Saturday, September 5, 2015

तांदूळगडाची मोहीम







                                                       येथे क्लिक करावे ==>>  तांदुळगड मोहिम








                                               तांदूळगडाची मोहीम
                     


 महाराष्ट्राची भूमी हि गड किल्ल्यांची भूमी आहे.काही किल्ले हे  आजही त्यांच्या छोट्या आकारामुळे , दुर्गमतेमुळे अथवा तेथे  काही महत्त्वाच्या घडामोडी न झाल्यामुळे दुर्लक्षित आहेत.त्याच  क्षेणीतला दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून  आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड.समुद्र  सपाटीपासून १८०० फुट उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या  उत्तर रांगांमध्ये येतो.एकदिवसीय पिकनिकला जाणे सर्वच  पसंत करतात. अशाच ट्रेकिंग प्रेमींसाठी मुंबईपासून एका  तासाच्या अंतरावर असलेला सफाळे येथील 'तांदूळवाडीचा  किल्ला' हे एक उत्तम ठिकाण आहे. 








  तांदुळवाडी किल्ल्यावर जाण्यासाठी आपण मुंबई अहमदाबाद  महामार्गावरील वरई फाट्यावरून आत वळावे आणि लालठाण  गाठावे अथवा सफाळे रेल्वे स्थाकापासून लालठाण गाठावे. रेल्वेने याचे झाल्यास पश्चिम रेल्वेचे सफ़ाळे स्थानकात उतरून  एसटी बस किंवा रीक्षाने तांदुळवाडी गाव गाठता येथे.लालठाण  आणि किवा तांदुळवाडी या गावातून आपल्याला गडावर जाता येते.  






               गावाला लागून असलेल्या सुंदर तलावाला वळसा घालून चढायला सुरुवात करावी   लागते.पाऊस नव्हता व चांगले ऊन पडले होते. त्यामुळे खुपच गरम होत होते.घामाच्या  धारा लागल्या होत्या. पुढील  वाट मस्त दाट जंगलातली व उभी चढण होती.जंगलातून जाणारया 
वाटेने आम्ही थेट एका पठारापाशी येऊन पोहोचलो. या पठारावर  छोट्या-छोट्या दगडांचा ढीग जमा झाला होता.काही वेळेतच त्या  सुळक्यावर जाणारी चढण सुरु होते. अन हळू हळू पाउल टाकत अन  निसर्गाच विस्तीर्ण मनमोहक दृश्य पाहत , थंडगार हवेचा जोरदार  मारा खात पुढे पुढे सरत राहतो. 






    थोड्या चढावानंतर माथा थोडा जवळ आल्याचा आनंदात पाउले  पुढे पडत होती.पुढे दोन,तीन चढणीचे टप्पे पार करत करत अन  उभ्या पण छोट्या मोठ्या खाच्या असलेल्या,चढण्यास सोप्या 
असलेल्या त्या कातळावरून आपण पुढे सरतो.पावसाचा शिडकावा  होतो.हवेत गारवा आल्याने गडावर चढण्यास हुरुप आला.थकवा दूर  गेला. गवतांच्या पात्यातून मळलेल्या वाटेने गडावर पोहोचतो. धोषणा व जल्लोष होतो.सभोवतालच्या हिरवागार प्रदेशाचा मस्त  नजारा,पाउस आणि धुक्याच थंड आल्हाददायक वातावरण हयामुळे  मला जो आनंद झाला तो शब्दात काय सांगु पण एक मात्र नक्की  तिथे आतापर्यंत आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला होता.मी  मनोमन ट्रेक वसुल झाल्याच स्वत:शीच जाहीर केले.






  पठारावरील हिरव्या रंगाची उधळण मन वेधणारी होती.तिथे एक  मध्येच एक वेगळच पान नसलेले झाड दिसले. तिथुन काही अंतर  कापल्यावर आम्हाला   पाण्याच्या टाक्या लागल्या.हया टाक्या  बारा महिने पाण्याने भरल्या असतात.तसेच काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष  आहेत.गडावर अनेक उध्वस्त अवशेष आहेत. पाणी मात्र मुबलक आहे. 







खाली वैतरणा नदीचे दुथडी भरून वाहणारे नागमोडी पात्र,खाली  असणारी वेगवेगळी  गाव,हिरवीगार आखीव शेत,दुरवर  दिसणारया डोंगररांगा हयांच विहंगम दृश्य पाहायला मिळत होते. गडाच्या दुस-या वाटेने उतरलो.या वाटेवर घनदाट रान होते.







सुमारे अठरशे फूट उंचीवर असलेल्या मराठे, पोर्तुगीज, इंग्रज  हयांची सत्ता अनुभवलेल्या या किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर त्या  टाक्या सोडल्या तर ऐतिहासिक अश्या फ़ार कमी खुणा राहिल्या  आहेत.पण तिथुन इतर वेळी माहित नाही पण हया पावसाळ्यात  तरी निसर्गाच जे विलोभनीय दर्शन घडत ते खरच अवर्णनीय आहे.






या किल्ल्याचा इतिहास जरी मोठा नसला तरी इतिहास जाणून न  घेता, किल्ला पाहणे म्हणजे ओझी वाहाण्याचे काम. हा किल्ला  माहीमपासून सोळा किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला वसला  आहे. इतिहासात वैभवशाली असणारे शूर्पारक म्हणजे आताचे  नालासोपारा आणि महिकावती म्हणजे माहीम या नागरांवर  तेराव्या शतकात राजा भीमदेव यादव राज्य करत होते. त्यानंतर  अहमदाबादच्या सुलतानाने महिकावत सर केल्यामुळे या भागात   त्याचा अंमल सुरू झाला. या त्यापैकी एका बहादूरशहाने वसईत   बहादूरपूर गाव वसवले आणि मलिक अल्लाऊद्दिन नावाच्या  सरदाराला विसामागड आणि तांदूळवाडी किल्ल्याची किल्लेदारी  देण्यात आली. त्यानंतर या भागात पोर्तुगीज लोकांचे वर्चस्व  राहिलं होते. मग पुढे चिमाजी अप्पांनी त्यांच्या कोकण मोहिमेत  माहीम आणि वसईचा परिसर आपल्या ताब्यात घेऊन, या   ठिकाणी मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थपित केले. त्या काळात माहीमची  बाजारपेठ पाहता मोक्याचा  ठिकाणी तांदूळवाडी किल्ला वसला  आहे. आज जरी किल्ला भग्नावस्थेत असला तरी या  किल्ल्याने  मोठा इतिहास आपल्या कवेत सामावून घेतला आहे. कारण  किल्ल्याचे बांधकाम हे अगदी उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारं  आहे. तरीही हा किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे गरज आहे. 






No comments:

Post a Comment