Wednesday, October 18, 2023

भेटण्याची ओढ

 






   भेटण्याची ओढ


आम्ही ऐशी व नव्वदच्या दशकात  मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या स्पोर्ट्स क्लब तर्फे सह्याद्रीत ट्रेकिंगला जात होतो. वरिष्ठ ट्रेकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टेकिंग केल्याने आम्हाला शिकायला मिळाले. ट्रेकिंग करता करता आमची घट्ट मैत्री कधी  झाली ते कळलेच नाही. एक मोठा ग्रुप झाला. महिन्यातून  दोनदा कोणत्यातरी गडावर 
भेट व्हायची. आमच्या ग्रुपमधले काहीजण बाहेरच्या ग्रुप बरोबर मोठमोठ्या ट्रेकला जाऊ लागले. आमच्या ग्रुपमध्ये काही नवीन ट्रेकर्स सामिल झाल्याने नवा ग्रुप तयार झाला. जुन्या ग्रुपमधल्या काही ट्रेकर्सची भेट होत नव्हती. ते सर्व ट्रेकर्स मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सेवेतून सेवानिवृत होऊनही ट्रेकिंग करीत आहेत. जवळजवळ तीस वर्षांनी सर्वांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने भेटण्याची ओढ वाढली होती.  

 १८ जुलै २०२३ ला  संजय नलावडे च्या धोलवड येथील त्याच्या नवीन घरी भेटण्याचे ठरले. श्रीधर दळवी,अजित धोंड,राजन फाटक,शशी नलावडे,हेमंत वरळीकर , सतिश चव्हाण ,हेमंत जोशी आणि मी, आम्ही कल्याणला भेटलो व संजय नलावडे च्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला. राजन फाटक याने दोन दिवसाची रजा काढून आम्हाला भेटण्यास आला होता. पूर्वी वाहतुकीची साधने कमी असल्याने नेहमीच आम्ही एसटीने प्रवास करीत 
ट्रेक करायचो. ते दिवस व तो प्रवास वेगळाच असायचा. त्या दिवसांच्या आठवणी करीता आताही एसटीने प्रवास करायचे ठरले होते. पाऊस जोरात  पडत होता तरीही सर्व मंडळी भेटण्याच्या ओढीने आली होती. प्रवासात एकमेकांची विचारपूस झाली व खूप गप्पा झाल्या.  मालशेज घाटातून प्रवास सुरु झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.या परिसरात आम्ही बरेच ट्रेक केले होते.    

ओतुर येथील श्री कपार्दिकेश्वर या शिव मंदीरात जाऊन दर्शन घेऊन आमच्या सहलीची सुरुवात केली. भोजन करुन आम्ही संजय नलावडे च्या ’श्रीहरी’ या बंगल्यात पोहचलो. आमच्या मित्रांनी भव्य वास्तू बांधल्याने आम्हाला त्याचा अभिमान वाटला. बंगला पाहिला. कोणीही विश्रांती न घेता गप्पा केल्या. तब्तेतीमुळे काही मित्र आमच्यात सामिल होऊ न शकल्याने आम्हाला वाईट वाटले. आम्ही आमच्या सर्वांचे फोटी ग्रुप वर शेअर केल्याने त्यांनाही  सहलीची माहिती मिळत गेली. त्यांनाही या भेटीत आपल्याला सहभागी न होता आल्याने खंत वाटली. संध्याकाळी ओझरच्या  ’विघ्नहर’ बाप्पाचे दर्शन घेतले.

जेवल्यानंतर रात्री गप्पांचा फड बसला. अजित धोंड यांनी केलेल्या हिमालयातील ’चदर ट्रेक’ व ’ कैलास परिक्रमा’ या ट्रेकचे फोटो पाहून त्याचे अभिनंदन केले. कोणालाही झोप येत नव्हती. जुन्या ट्रेकमध्ये केलेल्या दंगामस्ती आठवून मजा केली. उद्या 
 छोटासा  ट्रेक करायचे ठरवून आम्ही उशिरा झोपलो.

पहाटे लवकर उठून तयारी करुन आम्ही ’ शिवनेरी’ गडाच्या दिशेने निघालो. पाऊस नुकताच पडून गेल्याने वातावरण प्रसन्न वाटले . हिरवाई ओसंडून वाहत होती.  चढाईला सुरुवात केली. जुने दिवस आठवत होते.  तीस वर्षापूर्वी आम्ही कसे होतो आणि आता कसे आहोत याची जाणीव होत होती. आठवणीसाठी फोटो काढत गडावर पोहोचलो. जिजाऊ मातेच्या स्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. आम्ही भारावून गेलो.आमचे मन भरल्यानंतर आम्ही गडावरुन खाली उतरलो.

मुंबईत पाऊस जोरात पडत असून रेल्वे बंद असलेल्याच्या बातम्या आल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. जून्नर परिसरात पाऊस नसल्याने आम्ही लेण्याद्री येथील लेण्यातील ’गिरिजात्मक’ बाप्पाचे दर्शनाला निघालो. दुपारची वेळ असल्याने पाय-या चढताना दम लागला. गुहेत पोहचल्यावर बाप्पाच्या दर्शनाने थकवा दूर झाला. खाली उतरून भोजन केले व परतीचा प्रवास सुरु केला. संजयच्या पाहुणचाराने आम्ही खूष झालो.

या भेटीने सर्वांना आनंद झाला होता. मैत्री असीच टिकवायची अशी वचने नकळत दिली गेली. प्रवासात पावसाचा कोठेही त्रास झाला नाही. पुढच्या भेटीची आखणी करीत मुंबईत सुखरुप  पोहचलो. आमच्या भेटीचे दोन दिवस कायमचे आमच्या स्मरणात राहतील.


No comments:

Post a Comment