Wednesday, October 10, 2018

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला


                                           आपलं महानगर पूरवणी ( दि. ०९.१०.२०१८ )Monday, October 8, 2018

नळदुर्गाची भुरळ                                           महाराष्ट्र टाइम्स पूरवणी ( दि. ०८.१०.२०१८ )
                                            ऐतिहासिक नळदूर्ग किल्ला

  पाऊस गेल्यानंतर उकाड्यामुळे गडांवर न जाता भुईकोट किल्ल्यांकडे जाण्याचे ठरले व नळदुर्गाची मोहिम ठरली.  

भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र राज्यात भुईकोट किल्ले, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे तिन्ही प्रकारातील किल्ले आढळतात.नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.नळदूर्ग किल्ल्याचं संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला.त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव रुढ झाले.नरमादी धबधबा ही उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्याची विशेष ओळख आहे.नळदूर्ग हे सोलापूर पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे.सोलापूर -हैदराबाद रस्त्यावर नळदुर्ग गावामध्ये हा किल्ला आहे.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगत असताना नळ राजा आणि दमयंती राणीचा इतिहास सांगितला जातो. हा किल्ला काही काळ ‘चालुक्य’ राजाकडे होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. त्यानंतर हा किल्ला विजापूरची आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही यांच्याकडे आला. किल्ल्याचे बांधकाम आदिलशाहीच्या कालावधीत करण्यात आले.

नळदूर्ग किल्ल्याची जवळ जवळ ३ किमी लांबीची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण ११४ बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत.

मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत.नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातून बोरी नदी वाहते. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे.या पाणी महलामध्ये नर व मादी हे दोन कृत्रिम धबधबे तयार करण्यात आले आहेत. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते.यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे.
स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ आहे. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार,रणमंडळ ,हत्तीखाना, किल्लेदाराचा वाडा,जामा मशीद,नऊ पाकळ्यांचा बुरुज किंवा नवबुरुज,बारदरी,रंग महाल,पाणी महाल,उपळ्या बुरुज अशी नळदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख पहाण्यासारखी ठिकाणे आहे. 

 किल्ल्याच्या बाहेरील बाजूने पाहिल्यानंतर,नवबुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. 
 उपळ्या बुरुजावरुन संपूर्ण किल्ल्याचा आणि सभोवतीचा परिसर दिसत असल्याने या 
टेहाळणी साठी उपयोग होत असे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. नळदुर्ग किल्ला येथे असणाऱ्‍या बोरी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा केलेली आहे. तसेच वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयासाठी नळदुर्ग किल्ल्याच्या माहितीवर आधारित पाठ तयार केला आहे. नळदुर्ग किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजने अंतर्गत  युनिटी मल्टिकॉन्स कंपनीस संगोपनार्थ दिले आहे.

इतिहासाची साक्ष असणाऱ्या या नळदुर्ग किल्ल्याला नक्कीच भेट द्यावी.

Wednesday, February 21, 2018

कुलंग

               कडवे आव्हान देणारा कुलंग गड


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा असल्याने व भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.हा गड चढाई साठी कठीण आहे.

आंबेवाडी आणि भगतवाडी मध्ये गाडी ठेवून आम्ही गड चढाईला सुरुवात केली. आंबेवाडी च्या पुढे २ किलोमीटर नंतर ओढ्यावर एक छोटा पूल लागेल तिथेच पायउतार व्हावे आणि डावीकडे मदन गड आणि कुलंग डोळ्या समोर ठेऊन ओढ्याचा काठाने २ कि मी चालत राहावे वाटेत तुम्हाला आदिवासीची छोटीसी वस्ती दिसते.हि घरे ओलांडून पुढे शेतातून जात डावीकडे तुम्हाला एक छोटी टेकडी दिसेल हाच कुलंग चा पायथा जेथून कुलंगची चढाई करावी लागते त्या टेकडीवरून जाणारी वाट म्हणजेच कुलंग आणि मदनगड कडे जाणारी रुळलेली पायवाट. कुलंग च्या पदरात पोहोचायला तुम्हाला एक लांब वळसा घालायला लागतो म्हणजे आपल्याला असे वाटते कि आपण मदन गडा कडे तर नाही न चाललो ?


