Tuesday, December 6, 2016

हरीहर









                                                         
                                          इथे क्लिक करावे  ===>>     हरीहर

                         ०७.०६.२०१६ रोजी ’प्रहार ' या वृतपत्रात प्रसिध्द झालेला लेख 





पोलादी गड - हरिहर गड


     गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. हरिहरगड ऊर्फ हर्षगड    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रांगेतील हा एक पोलादी गड. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर! हरिहरगड ओळखला जातो तो  वैशिष्ट्य पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप    उमटवतात.नाशिक    जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड आहे.हरिहरगडला ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो.नाशिकच्या पश्चिमेस   आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग     पडतात एका भागात बसगड,   उतवड, फणीचा डोंगर,    हरिहर आणि त्रिंबकगड  हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत    जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

मुंबईहून त्र्यंबकेश्वरमार्गे ’निरगुडपाडा’ हे हरिहरच्या पायथ्याचे असलेले गाव गाठले.  गावात पोटपुजा करुन चढाईला सुरुवात केली.सुरुवातील चढण असल्याने दमछाक होते.आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देतो.काळ्या कातळात एका पाठोपाठ एक   पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे.    प्रत्येक पायरी दोन खोबण्या आहेत.चढताना  व उतरताना त्याचा उपयोग होतो.पाय-या  काळजीपूर्वक चढव्या लागतात. पाय-या  चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.

मराठेशाही      बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या     धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज   अधिकाऱ्याने  हरिहरगड जिंकून     घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या     पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे    कठीणच. सुमारे दोनशे     फूट सरळ व तीव्र  चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण   गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड,   औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा    समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या     सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला    धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.


हरिहर किल्ल्याचे हे    पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर लावलेली एक छोटी मूर्ती दिसते. या मार्गाने अंग चोरत पुढे   गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत पाय-या चढाव्या लागतात. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा     हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. 
गडाच्या पठारावर  सदरेचे अवशेष आपणास      दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन    पाण्याची टाकी व एक   प्रशस्त तलाव आहे. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसतो.पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा     सर्वोच्च माथा असणा-या टेकडीवर      जाण्यास कातळटप्पा चढून पार करावा लागतो.या  टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. दक्षिणेला वैतरणा    तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई  व त्रिंगलवाडी   किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात.विश्रांती घेऊन पोटपुजा केली.समोरचा नजराणा पाहून खाली उतरुच नये असे वाटत राहते. 

पुढे घुमटाकार      माथा असलेल्या दगडी कोठी जवळ गेलो. कोठीचा   प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत   असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आमची गडफेरी पूर्ण झाली.निसर्गाच्या त्या सौंदर्य रूपाचा पुरेपूर आनंद लुटला अन     परतीच्या मार्गाला लागलो.गड पाहून    परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.हा गड चढण्यापेक्षा उतरणे कठिण    आहे तेव्हा सुरक्षित अंतर ठेवून गडाकडे चेहरा  ठेवून व खोबण्यांचा आधार घेत सावकाश उतरावे लागते.गडप्रेमी एकमेकांच्या साथीने सुरक्षित खाली उतरल्याने मोहिम फत्ते झाली.ट्रेकरसाठी हा ट्रेक अविस्मरणीय अनुभव असतो.


चढाईसाठी अतिशय अवघड असलेला हा किल्ला सर करताना तरुणाई सुरक्षेची खबरदारी घेत नसल्याने तेथे अपघात होण्याचा धोका आहे.पावसाळ्यात हा गड शेवाळामुळे जास्त धोकादायक समजला जातो.

No comments:

Post a Comment