मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाचे आंमत्रण दिले. लग्न नागपुरात असून जुन महिन्यात होते. लग्नापूर्वी ताडोबा जंगलात सफारी करण्याची आम्ही मित्रांनी ठरवले. उन्हाचा त्रास होणार आहे. पण या काळात वाघांचे दर्शन होते अशी जाणकारांकडून माहिती मिळाली. लगेच जाण्याचे नक्की करून तिकीटे बुक केली.
नागपुरात पोहचलो.उन्हाचा कडाका होता.पण धाम येत नव्हता. खाण्याच्या पदार्थात तिखटाचा जाळ होता. आम्ही दहीभातावरच दिवस काढले.पहिल्या दिवशी आम्ही नागपूर पासून ८० किलोमीटर असलेल्या ’उर्मेड’ या अभयारण्यात दुपारी ओपन जीपमधून सफारीला सुरुवात केली. सुकलेल्या व जळलेल्या रानातून जीप जात होती. लांबवर हरणे व नीलगाय दिसले. पक्षी उडताना दिसले.काही झाडांना नवी पालवी फुटलेली दिसली.रानडुकरांचा कळप पाहिला.पण वाघ काही दिसला नाही. उन्हाने हैराण झालो होतो. वाघाच्या नियमित येण्याच्या ठिकाणावर जाऊन आलो.जीप गाड्या इकडून तिकडे घावत होत्या. संघ्याकाळ झाल्यावर जंगलातून हताश होऊन बाहेर आलो.सगळे नाराज झाले होते.
दुस-या दिवशी ताडोबाला निघालो.गेटवर जाऊन नोंदणी करुन दुपारच्या उन्हात जंगलात शिरलो. कॅमेरे जवळ घेतले होते. ’उर्मेड’ पेक्षा ’ताडोबा’ चे जंगल मोठे असून दाट आहे. ’ताडोबा’ मघ्ये कोअर व बफर असे दोन झोन आहेत. दोन्ही झोनची वेगवेगळी फी आहे. वाघ कोणत्याही झोन दिसू शकतो. गवे,हरणे व रानडुक्कर दिसते होते. मोर व लांडोर दिसले. पाण्याच्या ठिकाणांवर जाऊन थांबलो. वाघाची वाट पाहिली. फक्त पक्षी पाहिले. उन्हाने करपलो होतो. जीपचे चालक व गाईड फोनवरून कोठे तरी वाघ दिसल्याची माहिती घेत होते. संपूर्ण जंगल पालथे घातले. आजपण वाघचे दर्शन होणार नाही असे वाटले.आम्ही नाराज झालो होतो.
इतक्यात गाईडचा फोन वाजला. त्याच्या भाषेत संभाषण झाले. चालकानी गाडी वेगाने वळवली आणि पळवली. वाघ झाडीतून बाहेर आलेल्याची खबर मिळाली होती. जीप चालकाने जीप योग्य ठिकाणी उभी केली. डावीकडच्या झाडीतून वाघ बाहेर पडला आहे,असे गाईडने आम्हाला सांगितले.आमच्या मागे आणखी दोन जीप उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात जंगलातून ’घरणी’ नावाची वाघीण आमच्या दिशेत येताना दिसली.आम्ही सर्वजण वाघ दिसला म्हणून खूष झालो.वाघीणीने झाडीतून रस्ता काढत आमच्या जीपच्या समोरून रस्ता ओलांडून उजवीकडच्या झाडीत घुसली. आपल्याच तो-यात चालली होती.तिला कसलेच भय वाटत नव्हते पण आम्हाला गाडीत असूनही भिती वाटत होती. जंगलातील मुक्त वाघीणीच्या दर्शनाने आंनद झाला.
ती वाघीण तिच्या पिल्लाला भेटण्यास निघाली आहे,गाईडने आम्हाला सांगितले व चालकानी गाडी सुरु करून निघाला.वाघीणीचा पिल्लू कोठे आहे चालकाला व गाईडला माहित असल्याने त्याच दिशेने जीप घावू लागली. चालकाने एका पाणवठ्यावर जीप आणून बंद केली.ताडबतोब दहा ते पंधरा जीप आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.गाइडने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आम्ही वाघीणीची वाट पाहत होतो.कॅमेरे तयार ठेवले होते.संध्याकाळ होत होती.
लांबवर झाडीत हालचाल दिसली आणि वाघीणीची चाहूल लागली. वाघीण झाडीतून बाहेर येऊन उघड्यावर माळरानावर आली होती. वाघीण जंगलाच्या राणीच्या अविर्भावात ऐटीत चालत येताना दिसली. काय तिचा रुबाब होता. चालण्यात एक लकब होती. आपल्या वनक्षेत्राची ‘सम्राज्ञी’ चालत निघाली होती. आम्ही तिची ती चाल पाहत राहोली व तिचे फोटो काढत होतो. लांबून दिसणारी ती वाघीण आता जवळ जवळ येत होती. अर्धी चिखळाने माखलेली होती. उन्हाला जास्त असल्याने गार पाण्यात खूप वेळ बसून बाहेर पडली होती.
