Saturday, October 13, 2012

गिरीभ्रमणाला जाण्यापूर्वीची तयारी


एकदा की गिरिभ्रमणाचे ठिकाण निश्चित झाले की आम्ही आमच्या कामाला लागतो. त्याबद्दल जी काही माहिती मिळते तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न करतो. यामध्ये प्रवासाची साधने, पोचण्याचा रस्ता, रस्त्याची स्थिती, प्रवासाला आणि ट्रेकला लागणारा वेळ, ऋतूनिहाय असणारे पोचण्याचे मार्ग किंवा वाटा (काही वाटा पावसाळ्यात बंद होतात), खाण्याची सोय होणाऱ्या जागा, पाण्याची उपलब्धता अशा माहितीचा समावेश असतो. आमचा माहितीचा प्रमुख स्त्रोत असतो जे लोक तिथे आधी जाऊन आलेत त्यांनी लिहिलेले ब्लॉग्ज. हे ब्लॉग्ज नेहमीच अशा ठिकाणांची एकदम ’फर्स्ट हॅंड’ माहिती देतात. पुढचा कळीचा मुद्दा असतो पाणी आणि अन्नाची उपलब्धता आणि गरज असेल तर मुक्कामाची व्यवस्था. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत याची पूर्ण कल्पना घरी देऊन ठेवलेली असते. ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या मेंबर्सचे मोबाईल नंबर घरी लिहून ठेवतो.

पॅकिंग म्हणजे ट्रेकसाठी तयार होणे. चांगल्या उत्कृष्ट प्रतीची सॅक ही ट्रेकिंगची पहिली गरज. त्यात भरलेले सगळे साहित्य पटकन सापडावे अशी ही सॅक असावी. जर ट्रेकच्या दरम्यान मुक्कामाचा बेत असेल तर मुक्कामाची सोय आणि पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे असते. जर ह मुक्काम खुल्या आकाशाखाली तारे मोजत करणार असू तर जंगली जनावरे, साप, विंचू अशा सरिसृप प्राण्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. जरी बेडिंग स्लीपिंग बॅगसारखे भारी नसले तरी ते परिपूर्ण असावे. बॅगमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणजे एक लहानसा चाकू (सेफ्टी नाइफ, आर्मी नाइफ उत्तम), टॉर्च, एक्स्ट्रा बॅटरी (सेल), काडीपेटी, मोबाईल फोन, प्रथमोपचार साहित्य, काडीपेटी, पाण्याच्या बाटल्या, हलके खाण्याचे पदार्थ, त्वरित शक्तिकारक ऊर्जा देणारे ग्लुकॉन-डी सारखे द्रव्ये, ग्लुकोजची बिस्किटे. उत्तम प्रतीचे बूट अत्यावश्यक (फ्लोटर्स नाही, प्लीज). जर पावसाळ्याचे दिवस असतील तर सगळे पॅकिंग पाणी जाणार नाही, साहित्य भिजणार नाही अशा रीतीने केलेले असावे. शक्यतो वेगवेगळ्या ऑपरेटर्सची सर्व्हिस असणारे मोबाईल असावेत (टट इंडिकॉमचे नेटवर्क थोडेफार का होईना, पण सगळीकडे मिळते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आणि ते स्वस्तही आहेत. इथे आमचा कुणाचीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही).

