Saturday, July 25, 2015

ट्रेकिंगमधली सावधानता




२५ जून च्या ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख



                                 येथे क्लिक करावे ==>>  ट्रेकिंगमधली सावधानता










      ट्रेकिंगमध्ये सावधानता बाळगावी.    
           ============================


     पावसाळा सुरु झाल्या झाल्या भटके  सह्याद्रीत जाण्यास 
उत्सुक  असतात. पावसाच्या  आगमनाचा  सर्वात आंनद या 
भटक्यांना होतो.आंनदाच्या भरात सुरक्षितता न बाळगल्याने
काही अपघात झाले आहे.निसर्गाच्या विपरीत धाडस प्राणांवर 
बेतू   शकते    याचे भान  प्रत्येक ट्रेकरने राखणे गरजेचे आहे.
नवख्या भटक्यांना सह्याद्रीतली माहिती नसल्याने अपघात 
होतात.विशेष  करून   पावसाळ्यात नवखी मंडळी उत्साहाने 
बाहेर  पडतात, तेव्हा धोका वाढतो. काही दुर्घटना तर अगदी 
क्षुल्लक   कारणांमुळे घडल्या आहेत. आपल्यातल्या क्षमता 
ओळखायला   हव्या.सुरक्षितता न  बाळगता धाडस केल्यास 
ते जीवावर बेतू शकते. प्रत्येकाने  आपली व आपल्या बरोबर 
आलेल्या  प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे.निसर्गाचा मान 
राखून    जर तुम्ही वावरलात तर ट्रेक करताना सहसा काही 
त्रास  होत नाही. निसर्गाच्या कुशीत आपण त्याने उधळेल्या 
सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जातो आहोत,त्याच्याशी स्पर्धा 
करायला नाही हे नेहमी लक्षात ठेवावे.   

 काही दिवसापूर्वी पनवेलजवळील ईर्शाळगडावरून पडल्याने 
चेंबूर   येथील   सिद्धार्थ   आर्य (२९) या गिर्यारोहकाचा मृत्यू 
झाला, असे    त्याच्या    मित्रांकडून,  तसेच स्थानिकांकडून 
सांगण्यात    आले.  सिद्धार्थ   आर्य हा आपल्या मित्रांसोबत 
ईर्शाळगडावर   गेला होता. साधारण १० जणांचा त्यांचा गट 
होता. रविवारी    सकाळी     आठच्या   सुमारास त्यांनी गड 
चढण्यास   सुरुवात  केली. गडावरील सुळका ते कोणत्याही 
सुरक्षा  साधनांशिवाय चढले व उतरले होते. त्यानंतर पुन्हा 
हा सुळका चढत असताना सिद्धार्थ खाली पडला. 

  परवाच   ’चंदेरी ’ वर जाताना एका गिर्यारोहकाचा संशयीत 
मृत्यु झाला आहे.अशा बातम्या वाचण्यात येते आहेत. 


  सुळके कोणत्याही साधनांशिवाय चढाई करणे धोकादायक 
असून    जीवाशी खेळ    ठरु    शकते.    सुळख्यांवर चढाई 
करण्यासाठी    प्रस्तारोहणाचे    प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. 


     एखादी     भटकंती     कमी  झाली  तरी चालेल, एखाद्या 
भटकंतीमध्ये छायाचित्रण करायला नाही मिळालं तरी चालेल 
पण  तुम्ही    जसे    गेलेलात   तसेच परत यायला हवे, इतर 
कुठच्याही     गोष्टीला    स्वतःच्या    आणि  तुमच्या सोबत 
भटकंतीला आलेल्या मित्राच्या सुरक्षेपेक्षा कमी महत्व द्या.


  बॅग भरताना, जास्तीचे जेवण- मुबलक पाणी- प्रथमोपचार 
पेटी    आणि  विजेरी न चुकता घ्यावी. "जेवण तिथे मिळेल, 
पाणी   गडावर असेल, दिवसा-उजेडी परतू" अश्या हिशोबात 
राहू नये. 