आता ती पाणवठ्याच्या दिशेने निघाली होती. आमच्या समोरून ती पुढे सरकली होती. मध्येच दोन झाडांच्या बुंध्या जवळ रेगांळली व तेथे वास घेऊन पुढे निघाली. आम्ही तिची हालचालीवर नजर ठेवून होतो.पाणवठ्याला वळसा घालताना ती दिसत नव्हती. पाणवठ्याच्या बांधावरून वर आल्यावर पुन्हा दिसू लागली.ती पुढे झाडीच्या दिशेने पुढे जात होती.तीने कसला तरी आवाज केल्यावर त्या झाडीतून तिचा बछडा दुडुदुडु करीत बाहेर आला. दोघेही एकमेकांच्या दिशेने पुढे जात होते.बछडा तिच्याजवळ आला आणि तिच्या पायात गोल फिरू लागला.तिच्या अंगावर उड्या मारू लागला. ती त्याला चाटू लागली. त्या दोघांची ती भेट पाहत राहवीशी वाटत होती.ती भेट पाहून भरून आले.आई व मुलाचे एकमेकावरचे प्रेम तेथे दिसत होते. त्यांना बोलता येत नसले तरीही कृती ते प्रेम व्यक्त करत होते. वाघीणीने बछड्याला खेळ खेळवत व गोंजारत त्याला पाणवठ्याच्या जागेतून बाहेर काढले व दोघे निघाले व झाडीत घुसले. तेथील सर्व प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. आपण काय पाहिले ते खूपच चांगले पाहिले.
ही वाघीण चार ते पाच दिवसांनी या बछड्याला भेटली असल्याचे गाईडने आम्हाला माहिती दिली.हा बछडा त्या झाडीतच बसून तिची वाट पाहत होता. या बछड्याच्या भावडांना तेथील वाघाने मारले असल्याने वाघीणीने या बछड्याला वाघापासून लांब सुरक्षित ठिकाणी लपवले होते. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती. ही गोष्ट कळल्यावर ह्या वाघीणीची व तिच्या बछःड्याची झालेल्या भेटीचे महत्व अधिक वाढले.आम्ही आवाक झालो. त्या बछःड्याशिवाय वाघीणीने एवढे दिवस कसे बाहेर काढले असतील? आणि आई शिवाय बछडा कसा जगला असेल? एकमेकांच्या आठवणीवर हे दोघे कसे जगले असतील का? हे निर्सगातले कोडेच आहे.
पुन्हा जीप चालकांने सर्व जीपच्या गर्दीतून आमची जीप बाहेर काढत वाघाणीच्या मागावर निघाले. एका ठिकाणी जाऊन थांबले.पण यावेळी आमच्या पुढे काही जीप उभ्या राहिल्या होत्या. त्यांना अंदाज होता वाघीण व तिचा बछडा या रस्त्याने येतील.अंधार पडत चालला होता.आम्ही त्या दोघांची वाट पाहत होतो.थोड्यात वेळात ती दोघं आम्हाला लांबून येताना दिसली.बछडा वाघीणीच्या पायात सारखा येत होता. त्या दोघांनी आमच्या समोरुन रस्त्या ओलांडला. जीप गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. बछडा तिच्या पासून थोडा मागे रेंगाळला. दोघांमध्ये थोडे अंतर पडले होते.ती तिच्यात तो-यात चालत होती.एक जीप तिच्या पुढे गेल्यावर तीने त्या जीपवर एक कटाक्ष टाकला.वाघीणीच्या एका नजरेने सर्व धाबरले होते.ती तेथेच थबकली.मागे पाहिले.तिला तिचा बछडा लांबवर दिसला.वाघीणीने त्याच्याकडे पाहिल्या बरोबर बछडा पळतपळत वाघीणी जवळ आला. त्याला पुढे झाडीत घुसवून वाघीण नंतर झाडीत घुसली. आता ती नजरेआड झाली होती. सर्व शांत झाले.
वाघीणीचा वीस ते पंचवीस मिनिटांचा तो प्रवास आम्ही जवळून पाहिला. वाघ दिसला नाही म्ह्णून नाराज झालेले आम्ही भारावून गेलो.त्या दोघांची ती भेट आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आताही ती दोघं नजरेसमोर दिसत आहे. आई व तिच्या मुलाचं नातं निव्वळ वात्सल्याचं असतं.
No comments:
Post a Comment