लागले. काही भाग चढून गेल्यावर आम्ही मंकी हिल येथे पोहचलो. तेथून पुढे काही अंतर रेल्वेमार्गावरून चालवे लागल्याने सुरक्षितपणे तो रेल्वे मार्ग ओलांडला. पुन्हा पाऊलवाटेने चालण्यास सुरुवात केली. उभी चढ चढत बोरांच्या झाडांमधून वाट काढीत खोपोली ते खंडाळा या रस्त्याला लागलो.बोरघाट बरासा चढून आलो होतो. थोडी विश्रांती घेऊन रस्त्याने खंडाळ्याच्या दिशेने पादक्रमण सुरु केले.सह्याद्री डोंगरामध्ये असलेल्या बोरघाटाला आता ’खंडाळा घाट’ बोलले जाते. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना हा घाट पाहिला होता. पण हा घाट पायी चढलो होतो यावर विश्वास बसत नव्हता. विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा घाट पाहता आला.

खंडाळा तेथील राजमाची पॉइंटहून रस्त्याने चालतचालत टाटा पावर प्लांटला पोहचलो. रस्त्यावर चालावे लागल्याने हा प्रवास कंटाळवाणा झाला. दुपारची वेळ असल्याने खूप गरम होत होते. प्लांटमधून पाणी भरून घेतले व पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.उन्हं चढली होती.जंगलातून आता बाहेर पठारावर आलो होतो.येथे खंडाळा घाटातील नवीन बोगद्याचे काम सुरु आहे.जेवणाची वेळ झाल्याने जवळ एका मोठ्या झाडाखाली जेवण केले.थोडीशी विश्रांती घेतली.   

नागफणीच्या पदरात येताच खाली उतरणारी वाट दृष्टीस पडली. कोकणात उभेच्या उभा उतरणारा हाच कुरवंडा घाट. आता कुरवंडे गावाला मागे टाकून पुढे कुरवंडे घाट उतरण्यास सुरुवात केली. सरळसोट उतार, बाजुला खोळ दरी,वाटेवर बारीक खडीवरून दरीत घसरण्याची भिती आणि टोक्यावर तापलेली उन्हं अशा कठीण परिस्थितीत सावकाश ठराविक अंतर ठेवून उतरत  होतो. बोरघाट चढण्यास त्रास झाला नाही पण कुरवंडे घाट उरण्यास खूप त्रास झाला. काही वर्षांपूर्वी हा ऐतिहासिक घाट कोकणातून घाटावर जाणारी पाईप लाईन टाकण्यासाठी फोडून काढलाय.त्यावरुनच आपल्याला उतरावे लागते. सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आम्ही  चावणी गावापाशी आलो.साधारण कुरवंडे पासून दोन तासात आम्ही चावणी या घाटाच्या पायथ्याशी असणा-या गावात येऊन पोहोचलो. चावणी हा शब्द कदाचित छावणी या शब्दावरून आला असावा असे वाटते. चावणी गावात जाण्यासाठी अंबा नदीचे पात्र ओलांडावे लागले. पुढे चावणी गावात पोहोचल्यावर इतिहासाचा मागोवा घेत एका शौर्याचा देदीप्यमान वारसा असलेल्या स्मारकाचे दर्शन घेऊन मन कृतकृत्य झाले.

शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता.अशा या ऐतिहासिक उंबरखिंडीला भेट देण्याची आणि तो प्रदेश स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहण्याचा योग जुळून आल्याने हा प्रवास अविस्मरणीय प्रवास झाला.              

No comments:

Post a Comment