कडवे आव्हान देणारा कुलंग गड
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा असल्याने व भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.हा गड चढाई साठी कठीण आहे.
आंबेवाडी आणि भगतवाडी मध्ये गाडी ठेवून आम्ही गड चढाईला सुरुवात केली. आंबेवाडी च्या पुढे २ किलोमीटर नंतर ओढ्यावर एक छोटा पूल लागेल तिथेच पायउतार व्हावे आणि डावीकडे मदन गड आणि कुलंग डोळ्या समोर ठेऊन ओढ्याचा काठाने २ कि मी चालत राहावे वाटेत तुम्हाला आदिवासीची छोटीसी वस्ती दिसते.हि घरे ओलांडून पुढे शेतातून जात डावीकडे तुम्हाला एक छोटी टेकडी दिसेल हाच कुलंग चा पायथा जेथून कुलंगची चढाई करावी लागते त्या टेकडीवरून जाणारी वाट म्हणजेच कुलंग आणि मदनगड कडे जाणारी रुळलेली पायवाट. कुलंग च्या पदरात पोहोचायला तुम्हाला एक लांब वळसा घालायला लागतो म्हणजे आपल्याला असे वाटते कि आपण मदन गडा कडे तर नाही न चाललो ?
दाट जंगलातला टप्पा ओलांडून खडकातील पायऱ्या चढून मी कुलंग च्या पदरावर दाखल झालो .आता समोर मला कुलंग च्या शिखरावरून खाली उतरणाऱ्या तीव्र डोंगरधारेवर चढायचे होते .पायथ्यापासून ते शिखरा पर्यंत वाट फारच बिकट आहे म्हणजे मोकळी सुटलेली घसरडी माती ,कधी मुरमाड तर कधी दगड धोंडे ,कधी अंगाला घासणारे काटेरी झुडूप आणि वाळलेल्या काठ्या आणि दाट कारवीचे रान यातून वाट काढावी लागली
पदरातून सरळ त्या डोंगर धारेचा रस्ता पकडावा आणि जवळ जवळ ८० डिग्री ची ती तीव्र चढण काळजीपूर्वक चढणे .या ठिकाणी चुकीला कोणतीही क्षमा नाही त्यामुळे या ठिकाणी लागणारे तीन कातळ टप्पे फारच सावधानीने चढावे.नवख्या लोकांनी इथपर्यंत आलो हेच फार मिळवले असे समजून माघार घेतली तरी चालेल किंवा भीती वाटत नसेल तर पुढे जाण्यास काहीही हरकत नाही .
कुलंग च्या वाटेवर तीन ठिकाणी असे खोल दरीत कोसळणाऱ्या कातळातून वाट आहे त्यामुळे जपूनच चालावे आणि मुख्य म्हणजे "आपण चढतोय पण पुन्हा उतरू शकतो का ? " हा विचार करूनच चढले पाहिजे.कुलंग समोरच असून देखील मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली.या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत.छोट्या पाय-या असल्याने चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती.
अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर पोहचतो.
ते कातळ टप्पे पार करून जेव्हा गडात पोहोचतो तेव्हा मात्र जणू आकाशाला स्पर्श केल्याचा आनंद होतो कारण एवढी बिकट वाट आणि त्यानंतर इथे पोहोचणे म्हणजे त्याचा आनंद काही औरच असतो.कुलंग ची वाट हि एकदम खडी आणि फारच घसरडी आहे.कुलंग गडाची चढाई ही सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीची खडी चढण समजली जाते.
नीट निरीक्षण केल्यास कुलंग चा माथा हा गरुडाच्या पसरलेल्या पंखा सारखा भासतो म्हणजे येथे ट्रेक साठी येणाऱ्या मंडळींना जणू गरुडाच्या पंखावरती स्वर होऊन आकाशात भ्रमण करण्याचा आनंद मिळतो.कुलंगचा दुसर्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे.गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहे.किल्लाचे भग्न अवशेष आणि काही गुहा आहेत आणि भरपूर पाण्याचे टाक्या आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो.इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले.
कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. माथ्यावरून दिसणारे संपूर्ण सह्याद्रीच्या मानांकित कळसुबाई रांगेचे सौंदर्य केवळ अप्रतिम! आणखी नजर उंचावल्यावर काहीसे धुसर रामसेज, हरिहर, ब्रम्हगिरी, त्रिंगलववाडी यांची पंगत बसलेली दिसत होती.
कुलंग हा गड चढण्यास जितका कठीण तेवढाच उतरण्यास कठीण आहे.सावधनतेने उतरावा लागतो.खुप दिवसांपासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न बघता-बघता पूर्ण झाल्याचे एक वेगळचे समाधान मनातून ओसंडून वाहत होते.अतिशय रोमांचिक आणि अविस्मरणीय असा हा ट्रेक होता.ट्रेकरनी कुलंग ट्रेक नक्कीच करावा.
आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.
ReplyDelete