Saturday, March 16, 2024

धोडपगडाचे रुप भावलं



 


किल्ले ’धोडप’ चा ट्रेक 



ब-याच दिवसापासून धोडप गडावर जाण्याची मोहीम आखत होतो. पण हा किल्ला नेहमीच आम्हाला हुलकावणी देत असल्याने ह्या गडाचा ट्रेक सारखा खुणवत होता.शेवटी एकदाचे ठरले आणि आम्ही जण निघालो.प्रवास लांबचा असल्याने खासगी बसने रात्रीचा प्रवास करुन पायस्थाशी असलेया ’हट्टी’ या गावात पहाटे पोहोचलो.गावात असलेल्या वनविभागाचे 'निसर्ग पर्यटन केंद्रात चहापाणी करून ट्रेकला सुरुवात केली.


महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच गिरिदुर्ग आहे.सह्याद्रीची पूर्वपश्चिम असलेल्या सातमाळ या डोंगररांगेतील शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप ट्रेकरांना भुरळ घालतो.धोडप गडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्यालाच लागून तयार झालेल्या सरळसोट भिंतीमध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. लांबून गडावरील या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी चढाईचे आव्हान स्विकारत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत चढाईला सुरुवात केली.          



गावाला पाणी पुरवणा-या घरणाच्या पाण्यात पहाटेची सुर्याची किरण पडलेल्या धोडप किल्ल्याचे प्रतिबिंब पाहत पाहत ट्रेकची सुरुवात केली.पहाटेचे वातावरण व निसर्ग प्रसन्न करणारा होते.गडावर जाण्यापूर्वी मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढे निघालो.काही अंतर चढून गेल्यावर एक जुनी पाय-यांची बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते.

सर्व बांधकाम अजून शाबूत आहे,हे विशेष. 


मोठ्या मोठ्या चढणी पार करून दमछाक होत होती.पुढे गेल्यावर एक छोटे तळे ( गणेश टाकं ) आले तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती होती.परिसर छान व पवित्र वाटल्याने आम्ही गणपतीची आरती करुन आमचा ट्रेक चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली. या पुढे रास्ता अजून कठीण होत जाणार होता आणि सूर्य ही हळू हळू डोक्यावर येत होता.


ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत.


 वाट अवघड होऊन बसल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावली आहे. आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो आणि पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले.  तिथून पुढे कोरीव पायऱ्यांच्या वाटेनं पुढे गेल्यावर गडाचा दुसरा, कातळात कोरलेला दरवाजा लागला. संरक्षणाच्या दृष्टीनं लपवलेल्या प्रवेशद्वाराशेजारी आपल्याला दोन शिलालेख दिसला. दरवाजातून पुढे गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याची बरीच पडझड झालेली दिसली. छतही कोसळलं आहे. त्यावरील बारीक नक्षिकाम आपल्याला गडाच्या गतवैभवाची झलक दाखवतं.वाड्याशेजारीच पाण्याची दोन टाकी पाहिली. 


बालेकिल्ल्याच्या डाव्या हाताच्या वाटेनं पुढे गेल्यावर आपल्याला डोंगराच्या पोटात अनेक गुहा कोरलेल्या दिसतात. यातील एका गुहेत भवानीमातेचा तांदळा दिसतो.सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. धोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसले.उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळाले.


किल्ल्याचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, राजवाडे, विहिरी अश्या अनेक वास्तूंनी धोडपला सुंदर सजवलं आहे. किल्ल्यावरील बांधकाम बघता हा किल्ला फार प्राचीन आहे ह्याची जाणीव होते. बांधकामातील विविधते वरून हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीखाली असल्याचे लक्षात येते.



धोडप हा किल्ला एकदम देखणा आणि रांगडा आहे.दुर्ग प्रेमींसाठी आणि हौशी छायाचित्रकारांसाठी हा किल्ला नेहेमीच एक आकर्षण राहिला आहे.सारे अवशेष आणि धोडपचं रांगडं रूप मनात साठवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो.


निसर्गाने आणि इतिहासाने सुदधा मुक्त हस्ताने उधळण केलेला एक नितान्त सुंदर दुर्ग पाहण्यास मिळाला. 


No comments:

Post a Comment