 दाट जंगलातला टप्पा ओलांडून खडकातील पायऱ्या चढून  मी कुलंग च्या पदरावर दाखल झालो .आता समोर मला कुलंग च्या शिखरावरून खाली उतरणाऱ्या तीव्र डोंगरधारेवर चढायचे होते .पायथ्यापासून ते शिखरा पर्यंत वाट फारच बिकट आहे म्हणजे मोकळी सुटलेली घसरडी माती ,कधी मुरमाड तर कधी दगड धोंडे ,कधी अंगाला घासणारे काटेरी झुडूप आणि वाळलेल्या काठ्या आणि दाट कारवीचे रान यातून वाट काढावी लागली 

पदरातून सरळ त्या डोंगर धारेचा रस्ता पकडावा आणि जवळ जवळ ८० डिग्री ची ती तीव्र चढण काळजीपूर्वक चढणे .या ठिकाणी चुकीला कोणतीही क्षमा नाही त्यामुळे या ठिकाणी लागणारे तीन कातळ टप्पे फारच सावधानीने चढावे.नवख्या लोकांनी इथपर्यंत आलो हेच फार मिळवले असे समजून माघार घेतली तरी चालेल किंवा भीती वाटत नसेल तर पुढे जाण्यास काहीही हरकत नाही .


कुलंग च्या वाटेवर तीन ठिकाणी असे खोल दरीत कोसळणाऱ्या कातळातून वाट आहे त्यामुळे जपूनच चालावे आणि मुख्य म्हणजे "आपण चढतोय पण पुन्हा उतरू शकतो का ? " हा विचार करूनच चढले पाहिजे.कुलंग समोरच असून देखील मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली.या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत.छोट्या पाय-या असल्याने चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती. 

  अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर पोहचतो.
ते कातळ टप्पे  पार करून जेव्हा गडात पोहोचतो तेव्हा मात्र जणू आकाशाला स्पर्श केल्याचा आनंद होतो कारण एवढी बिकट वाट आणि त्यानंतर इथे पोहोचणे म्हणजे त्याचा आनंद काही औरच असतो.कुलंग ची वाट हि एकदम खडी आणि  फारच घसरडी आहे.कुलंग गडाची चढाई ही सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीची खडी चढण समजली जाते. 

नीट निरीक्षण केल्यास कुलंग चा माथा हा गरुडाच्या पसरलेल्या पंखा सारखा भासतो म्हणजे येथे ट्रेक साठी येणाऱ्या मंडळींना जणू गरुडाच्या पंखावरती  स्वर होऊन आकाशात भ्रमण करण्याचा आनंद मिळतो.कुलंगचा दुसर्‍या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे.गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहे.किल्लाचे भग्न अवशेष आणि काही गुहा आहेत आणि भरपूर पाण्याचे टाक्या आहेत.  या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो.इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले.  कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. माथ्यावरून दिसणारे संपूर्ण सह्याद्रीच्या मानांकित कळसुबाई रांगेचे सौंदर्य केवळ अप्रतिम! आणखी नजर उंचावल्यावर काहीसे धुसर रामसेज, हरिहर, ब्रम्हगिरी, त्रिंगलववाडी यांची पंगत बसलेली दिसत होती. 

कुलंग हा गड चढण्यास जितका कठीण तेवढाच उतरण्यास कठीण आहे.सावधनतेने उतरावा लागतो.खुप दिवसांपासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न बघता-बघता पूर्ण झाल्याचे एक वेगळचे समाधान मनातून ओसंडून वाहत होते.अतिशय रोमांचिक आणि अविस्मरणीय असा हा ट्रेक होता.ट्रेकरनी कुलंग ट्रेक नक्कीच करावा.

Thursday, November 2, 2017

आड्वाटेवरली ठाणाळे लेणी                                     ०२.११.२०१७  रोजी ’प्रहार ’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख                                                   इथे क्लिक करावे  ===>>  आड्वाटेवरली ठाणाळे लेणी