महाराष्ट्राचे गड-कोट-किल्ले हे मोठ्या शहरांपासून शक्यतो सहजासहजी पोचता येईल असे नाहीत (काही सन्माननीय अपवाद वगळता). म्हणून आम्ही त्या परिसराची आणि रस्त्याची पूर्ण माहिती काढतो. प्रवास सार्वजनिक बससेवेचा उपयोग होणार असेल तर त्याचे वेळापत्रक आधी माहीत असावे. बहुधा आमचा प्रवास स्वतःच्या बाईकवर किंवा कारने होतो. बाईक असेल तर पहिला (खरं तर नियम क्रमांक ०) असतो हेल्मेट कंपल्सरी. वेळेला आम्ही हेल्मेट नसणाऱ्या मित्रांसाठी हेल्मेट्स कुठूनतरी पैदा करतो. आणि कधी हेल्मेट नसेल तर तो मेंबर नाकारतोही. पुढची गोष्ट असते त्या ठिकाणी पोचण्याचा कमीत कमी दूरचा, चांगल्या अवस्थेतला रस्ता शोधून कढणे. प्रवासाचा प्लॅन असा आखतो की रात्री गाडी चालवायला लागू नये. रस्ताच्या स्थितीचा अंदाज घेऊन तिथे पोचण्याच्या वेळेचे गणित मांडणे पण महत्वाचे. गाडीत पेट्रोलची पातळी, टायरमध्ये योग्य हवा या गोष्टी आधीच चेक केल्या जातात. विशेषतः टायरच्या ट्रेड्समध्ये फसलेले खडे आणि इतर गोष्टी कढून टाकतो, कारण याच गोष्टी नंतर गाडी पंक्चर होण्यास कारणीभूत ठरतात. आम्ही आमच्या आमच्यात किंवा रस्त्यावरील इतर गाड्यांशी कधीही स्पर्धा करत नाही. प्रत्येक वेळी मागे बसणारा मित्र गाडी चालवणाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवून असतो आणि अतिवेग किंवा जास्त आगाऊपणाबद्दल सावधान करत असतो. तसेच ओव्हरटेक करताना मागून येणारी वाहने सुरक्षित अंतरावर आहेत आणि ओव्हरटेक सुरक्षितपणे होईल यावर लक्ष ठेवून असतात. कारण आरशात पाहून मागून येणाऱ्या गाडीचा अंदाज येणे अवघड असते. गाडी चालवताना सगळे इशारे (इंडिकेटर्स, हाताचे इशारे) व्यवस्थित दिले जातात. आम्ही नेहमीच वाहतुकीचे नियम पाळतो, नव्हे आम्हाला त्याचा अभिमान आहे.

आम्ही जेव्हा पायथ्याला पोचतो तेव्हा पुन्हा एकदा खाली गावात वरपर्यंत पोचण्याचा रस्ता विचारून घेतो. स्थानिक लोकांशी नेहमी सलोख्याचे संबंध ठेवतो, कारण वेळ पडली तर कठीण प्रसंगी तेच आपल्याला मदत करणार असतात. मावशी, ताई, भाऊ, काका, मामा असे सगळे शब्द त्यावेळी उपयोगी पडतात. त्यांच्याकडे असणाऱ्या महितीबद्दल त्यांना अभिमान वाटेल असेच वर्तन आम्ही राखतो. प्रत्यक्ष चढाई करताना सावकाश पण स्थिर वेग राखणे आवश्यक असते. वेळोवेळी मागे वळून पाहून काही खुणा लक्षात ठेवतो. म्हणजे त्या खुणा परत येताना किंवा वाट चुकली तर बॅकट्रॅकिंग करताना उपयोगी पडतात. जर मोबाईलला कव्हरेज नसेल तर आम्ही तो ऑफलाईन किंवा बंद ठेवतो, कारण नेटवर्क शोधत राहणारा फोन जास्त बॅटरी खातो. शक्यतो आम्ही मोबाईलवर गाणी ऐकत नाही. कारण हिप-हॉप आणि धूमधडामपेक्षा भन्नाट रानवारा आणि वादळाचे ढोल जास्त इंटरेस्टिंग असतात. आणि ते बॅटरीपण वाचवतात. आम्ही अगदी अशक्य जागांवर पोचण्याचा कधीही प्रयत्न करत नाही किंवा तसे करण्यास कुणाला आव्हान देऊन उद्युक्त करत नाही. उलटपक्षी जर एखादी जागा थोडीसुद्धा धोकादायक असेल तर सगळ्यांना तिकडे जाण्यापासून परावृत्त करतो. अतिउत्साही मित्रांना परवृत्त करण्यासाठी साम, दंड, भेद (दाम नसतो) अशा सर्व मार्गांचा अवलंब करतो. पण शेवटी ट्रेकमधे धाडस, साहस आणि कॅल्क्युलेटेड रिस्क अशा गोष्टी अनिवार्य असतात. मग असे काही प्रयत्न करण्याजोगे असतील तर ग्रुप लीडर इतरांच्या मदतीने आधी करतो आणि मग इतरांना तिथे पोचायला मदत करतो. सर्वजण ट्रेकला एक टीम म्हणून गेलो होतो आणि एक टीम म्हणूनच ट्रेक पूर्ण करायचा असतो. वेगवेगळ्या ऋतुंध्ये एकच ट्रेक वेगवेगळा असू शकतो. पावसाळ्यात एखाद्या ट्रेकमधे खडक शेवाळलेले असु शकतात आणि हिवाळ्यानंतर गवत-झुडुपांचे कमजोर आधार नवी आव्हाने उभी करू शकतात. या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. आम्ही रांगड्या सह्याद्रीचे आणि निसर्गाचे प्रत्येक पैलू मनापासून एंजॉय करतो, पण त्याला कधीही आव्हान देत नाही. काही श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कड्यांवरुन खाली पाहताना पोटावर झोपून पाहणे किंवा खाली झुकून दबकत चालणे हितावह असते, कारण त्यामुळे आपला गुरुत्वमध्य जमिनीपासून कमीत कमी उंचीवर राहतो आणि तोल सहजासहजी जात नाही. दरीच्या कडेवर किंवा उंच कड्यावर कधीही सरळ विना-आधार उभे राहू नये कारण डोळे गरगरल्यामुळे किंवा वेगवान वाऱ्यामुळे तोल जाण्याचा धोका संभवतो.

पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी आम्ही मुक्कामाची जागा गाठतो आणि ती जागा साफ करून घेतो. त्यामुळे साप किंवा इतर कीटकांचा धोका दिवसाउजेडीच ओळखू येतो. एक काठी नेहमी बरोबर ठेवतो. नसेल तर तिथे पोचल्यावर शोधतो. अंधारात कधीही एकटे बाहेर पडत नाही. ३-४ च्या गटाने एकत्र बाहेर पडून बरोबर टॉर्च आणि काठी घेऊन जातो. मुक्कामाच्या जागी (कँपसाईटवर) नेहमी रात्री आग पेटवून ठेवतो. नशिबाने माझ्या भटक्या टोळीच्या एकाही सदस्याला हरवून जाण्यासाठी किंवा ’ट्रान्स’ मिळवण्यासाठी मद्याची गरज पडत नाही. सह्याद्रीचा गुणच असा आहे की आपोआपच तुम्हांला एक वेगळी नशा चढते.

बऱ्याच किल्ल्यांवर पाण्याचे टाके किंवा विहीर असते. ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते आधी पाहून घ्यावे. अधिक दक्षता म्हणून ते पाणी उकळून घ्यावे किंवा लिक्वीड क्लोरीन वापरावे. त्या पाण्यामध्ये पोहणे टाळावे कारण आपल्यानंतर दुसरेही कुणी पाणी पिणार असते आणि शिवाय त्यात लपलेले साप, पाणकीटक असे धोके असू शकतात. खाले गाळात रुतून बसण्याचा आणि अतिखोल पाणी असण्याचाही धोका नाकारता येत नाही. जर समुद्राचे पाणे असेल तर त्या गावातील स्थानिक लोकांना विचारून भरती-ओहोटीच्या वेळेची पूर्ण माहिती करुन घ्यावी. समुद्रात पोहणे शक्यतो टाळावेच. किनाऱ्यावर लावलेले धोकादर्शक बावटे आणि त्याचे अर्थ समजून घेऊन पाण्यात खेळावे.

कॅंपसाईट स्वच्छ करावी. आपले सगळे प्लॅस्टिक शहरात घेऊन यावे. आम्ही जैविक विघटण होणारा कचऱ्याची मात्र तिथे एका कोपऱ्यात विल्हेवाट लावतो हे सरळ सरळ कबूल करतो. ते ठिकाण पूर्वस्थितीत आणण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करतो. शक्यतो पेटवलेल्या आगीच्या राखेशिवाय मागे काहीही ठेवू नये. तिथली जैविक साखळी आणि पर्यावरणाला हानी पोचेल असे काहीही टाकू नये.

ट्रेक्स हे थ्रिलिंग असतात. आपल्याला ताजेतवाने करतात. पण सुरक्षितपणे डोळे उघडे ठेवून केले तरच. सुरक्षित रहा, आणि इतरांना त्यासाठी प्रोत्साहन द्या. सुरक्षित आणि स्वच्छ ट्रेकबद्दल जागृती करा. नवी आव्हाने स्वीकारा, पण निसर्गाला आव्हान देऊ नका. निसर्गावर प्रेम करा, त्याची पूजा करा. सह्याद्री आपली शान आणि मानबिंदू आहे, त्याला जपा.

No comments:

Post a Comment