Sunday, August 19, 2012

लोहगडावर स्वारी


आँक़्टोबर हिट मुळे काही दिवसाच्या विश्रांतीनतंर भटकंतीचे वेध लागलेल्या आमच्या मावळ्यांनी  १९ नोव्हेंबर २०१०  ला  लोहगडावर स्वारी करण्याचे ठरविले.रविवारी सकाळी निघुन मळवली गाठली.तेथुन पुढे भाजे लेण्यांकडे प्रथान केले.वातावरण व लोण्यांजवळील स्वच्छता पाहुन प्रसन्न वाटते.
रिफ्रेश होण्यासाठी आपल्या इतिहासाची साक्षीदार असलेली... आपल्या कोरीवपणानं अनेक काळ मागं घेऊन जाणारी... भल्यामोठ्या कातळात कोरलेली लेणी पाहाणे हाही अत्यंत सुंदर अनुभव आहे. विसापूरच्या पायथ्याशी भाजे लेणी जणू निवांतपणे भटक्यांची, अभ्यासकांची वाट बघत असल्यासारख्या उभ्या आहेत.पन्नास एक पायऱ्या पार करत वरती आल्यावर भाजेच्या लेण्यांतील मुख्य चैत्याच्यासमोर आपण येतो. इ. स. पूर्व दुसरं ते पहिल्या शतकांत भाजे लेणीची बांधणी झाली. मुख्य चैत्याचा दर्शनी भाग कोसळला असल्यानं तो उध्वस्त आहे. मात्र आतील अष्टकोनी स्तंभ, त्यावरील कोरीव कामं आणि चैत्यग्रह प्रेक्षणीय आहेत. मुख्य चैत्याच्या आतमध्ये द्वारपाल आणि ऐरावतारुढ इंद आणि सूर्य यांच्या प्रतिमा लक्ष आकर्षून घेतात. मुख्य चैत्याच्या दोन्ही बाजूला बौद्ध विहार असून सर्व चैत्य आणि विहार यांची संख्या १८ भरते. पाण्यासाठी दगडात टाकी कोरून खास व्यवस्था इथंच करण्यात आली आहे. या पाण्याच्या अनेक टाक्या अजून सुस्थितीत असल्याचं आश्चर्य वाटत रहातं.चैत्य आणि विहार असे दोन्ही प्रकार इथे दिसतात. मुख्य चैत्यगृह भव्य आहे. स्तंभावर कलाकुसर आणि दरवाजावरचं चैत्यतोरण लक्ष वेधून घेतं. अनेक लेणी दुमजली आहेत. पुढची काही लेणी अर्धवट कोरून सोडून दिलेली दिसतात. दक्षिणेकडे प्रचंड मोठा धबधबा आहे.सूर्यगुंफा हे भाजे लेण्यांचं खास वैशिष्ट्य. या गुंफेत रथारूढ आणि गजारूढ योद्ध्यांचे प्रसंग चितारलेत. कार्ले आणि भाजे या दोन्ही ठिकाणी ब्राह्माणी लिपीत कोरलेले शिलालेख आढळतात.
भाजे लेण्यांवरूनच एक रस्ता लोहगड विसापूर किल्ल्यांकडे जातो. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांमध्ये थोडं अंतर असलं तरी ते एकमेकांना खेटून असल्यासारखे उभे आहेत.तासभराच्या पायपीटीनंतर लोहगड विसापूरच्या खिंडीत येऊन पोहोचतो. डाव्या हाताला जाणारी वाट विसापूरकडे जाते तर उजव्या हाताने मळलेली वाट थेट लोहगडवर जाते. सह्यादीतल्या मांडवी डोंगररांगेतलं व बोरघाटाचं राखणदार असलेलं लोहगड (स.स.पासून 3412 फूट) व विसापूर (स.स. पासून 3567 फूट) हे किल्ले मळवलीपासून जवळ आहेत.मोठमोठ्या वृक्षांनी वेढलेल्या या वाटेवरुन जाताना अनोखा आनंद होतो. गड चढण्यास पायऱ्या असल्याने लहान मुलांना बिनधास्त नेता येतं. प्रथम लागतो, तो गणेश दरवाजा. इथून थोडं पुढे गेल्यावर नारायण दरवाजा येतो. इथेच दोन भुयारं दिसतात. या भुयारात भात आणि नाचणीचं धान्य कोठार होतं. पुढे येतो तो हनुमान दरवाजा आणि शेवटी मुख्य महाद्वार. हे चारही दरवाजे सुरळीत आणि कोरीव मूर्त्यांनी नटलेले असल्याने आपल्याला इथेच खिळवून ठेवतात. गडाच्या पायथ्याला लोहगडवाडी आहे. वाडीच्या वरच्या अंगाला उजवीकडे किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी देखणी असून उत्तम स्थितीत आहे. वाडीतून गेल्यावर गणेश नारायण हनुमान असे दरवाजे पार करत आपण शेवटी महादरवाजात पोहोचतो. गडावर एक मोठं तळं आहे. तटबंदीचे दगड वारा-पावसाच्या मा-यामुळे कमकुवत झालेले असतात. त्यावर पाय पडताच हलून आपला तोल जाऊ शकतो. कड्यावरची मातीदेखील कधी फसवेल याचा भरवसा नाही.

महादरवाज्यातून मुख्य गडावर प्रवेश करताच समोर मशिदीसारखी इमारत दिसते. इथून तटाशेजारून जाताना टेकडीखाली प्रशस्त गुहा दिसते. या गुहेला लोमेश ऋषींची गुहा म्हणून ओळखलं जातं. ही गुहा मोठी असल्याने मुक्कामासाठी उत्तम आहे. गुहेशेजारीच पिण्याच्या पाण्याचं तळं आहे. टेकडीवर तळे, वाड्यांचे अवशेष अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात. तिथलं त्रिंबकेश्वर महादेवाचं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं.

इथून गडाच्या पश्चिम दिशेला चालत गेल्यावर विंचवाच्या नांगीसारखा कडा नजरेस पडतो. कड्यावरच पाण्याचे टाके दिसतात. याच कड्यावरून संपूर्ण गडाच्या तटांवर नजर ठेवता येते. लढाईप्रसंगी गडाच्या रक्षणासाठी या कड्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे. या विंचूकड्याच्या नैऋत्येला उंबरखिंडीत शाहिस्तेखानाचा सरदार करतलब खानाची मराठ्यांनी कोंडी केली आणि त्याला पिटाळून लावलं, असा इतिहास आहे. 
  
लोहगड १६५७ च्या सुमारास स्वराज्यात सामील झाला. तर इ. स. १६६४ मध्ये सुरतेहून आणलेली लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर ठेवली होती. तेव्हा या गडाचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येतं. तर पुढे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मोघलांना देण्यात आले. त्यात लोहगडही सामील होता. पुढे १३ मे १६७० रोजी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला.
गडावरुन पवना घरणाचा सुदंर देखावा पाहता येतो. खुपसे गड या गडावरुन दिसतात.
निसर्गाने परिपूर्ण, रानावनांनी नटलेल्या, वेलीफुलांनी वेढलेल्या लोहगडाला या पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यात वेगळीच मजा असते.पाउस,वेगाच्या वा-या व घुक्यातुन वाट काढीत गडावर स्वारी करणे एक आव्हान असते.

1 comment:

  1. छान माहिती व फोटो.

    www.ferfatka.blogspot.in

    ReplyDelete