Saturday, June 1, 2024

वैभवशाली सुवर्णदुर्गाची सफर

 




  मराठी आरमारी इतिहासाचा मानबिंदू 'सुवर्णदुर्ग' 



कोकणातील सुवर्णदुर्ग महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे.

स्वराज्याच्या आरमाराचे वैभव असलेला व सागरी लाटांशी झुंजत उभ्या असलेला दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग आहे.महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला आहे


सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किना-यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड या तीन उपदुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे.कनकदुर्गाला वळसा घालून एका छोट्या खडकाळ टापूला बगल देऊन बोट वायव्येला सुवर्णदुर्गाकडे निघते.उजवीकडे आपल्याला कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा किल्ल्याची तटबंदी दिसत राहते. बोटीने किल्ल्यापर्यंतचा प्रवास १.५ किलोमीटर लांब आणि अंदाजे २० मिनिटांचा होतो. समुद्राचे पाणी तसे शांत असल्याने आमची बोट अलगद पुढं जात होती. आता सुवर्णदुर्गाची तटबंदी स्पष्ट दिसू लागली.आपली बोट दुर्गाच्या उत्तर पूर्व दिशेला असलेल्या वाळूच्या पुळणीवर जाऊन थांबते.


हा किल्ला साधारणतः आठ एकर जागेत पसरलेला आहे.  समुद्रसपाटीच्या पातळीवर अगदी सपाट अशा खडकावर मधल्या उंचवट्याचा खडक तासून, त्याच्या माथ्यावर दगडी चिरे बसवून हा किल्ला बांधलेला आहे. अखंड तटबंदी बांधलेल्या या किल्ल्यास खूप बुरुज व फक्त दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पूर्व दिशेला मुख्य महादरवाजा आहे पण तो सहज दिसत नाही.शिवकालीन दुर्गबांधणीचे हे वैशिष्ट्य मानले जाते.दरवाज्याकडे जाण्यासाठी पाय-या आहेत त्या जिथे सुरू होतात तिथे वाळूची पुळण आहे. या पुळणमध्ये मोडून पडलेल्या जुन्या तोफा आहेत. द्वाराच्या उजव्या तटावर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. 

उंब-याच्या अलीकडच्या पायरीवर कासव कोरलेले  आणि दारावर गोमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला रक्षक खोल्या आहेत. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे आहेत.गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.

 


किल्ल्याच्या पश्चिम दिशेला तटबंदीला लागून खोल खड्ड्यासारखा भाग आहे. तिथं गेल्यानंतर काही फूट खाली उतरून तटबंदीत एक दार केलेलं दिसतं. महादरवाजाच्या विरुद्ध दिशेला असलेलं हे दार एका छोट्याशा भुयाराकडं घेऊन जातं. या भुयारातून समुद्राच्या दिशेने काही पाय-या उतरत जाताना दिसतात.या पायऱ्यांनी खाली उतरून गेल्यावर तटबंदीतून खाली समुद्राकडे उघडलेले दार दिसते. इथं पूर्वी खाली उतरण्यासाठी पाय-या असाव्यात. जमिनीपासून साधारण १० फूट उंचावर हा चोर दरवाजा आहे. समुद्रातील कातळाच्या पायाला तासून बांधलेली भक्कम तटबंदी इथून अजूनच राकट भासते.


किल्ल्यात बोरी बाभळीची झाडे माजलेली असून किल्ल्याच्या उत्तर भागात कोठार सदृश इमारतीचे अवशेष दिसतात. तिथं एक वटवाघळांनी भरलेलं झाडही आहे. जुनी टाकी आणि तलाव पाहून लक्षात येतं की इथं पूर्वी गोड्या पाण्याची मुबलक सोय असावी. आज मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला स्वतः पाणी घेऊन जावं लागतं.परतीचा प्रवास आलेल्या बोटीनेच करावा लागतो.किल्ला पाहण्यास फक्त अर्धा ते पाऊण तास  मिळतो.एवढ्या वेळात संपूर्ण दुर्ग पाहून होत नाही.  

 `


या किल्ल्याचं राकट रांगडं बांधकाम पाहत राहावंसं वाटतं. जाणवतं की या वास्तूने मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी आणि काळेकुट्ट असे दोन्ही प्रकारचे क्षण अनुभवले आहेत.आणि शेवटी तो इंग्लिशांच्या ताब्यात गेला.पोर्तुगीज, इंग्रज, डच, आदिलशहा, मुघल, सिद्दी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाला होता.


आज भारताच्या आरमारी इतिहासाचा मानबिंदू असलेला हा दुर्ग काहीसे दुर्लक्षित आयुष्य जगतो आहे. समुद्रावर सत्ता गाजवणा-या मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार किल्ले सुवर्णदुर्गाला दुर्गप्रेमींनी जरुर भेट द्या...

No comments:

Post a Comment