स्वप्नवत सफर
जैवविविधतेने नटलेल्या सुंदरबनला जाण्यासाठी कोलकत्ता येथून बसने प्रवास करीत सोनारखळीला पोहचलो.तेथून सुंदरबन पाहण्यासाठी बोटीने निघालो होतो.आमच्या फक्त अकरा जणांच्या प्रवासासाठी ही संपूर्ण बोट राखीव ठेवली होती.बोटीत आमचे व खाण्याचे सामान ठेवल्यावर बोटीचा प्रवास सुरु झाला. मस्त वातावरण होते.दोन्ही तटावर वस्ती दिसत होती.
उजव्या तटाच्या बाजुने बोटीचा प्रवास सुरु होता.
आमच्या गाईडने सुंदरबन ची माहीती देण्यास सुरुवात केली.
"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे परिसंस्था म्हणूनही ओळखले जाते.सुंदरबन हे खारफुटीचे वन गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे.खारफुटीच्या एका झाडाचे नाव बंगालीमध्ये सुंदरी असे आहे. त्यामुळे या खारफुटीच्या वनाला ‘सुंदरबन’ असे नाव पडले. याचा बराचसा भाग बांगलादेशात आणि काही भाग भारतात येतो. १४० हजार चौरस हेक्टरवर हे कांदळवन पसरले असून १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुंदरबनाला मान्यता दिली आहे.जलचर, भूचर आणि उभयचर प्राण्यांचे ते माहेरघर आहे.त्याचबरोबर रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे सुंदरबनचे सौंदर्य आणखी खुलते. विविध प्रजातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील येथे आढळतात.एक रुबाबदार, देखणा प्राणी रॉयल बेंगॉल टायगर तोही या सुंदरबनात मोठय़ा दिमाखात वावरतो."
मंद वा-यात व शांत वाहणा-या पाण्यातून आमची बोट वाट काढत आम्हाला घेऊन पुढे निघाली होती.बाजुने वेगवेगळ्या आकाराच्या बोटी जा ये करीत होत्या. आमचा गाईड दोन्ही तटांवर दिसणा-या गोष्टीची माहीती देत होता. आम्हीही त्याला काही गोष्टीचा खुलासा करीत प्रवास चालला होता.संध्याकाळ पर्यत हा असा प्रवास करायचा असल्याने आनंद झाला. काही मंडळी फोटो काढण्यात गुंग होती. बोटीतच जेवण लावले गेले.
मोठा नदीच्या प्रवाहातून व दूर दिसणा-या आकाशाखालून चालणा-या बोटीत जेवण करण्याची ही पहिलीच वेळ होती. आजूबाजूचा परिसर न्याहाळत जेवण कधी संपले ते कळलेच नाही.
बोट आपल्याच तालात मंद चालीत वाहत होती. काही वेळाने अंधार झाला.पाऊस येण्याअगोदरची परिस्थिती निर्माण झाली आणि जोराच्या वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली. बोटीवर छप्पर पत्र्याचे असल्याने ताशा वाजु लागला.बराच वेळ पाऊस पडल्याने सर्वजण धास्तावले.असाच पाऊस पडला तर मजा करता येणार नाही, अशी नाराजी पसरली. शांत बसून वेगळ्या पावसाचा आनंद घेतला.
पाऊस ओसरल्याने बोटीतल्या तळघरात गेलेली मंडळी वरती आली.नंतर लख प्रकाशात परिसर पावसाने न्हाऊन निघालेला दिसला .सुंदर निसर्ग पाहण्यास मिळाला.दोन्ही तट आता दूरवर दिसत होते. सगळीकडे संथ वाहणारे पाणी दिसत होते.बोटीचे मार्गक्रमण सुरु होते.एका मोठ्या बेटाच्या जेटीला आमची बोट लागली.तेथे सुंदरबन चे वनरक्षकांचे कार्यालय व वस्तीस्थान होते.वनाचे टेहाळणी करण्यास बांधलेल्या बुरुजावर चढून मोठे जंगल पाहिले.दूरवर हरणं चरताना दिसली.कासवं व मगरी पाहील्या.
संध्याकाळी पुन्हा बोटीने प्रवास करीत मानवी वस्ती असलेल्या एका बेटावर उतरलो.आमचे सामान घेऊन आम्ही हॉटेल राहण्यास आलो.नंतर गावात फेरफटका मारला. गरीबी पाहिली. वेगळे राहणीमान पाहण्यास मिळाले.औषधोपाराची कोठे सोय नव्हती. येथे येण्याचे एकच साधन हे बोट होते. रात्री तेथे आमच्यासाठी त्यांची संस्कृती पाहण्यासाठी नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होते.आम्ही सगळयांनी त्या कार्यक्रमात त्यांच्यासह नाचून खूप मजा केली. रात्री शांत वातावरणात कधी झोप लागली ते कळलेच नाही.
पहाटे कोबंड्याच्या आरवण्याने सकाळ झाल्याचे कळले.तयारी करुन आम्ही लवकरच बोटीत बसून प्रवासाला सुरुवात केली. सकाळचे प्रसन्न वातावरण मन भारावून गेले.बोट पश्चिमेला जात होती पूर्वेला सुर्योदयाची
तयारी झालेली दिसली.काय नजारा होता?बोट पाण्यावर तरंगत चाललेली वाटत होती.मोठी मोठी बेटे पाठीमागे टाकीत आमची बोट भरतीचे पाणी कापत पुढे जात होती. बोटीवर चहापाणी झाला.प्राणी बेटाहून बाहेर जावू नयेत यासाठी मोठे कुंपण लावलेले दिसले.झाडे चालताना दिसत होती.मध्येच काही पक्षी उडताना पाहिले तर पाण्यात मासे दिसले.चित्रपटातील गाणी ऐकत व गुणगुणत प्रवास सुरु असल्याने बोटीचा प्रवास कधीच संपू नये असे वाटत होते.
काही बेटांवर मनुष्य वस्ती आहे.काही बेटावर जंगल व हिंस्त्रप्राणी असल्याने तेथे जाण्यास बंदी आहे. वन रक्षकांची बोट या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी फिरत असते.पाण्याने बेटांचा आकारमान कमी होत चालला आहे. एका बेटावरील प्राणीसंग्रालयाला भेट देण्य़ास बोटीतून उतरलो.तेथे तीन आजारी वाघांना ठेवल्याने आम्हाला पाहता आले. मगरी,हरणं व पक्षी पाहिले.शहाळ्याची पाणी प्यायलो व पुन्हा बोटीत बसलो.पाण्यावर सुर्याची किरण पडल्याने पाणी चमकत होते. बेटावर प्राणी दिसतील म्हणून नजर ठेवून होतो. माकडं व बगळे दिसले. ’सुनाहा सफर’ हे गाण गुणगुणत बाहेरचा नजारा पाहत शांतपणे विहार सुरु होता.आपण स्वप्नात हा प्रवास करत असल्याचा भास होत होता.
इतक्यात बोट चालवणा-याने ते ’सोनारखळी’ आल्याचे सांगितले आणि मी स्वप्नातून जागे झालो.आता आपल्याला बोटीतून उतरावे लागणार असल्याने मी नाराज झालो. सुंदरबन बोट सफारी हे आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. त्याचा अनुभव घेऊन एका अविस्मरणीय सफारीच्या आठवणीवर आयुष्य भरभरुन जगावे.
No comments:
Post a Comment