Thursday, December 6, 2012

अक्षर भ्रमंती


किल्ल्यांचा इतिहास.


छत्रपती शिवरायांच्या दुर्गाचे विज्ञान, मराठय़ांचे आरमार, किल्ल्यांवरील जलसाठे, किल्ल्यांवरील वनस्पती वैभव, निसर्गचक्र, देवराई, पुष्पपठारे, पक्षी गोतावळा, जीवसृष्टीचा शोध, ज्वालामुखी, लोणार, ताडोबा, घारापुरी, रायगड, हिमालय आणि एव्हरेस्ट हे आमचे खरेतर नेहमीचे भटकंतीचे विषय, पण यंदा या विषयांनी काही दिवाळी अंकदेखील सजले आहेत. 
ट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर कालपरवापर्यंत चाचपडत प्रवास, भ्रमंती करत होती. माहितीचा अभाव, साहित्य-सुविधांची वानवा, अभ्यासू दृष्टिकोन नसणे अशी अनेक कारणे त्यामागे होती. पण आता या विषयातही अनेक अभ्यासक पुढे येऊ लागले आहेत, पुस्तकांपासून-माहितीपर्यंत ज्ञानार्जनाची अनेक साधने तयार होऊ लागली आहेत. यातीलच एक नवे पाऊल म्हणजे यंदाच्या दिवाळी अंकाकडे पाहावे लागेल. हे एकेक विशेषांक म्हणजे भटकंतीच्या विश्वातील संग्राहय़ दालने ठरावीत अशी आहेत. यातीलच काही अंकांचा हा परिचय.

दुर्गाच्या देशातून


संदीप तापकीर आणि गणेश खंडाळे या जोडगोळीने तयार केलेला 'दुर्गाच्या देशातून' या अंकाची यामध्ये पहिल्यांदा दखल घ्यावी लागेल. प्रत्यक्ष डोंगरदऱ्या, गडकोटांवर हिंडणाऱ्या या दुर्गप्रेमींनी बनवलेला हा अंक महाराष्ट्राच्या या दुर्गवैभवाची खोलवर ओळख करून देतो. 
अंकातील पहिलेच प्रकरण 'किल्ल्यांचा सातबारा' हे दुर्गाच्या उत्पत्तीपासून ते त्याच्या पुढील प्रवासापर्यंत सारी माहिती यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लेखाद्वारे किल्ल्यांच्या या प्रदेशात आपण प्रवेश करतो. मग यानंतर मुंबई, कोकण, गोवा, विदर्भ, खान्देश आदी भागांतील किल्ले, या किल्ल्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्टय़े यातून उलगडत जातात. गडकिल्ल्यांवरील इमारती, वनश्री, द्वारशिल्पं आदी गोष्टींवर या अंकात स्वतंत्र प्रकरणे देऊन ज्ञानात भर घातली आहे. 'ट्रेकिंग'च्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत आपल्याकडे दुर्गभ्रमंतीचे वेड मोठय़ा प्रमाणात रुजले आहे. यातीलच काही बागलाण, कळसूबाई, पावनखिंड-विशाळगड अशा आगळय़ावेगळय़ा मोहिमांची माहिती यामध्ये मिळते. काही अपरिचित जलदुर्गही इथे त्यांचा परिचय देतात. सध्या अनेक गडांवर सुरू असलेली संवर्धनाच्या कामांनाही या अंकात स्थान दिलेले आहे. किल्ल्यांच्या माहितीबरोबरच या दुर्गाच्या प्रदेशात फिरणाऱ्या 'ट्रेकिंग' विश्वावरही या अंकात माहिती देण्यात आलेली आहे. 

विश्रांती
निसर्ग आणि पर्यावरणाला वाहिलेला हा अंक भटकंतीच्या विश्वात रमणाऱ्यांना मोठी माहिती पुरवतो. दरवर्षी एखादा विषय घेऊन 'विश्रांती'चा दिवाळी अंक सजत असतो. आजवर वस्त्र, पाषाण, काष्ठ, घरातील भांडी असे विषय हाताळून झालेले आहेत. यंदाच्या वर्षी 'विश्रांती'ने विषय निवडला आहे, तो- निसर्ग! 
भौतिक सुखांना चटावलेल्या आणि अमर्याद हव्यासात अडकलेला माणूस सध्या या निसर्गाचे लचके तोडत चालला आहे. दुसरीकडे निसर्गाची ही हानी वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना, चळवळींचे कार्यही जोर धरू पाहात आहे. यातीलच एक पाऊल म्हणजे 'विश्रांती'चा हा अंक होय. 'निसर्गायन' हे याचे टोपणनाव. किडय़ा-मुंगीपासून वाघापर्यंत आणि शेवाळापासून वटवृक्षापर्यंत असंख्य घटकांची ही गुंतागुंत या अंकातून उलगडते. ट्रेकिंग करताना, निसर्गात भटकताना हे सारे घटक सतत सामोरे येत असतात. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याविषयी आपल्या ज्ञानात शास्त्रीय माहितीची भर घालणारा हा अंक आहे. वनस्पतीचे नातेसंबंध- व्ही. जी. कुलकर्णी, मधमाश्यांचे अजब स्नेहबंध- क. कृ. क्षीरसागर, दृष्टिआडची सृष्टी- माधव पेंडसे, सागपान कुरतडणारा पतंग आणि वाघ- माधव गोगटे, देशी विरुद्ध परदेशी वनस्पती- श्री. द. महाजन, नाते समुद्राशी- श्रीकांत कार्लेकर, बुरशी आणि वनस्पतींचे नातेसंबंध- डॉ. कांचनगंगा गंधे हे यातील लेख निसर्गाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवतात. शुभांगना अत्रे त्यांच्या 'मानव आणि निसर्ग' या लेखातून द्वैत-अद्वैताचा आदिबंध जसा शोधतात तसेच विलास गोगटेही त्यांच्या लेखातून निसर्गाचे अनेक पदर उलगडून दाखवतात. हेमा सानेंनी निसर्गाची कहाणी जशी मांडली आहे तसेच श्री. द. महाजनांच्या अन्य एका 'वसुधैव कुटुंबकम्'मध्ये निसर्गातील अनेक घटकांची जोडणी प्रगट झाली आहे. देवराई (अर्चना गोडबोले), रानभाज्या (प्र. के. घाणेकर), कासचे पठार (डॉ. संदीप श्रोत्री, बी. जी. कुलकर्णी), जंगल आणि आदिवासी (तुकाराम रोंगटे) आदींनी वेगळे विषय पुढय़ात उभे केले आहेत. कुठल्याही भटकंतीचे घर हा आमचा निसर्ग आहे. मग अशा या निसर्गाच्या घरात शिरण्यापूर्वी त्याची ओळख करून घेण्यासाठी हा अंक उपयोगी पडणारा आहे.

