२३.०५.२०२३ रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स या वॄतपत्रास ’पत्रास कारण की’ या सदरात प्रसिध्द झाला आहे
विजय मित्रा
परवाच्या राजगडच्या ट्रेकमध्ये तुझी ब-याच वेळा आठवण आल्याने आपल्या सर्व मित्रांच्यावतीने तुला पत्र लिहावेसे वाटले. करोनाच्या काळात तु अचानक आम्हाला सोडून गेलास पण सह्याद्रीतल्या प्रत्येक ट्रेकमध्ये तुझी आठवण येते. आपण एकत्र कामाला होतो पण तुझी आणि माझी ओळख मात्र एका ट्रेकमध्येच झाली. ओळखीपासूनच आपली मैत्री झाली. काय दिवस होते ते. पावसाळ्यात जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार आपण सह्याद्रीत असायचो. तु ट्रेकमध्ये सर्वांची काळजी घेत होतास. तु ट्रेकला असल्यावर खाण्याची चंगळ असायची. सुका खाऊ,फळं व जेवण मांसाहारी आणत होतास. सगळे मित्र तुझी चेष्टा करायचे पण तु कधीच चिडला नाहीस. तुला फोटोची आवड असल्याने आमच्याकडून तु तुझे फोटो काढून घेत होतास. ट्रेकला जाण्यापूर्वी त्या गडाची संपूर्ण माहिती शोधून आणल्याने आपण कधी रस्ता चुकलो नाही. गडावर गेल्यावर तेथील ठिकाणाची माहिती तु सर्वांना देत होतास. ट्रेकमध्ये तु महाराष्ट्र गीत व भजन गात होतास. तुझे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम होते. त्यामुळे तुला सह्याद्रीत भटकंती करण्यास आवडत असे. तु तुझ्या मुलांना देखील ट्रेकींगची आवड निर्माण व्हावी म्हणून ट्रेकला घेऊन येत होतास. ट्रेकमध्ये तु कधी आला नाही की चुकल्यासारखे वाटायचे. तुला तुझ्या गावाची ओढ होती. सणासुधीला तु कायम गावाला जात होतास. तुझ्या बैलाच्या जोडीचे,शेतात काम करतानाचे व नदीत पोहतानाचे फोटो शेअर करीत होतास. तुला समाजकार्याचीही मोठी आवड होती. शाळा सुरु झाल्या की सुट्टी टाकून शाळेतील मुलांना पुस्तके, वह्या व शाळेत जाण्यास लागणारे साहित्य मुंबईहून टेपोने नेऊन कोकणातील शंभरएक शाळेतून मोफत वाटत होतास.
करोना काळात तु आम्हाला सोडून गेलास पण आम्हाला तुझे अंतिम दर्शन घेता आले नाही. याचे दु:ख झाले. त्यावेळी तुझ्यासोबत केलेल्या ट्रेकमधील फोटो पाहत राहिलो. खूप वाईट वाटले. करोना संपल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी तुझ्या दोन्ही मुलांसह तुला श्रध्दांजली वाहण्यास एक गडावर गेलो होतो. त्यावेळी तुझी सर्वांनी आठवण काढली. तुझ्यासोबत केलेले सर्व ट्रेक डोळ्यासमोर येत होते. तु गायलेली गाणी अजून कानावर येत असतात. तुझ्या कुटुंबाची आम्ही नियमित चौकशी करून माहिती घेत असतो.
तु आम्हाला मध्येच सोडून गेलास पण तुझ्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत. ट्रेकमध्ये तु आमच्या सोबत आहेस असा भास होत राहतो. ट्रेकमध्ये इतरांना आपण कोठे आहोत याची माहीती देण्यासाठी एक विशिष्ठ आवाज काढत होतास. त्या आवाजाला व तुला आम्ही कधीच विसणार नाही.
तुझा मित्र
विवेक तवटे
No comments:
Post a Comment