  ज्याठिकाणी     जाणार     आहोत, त्या ठिकाणची माहिती 
जाण्य़ापूर्वी   गोळा  करायची.यासाठी इंटरनेट, पुस्तके किंवा 
माहितीगार     असेल    तर त्याला विचारून त्या ठिकाणची 
टिप्पणे काढावीत. या   माहितीमध्ये  तेथील रस्ते,  वाहतूक, 
पाण्याची सोय,    राहण्याची सोय, जेवणाची सोय, हवामान, 
धोका,  आपत्कालीन  मदत व गाड्य़ांच्या वेळा या गोष्टींचा 
समावेश    असावा.अगोदर    जाऊन आलेल्यांकडून माहीती 
जमवावी.   जेथे   जाणार आहोत त्याचा एक कच्चा नकाशा 
जवळ ठेवावा.

  आपण   ट्रेकला कुठे जाणार आहोत हे   आपल्या घरच्यांना 
माहित असणे   गरजेचे आहे.आपल्या सोबत  येणाऱ्या दोन - 
तीन    मित्रांचा   नंबर घरी दिला तर त्यांना संपर्क करण्यास 
सोईचे   होईल.

    मुख्य     म्हणजे पावसाळ्यात   सगळ्या वाटा निसरड्या 
झालेल्या असतात. तेव्हा   तीव्र  स्वरूपाचा उतार असेल,उंच 
कडा असेल तर अशा ठिकाणी जास्त सावधगिरी बाळगावी. 

  ट्रेकिंगमध्ये   कुणाचीही कुणाशी स्पर्धा नसते. एखादा मागे 
राहिला तर त्याला हिणवू नये.वेगात पुढे जाण्याच्या स्पर्धेला 
अजिबात प्रोत्साहन देऊ नये.

    जर    एखाद्या     ठिकाणी    चालणे अवघड वाटत असेल, 
रस्ता धोकादायक वाटत असेल तर अशा ठिकाणाहून माघारी 
परत फिरणे हे    शहाणपणाचे  ठरते. अपघात  होऊन जखमी 
होण्यापेक्षा माघारी   येऊन    निसर्गाचा    आनंद लुटता येतो. 
एक लक्षात   ठेवावं   की,   डोंगरात        अपघात झाला, तर 
त्याठिकाणी     बचाव   कार्य करणं खूप अवघड गोष्ट असते. 
वैद्यकीय   सुविधा वेळेवर पोहचवणं शक्य होत नाही, तेव्हा 
आपणच काळजी घेतलेली बरी. 

    काही वेळेला तुम्ही एखादा ओढा किंवा नदी सहजपणे पार 
करून   जाता  पण परतताना पाऊस नसतानासुद्धा पाण्याचा 
प्रवाह  वाढताना  दिसतो. वरच्या भागात जोरदार पाऊस सुरू 
असेल    तर   असे प्रवाह ओलांडताना काळजी घ्यायला हवी. 
पाणी    कमी    आहे  म्हणून अती धाडस करू नये. अचानक 
ओढय़ाचे  किंवा नदीचे पाणी वाढण्याची शक्यता असते.

   एखादा    ट्रेक ग्रुपमधील कोणीच केला नसेल तर गावातील 
माहितीगार सोबत नेल्यास सोईचे ठरते तसेच वाट चुकण्याचा 
प्रश्नच उरत नाही.

  शक्यतो जास्त मळलेली पायवाट धरावी, अनावश्यक शोर्टकट 
टाळावेत.   काही   वेळा धुक्यामुळे वाट सापडत नाही अशावेळी 
गोंधळून   न  जाता काही खुणा (पाटी, बाण,वगैरे दिशा सूचक ) 
दिसतात का ते पाहावे. 

     अवघड ट्रेकमध्ये अवजड कॅमेरे आणि लेन्सचे साहित्य नेवू 
नये. ते साहित्य सांभाळण्याचा त्रास होतो.

   डोंगरात     रात्री     मुक्काम   असेल तर अंधार होण्याआधी 
मुक्कामाची जागा निवडावी.  झोपायला टेंट असेल तर उत्तम, 
विंचू  -   काट्याची      भीती     राहत   नाहीत, टेंट नसेल तर
मुक्कामासाठीच्या    जागेचा   प्रत्येक   कोपरा काठी आपटून 
तपासून घ्यावा, साप- विंचू- गोम किंवा तत्सम विषारी प्राणी 
असू शकतो. 