Monday, September 25, 2017

आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी


                           २५.०९.२०१७ रोजी ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख                                                   इथे क्लिक करावे  ===>>    ठाणाळे लेणी
                                                        आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी ह्याद्रीच्या कुशीतली भ्रमंती आपल्याला अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय करून देते. रानाची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि तिथले फळं-फुलं-वन्यजीव असे एक वेगळंच जीवन अनुभवायला मिळते. अशीच आडवाटेवरची डोंगरयात्रा करायचे ठरले.वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत.तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे.काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचेया घाटमार्गावर पावसाळी धबधब्यांचे सौंदर्य मनमुराद पाहायला मिळते.ऐन पावसाळ्यात येथील भटकंतीला रंगत येते ती इथे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे. 
 अष्टविनायकातील सुप्रसिद्ध गणपती पालीच्या जवळ ऐन सह्यद्रीच्या कुशीत विसावलेले हे ठिकाण.ठाणाळेगावापासून लेणीपर्यंत मात्र पायी जावे लागते.ठाणाळे गाव डोंगराच्या पायथ्याशीच वसलेले आहे.छोटेसे गाव त्यात आम्हाला वाट दाखविण्यासाठी एक वाटाड्या भेटला. गावाच्या मागच्या बाजूने आम्ही चढायला सुरवात केली. घनदाट जंगल, रिम झिम पाऊस सुरु होता.जंगलातली ही पायवाट खूपच निसरडी होती. सुमारे अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाटेत एक ओहोळ (ओढा) लागला आणि तो ओहोळ पार करून पुढची वाट धरावी लागेत.दोन दिवसाच्या पावसाने ओढ्याला पाणी वाढले होते.मोकळ्या माळरानावर आल्यावर   लांबून लेणींचे दर्शन झाले.चागंलेच जंगल असल्याने परिसर हिरवेगार झालेले होते.वाटाड्या मागदर्शनाखाली चढत उतरत एकमेकांना मदतीचा हात देत लेण्यांच्या दिशेने वाटचाल सुरु होती.पुढे आल्यावर लेणी दिसत नव्हत्या.रानात चकव्या वाट पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.रमतगमत एक ते दिड तास लेण्यात पोहचण्यास लागतो.पण परिसर खुपच छान आहे.

पायथ्यापासून १००० फुटांवर असलेली ही लेणी पश्चिमाभिमुख आहेत.ठाणाळे लेणी ही २३ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. लेणीतील चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. दक्षिणोत्तर दिशेत एका माळेत कोरलेल्या बहुतांशी लेण्यांमध्ये बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी दगडी ओटे खोदलेले आहेत.कालावैभावाने नटलेल्या सभागृहाच्या छतावरही अज्ञात शिल्पकारांनी कौशल्याने अलंकरण केले आहे.छतात कोरलेले,झुम्बाराचा आभास निर्माण करणार हे शिल्प कातळकलेचा सर्वोत्तम आविष्कार आहे.उत्तरेकडील लेणी फारशी आकर्षक नसून अर्धवट राहिलेली आहेत. काही लेण्यांची काळाच्या ओघात पडझड झाली आहे.अलिकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.या लेण्या स्वच्छ होत्या.या लेण्या आडरस्त्याला असल्याने पर्य़टकांची गर्दी नसल्याने लेण्या पाहून मन प्रसन्न झाले.या ठिकाणाहून जाऊच असे वाटत होते.   
लेण्यांना भेट दिल्यानंतर जेवलो व एका धबधब्याखाली मनसोक्त मजा केली. बहुतेक सर्वच लेणी अपूर्ण अवस्थेत आहेत. पण हि जागा खूपच सुंदर आहे.पुढल्या वेळीस लेण्यांमध्ये रहाण्याच्या तयारीनेच येऊ असे म्हणत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