किल्ला

उत्कृष्ठ छपाई, उत्तम छायाचित्रे आणि अनेक अभ्यासपूर्ण लेखांमधून साकार झालेला 'किल्ला' हा विशेषांक यंदा 'भटक्यां'साठी एक भेट ठरलेला आहे. आमच्याकडची बहुतांश भटकंती ही या गडकिल्ल्यांच्या आश्रयाने सुरू असते. या पाश्र्वभूमीवर किल्ला हा विषय घेऊन सजलेला हा अंक या प्रांतातील मोठी माहिती देतो. किल्ल्यांचा इतिहास, त्याची वैशिष्टय़े, जतन, निसर्ग, साहस, पर्यटन, उत्सव आणि साहित्य अशा विविध अंगांना हा अंक स्पर्श करतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले (सुनील राज), किल्ल्यांचा इतिहास (रामेश्वर सावंत), दुर्गबांधणीचे तंत्र ( रमेश देसाई), सहय़ाद्रीच्या दुर्गम घाटवाटा (आनंद पाळंदे), रायगडाची सुरक्षा व्यवस्था (संजय महाशब्दे), किल्ल्यांवरील निसर्ग (श्रीकांत इंगळहळ्ळीकर), जगातील प्रेक्षणीय किल्ले (निनाद बेडेकर), सागरी संरक्षणातील किल्ल्यांचे महत्त्व (सुहास सोनवणे), किल्ल्यांचे जलव्यवस्थापन (हृषीकेश पाळंदे), आदी लेखांमधून किल्ला संकल्पनेविषयी मोठी माहिती मिळते. किल्ले आणि साहित्य या विभागात अभिजित बेल्हेकर यांनी आजवरच्या दुर्गसाहित्यावर चर्चा केली आहे. वरद लघाटे यांनी ई-बुक्सपासून ते आजच्या जमान्यातील संकेतस्थळ, फेसबुक, ब्लॉगवरून चालणारे किल्लेविषयक जागरण मांडले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा (समीर वारेकर), राजगड प्रदक्षिणा (प्रकाश कामत), आदी गडावरचे सोहळे, माऊंटन बायकिंग (रोहन टिल्लू), प्रतापगड, सुधागड, राजमाची, वसई गडांच्या जतन-संवर्धनाची कामे आदी दुर्गक्षेत्रातील उपक्रम या विषयाचे प्रेम वाढवतात. एकूणच किल्ले संस्कृती दृढ करणारा असा हा अंक आहे.

जिद्द


गिर्यारोहण-गिरिभ्रमण विषयाला वाहिलेला अंक अशी 'जिद्द'ची ओळख आता बरीच जुनी आहे. त्यांच्या या परंपरेला साजेसा असाच अंक त्यांनी यंदा काढलेला आहे. या अंकात शिवरायांचा 'दक्षिणदिग्विजय'ची माहिती देताना या प्रदेशाची भ्रमंती घडवलेली आहे. गडांवरील देवता (शिल्पा परब), अजिंक्यतारा (संदीप विचारे), दुर्गसंवर्धन (शिल्पा परब), रतनगड-सांदण घळ (गजानन परब) आदी लेख दुर्गभ्रमंतीचे प्रेम जागे करतात. एव्हरेस्टच्या वाटेवर (सुप्रिया चक्रवर्ती), उत्तुंग ध्येयपूर्तीचा आविष्कार (उमेश झिरपे), मेघालयातील गुहांच्या शोधात (धनंजय मदन), गडचिरोलीतील सायकल मोहीम (राहुल गोरवाडकर) आदी लेख साहसाला प्रवृत्त करतात.

No comments:

Post a Comment