   तहान लागल्यास प्रथम पाठीवरची बॅग काढून ठेवावी अन 
खाली बसून (व्यवस्थित जागा पाहुन) एक / दोन घोट पाणी 
प्यावे.दम लागल्यास तर श्वास हळू होउ दया मग पाणी प्या.

    दीर्घ    पल्ल्याचे  ट्रेक एक तर पहाटे सुरुवात करावी.नाही 
जमल्यास अंधार   पडायच्या   आत सुरक्षित जागी पोहचावे. 
  
     प्रथमोपचार   किट बरोबर नेहमी ठेवावे.त्यामध्ये डेटॉल,
बोरोलीन,    रेलिस्प्रे,   विक्स ,   कॉटन अन बैंडेज पट्टी असे 
छोटेखानी कीट प्रत्येक भटक्याने ठेवावे. ब्लीडिंग झाल्यास 
ते रोखायला लगेच कापूस लावू नका ,पहिले जखम स्वच्छ 
पाणी ने धुवा ,झऱ्याच पाणी सुद्धा चालेल. 


    अतिघाई संकटात नेई.ग्रुप मध्ये अशी टाळकी असतातच 
की नेते बनायला जातात. त्याना रोखा.


  चालताना पायाने दगड   खाली ढकलू नका.वरुन एखादा दगड 
पायाने     निसटला  तर  "watch out!" म्हणायला विसरु नका. 
उगाच बोम्बलू नका.

   जंगली      सरपटणाऱ्या     प्राणी - कीटकांची योग्य माहिती 
असल्याशिवाय    हातात  घेवून छायाचित्रण करू नये. सापांचे 
छायाचित्रण अगदी जवळ जाऊन करू नये.

 पावसाळ्यात पायवाटा आणि हिवाळ्यात दव पडल्याने वाळलेलं 
गवत     कमालीचं     निसरडं   होतं. तेंव्हा पावसाळयात आणि 
वाळलेल्या गवतावर अगदी जपून चालावं. 

   चांगल्या ग्रीपचे बूट भटकंतीमध्ये खूप महत्वाचे.
 
   चहा-जेवण्यासाठी चूल किंवा शेकोटी पेटवताना आसपास मोहोळ 
नाही ना याची शहानिशा करून घ्यावी,धुराने चिडलेल्या मधमाश्या 
हल्ला करू शकतात.जेवण बनल्यावर    चूल व्यवस्थित विझवावी,
चुलीत आग धुसमसत   असेल  तर वाऱ्याने ठिणगी उडून अघटीत 
घटना घडू शकते.

    प्रत्येक भटकंतीमध्ये किमान ५०-६० फुटी दोर बाळगावा,५०-६० 
फुटी छोटे वाटणारे कडे सुद्धा    धोका  देऊ शकतात. असे कडे चढून 
गेल्यावर    काही     ठिकाणी    अडकता. पुढे किंवा मागे फिरणे ही 
अश्यक्य होऊन जाते आणि अपघात घडतात. छोटा दोर असेल तर
असे कडे पार करायला फारसा त्रास होत नाही. 

   सगळ्यात महत्वाचे दारू किंवा कसलंही व्यसन कधीही वाईटचं, 
डोंगरात   तर ते सर्वात वाईट.नशेत अपघाताचे प्रमाणे कित्त्येक 
पटीने  वाढते. डोंगरात कसलंही व्यसन करू नका, करू देऊ नका. 

  सगळ्यात महत्वाचे डोंगरवाटेवर शक्यतो आपला ग्रुप   सोडू नये. 
अशा काही खबरदारीच्या गोष्टी करणे सहजशक्य आहे. 

  अपूर्ण माहिती,अतिउत्साह टाळला व खबरदारी घेतेली तर आपला 
ट्रेक  नक्कीच आनंददायी आणि अविस्मरणीय राहील. ट्रेकिंगमध्ये 
सावधानता बाळगल्यास ट्रेकिंगची मजा घेता येते.  


No comments:

Post a Comment