Sunday, September 17, 2017

सागरगड१४.०९.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 

                                                    इथे क्लिक करावे  ===>>    सागरगड                                    सागरी किनारपट्टीचे रक्षणकर्ता , सागरगडमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून अवघ्या सात किलो मीटर अंतरावर  पोयनाड गावानजीक सागरगड आहे.अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती.या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.सागरगडला जाण्यासाठी प्रथम अलिबागची एसटी पकडायची. तर अलिबागच्या अलीकडेच पाच किमी अंतरावर खंडाळे या गावात उतरुन चालण्यास सुरुवात करायची.डांबरी सडक संपून उजव्या हाताला दगडाचा कच्चा रस्ता निघतो तो थेट गड पायथ्याशी जातो. पायथ्यालाच वर चढण्यास दगडाच्या पाय-या आहेत.अर्ध्यावर गेल्यावर एका धबधब्याचे विलोभनीय दर्शन होते. 
गडफेरी पूर्ण करुन खाली उतरताना या धबधब्याची मजा घेता येते.पण कातळावर शेवाळ असल्याने निसरडे आहे. धबधब्याकडे  जाण्याचा रस्ता आणि गडाकडे जाण्याचा रस्ता वेगवेगळा असल्या कारणे आम्ही फक्त धबधब्याचे दूरूनच दर्शन घेऊन पुढे सिद्धेश्वर आश्रमाच्या दिशेने निघालो. तिथून थोड्याच अंतरावर सिद्धेश्वर मंदिर व आश्रम आहे.आश्रमपर्यंतची  वाट तशी सोपी होती, दगडांवर खुणा असल्याने चुकण्याचा प्रश्नच नसतो.तासभरात आम्ही सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचतो.मंदिराजवळ आपल्या पूर्वजांची  म्हणजे माकडांची टोळी आपल्या स्वागतासाठी हजर असते.दर्शन घेऊन मंदिरासमोरच्या वाटेने गडाच्या दिशेला निघावे लागते. आणखी थोडे पुढे गेल्यावर सागरगड वाडी लागते.गावात सोलार उर्जेवरची वीज लावली आहे.
या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी 'वानरलिंगी' सुळका दृष्टीस येतो. पण घुक्यात हरवलेला होता.थोड्याच वेळात थोडे घुके बाजुला सरले आणि आम्हाला 'वनारटोक' दिसले.  डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. समुदसपाटीपासून साधारण ३५० मीटर उंचावरचा हा गड चांगला प्रशस्त आणि मोक्याचा होता, हे लक्षात येत गडाची तटबंदी बऱ्याच अंशी ढासळलेली आणि खचलेली आहे. तर गड बांधकामासाठी काही ठिकाणी जांभ्याच्या दगडांचा वापर केलेला दिसतो. गडावर फिरण्यासाठी तटबंदीच्या बाजूने जाणा-या मुख्य पायवाटेचा वापर करायचा.सर्वत्र हिरव्यागार गवताचा गालिच्याच पाहण्यास मिळाला. या गवताच्या गालिच्यावर पावसाच्या पाण्याचे टपोरे थेंब एखाद्या हि-याप्रमाणे चमकत होते. येथे सोबतीला होता भन्नाट गार वारा, ढगांचे पुंजकेच्या पुंजकेच सर्वत्र विहार करताना दिसत होते. वातावरण मात्र ओलसर कुंद होते. सर्वजण या वातावरणात रोमांचित झालेले होते. येथून जरा वर चढून येताच आमचा गड प्रवेश झाला.कारण आमच्या स्वागताला समोरच सागरगडाचा बुलंद बुरूज हजर होता. 
बुरुज जीर्ण झालेले आहेत.बुरुज ओलांडल्यावर एका घनदाट जंगलातून जावे तसा  फील देणारी एक वाट आली. सगळीकडून झाडी,पायात चिखल आणि अरुंद वा पार केल्यावर आम्ही एका पठारावर पोहोचलो. प्रथमच डाव्या हाताला पत्र्याचं छप्पर असलेले महादेवाचं मंदिर दिसते. इथूनच पुन्हा खाली उतरून उजव्या हाताला पाण्याचं कुंड दिसते.या कुंडाचं विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही गोमुख असलेला पाषाणातून सतत पाणी पडत दिसते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने कुंडात कचरा न टाकता पाणी घ्यावे. हीच वाट पुढे वानरटोक सुळक्यासमोर जाते. वाटेत जुन्या वाड्याचे अवशेष आणि पाणी नसलेला छोटा तलावही दिसतो. तर काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाचीवर मात्र दाट जंगल आहे. तर अनेक वाड्याचे चौथारेच पाहायला मिळतात. पठार मोठे आहे.सागरगडावर निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिक-यांनी इथे वास्तव्यासाठी बंगले बांधले होते.येथुन अलिबागचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्रातील बेटे पाहण्यास मिळतात.पुर्वेला घरमतरची खाडी आहे.कर्नाळा,मानिकगड दिसतात.

 वनरटोक नावाचा एक सुंदर कळस दिसतो. हा कळस सागरगडालाच लागून आहे या  कळसावर पोहोचणे तसे कठीण आहे . हा गडाचा शेवट म्हणता येईल. पण वनरटोक बघून आलेला क्षीण कुठेच्या कुठे पळून गेला.वानरटोक हा कडा पाहत असताना  रायगड जिल्ह्याचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडले.  सागरगडाच्या बांधणीवरून तो निजामशाहीत बांधला गेला असावा .इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरून खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदुर्गचा) समावेश होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.


चारही दिशांनी निसर्गाने परिपूर्ण अशा इतिहासाच्या मूक साक्षीदाराला एकदा तरी आवर्जून भेट द्या.