Saturday, October 17, 2015

रायरेश्वर

१७ ऑक्टोबरच्या ’ प्रहार ’ या वृतपत्रात ’ शिवस्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर’ माझा लेख प्रसिध्द झाला आहे. 
                     


                                                  येथे क्लिक करावे ==>>  रायरेश्वर
                                रायरेश्वर 
 वयाच्या १५ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक,सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या  आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २६ एप्रिल १६४५  रोजी  स्वराज्याची शपथ घेतली.यामुळे किल्ल्यावरच्या रायरेश्वर  मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.यासाठी हा किल्ल्या  पाहण्याची इच्छा होती.  
"हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे शब्द ओठाबाहेर पडले... मंडळी  शब्दाला जागली आणि हिंदवी राज्य साकारले!"

पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यात हे रायरेश्वर! इथे यायचे असेल तर यासाठी पुण्याजवळचे भोर-आंबवडे करत रायरेश्वरच्या पायथ्याचे  कोर्ले गाव गाठावे लागते. कोर्ले गावातून रायरेश्वरला जी वाट जाते  तिला ‘गायदरा’ म्हणतात. पण याशिवाय भोवतीच्या अन्य गावांतूनही   काही वाटा-आडवाटाही या पठारावर चढतात.किल्ल्यावर जाण्यासाठी  गाडी रस्ता आहे.गडावरील पायर्‍याची डागडूजी तसेच लोखंडी शिडी  बसविल्यामुळे गडाची चढण सोपी झाली आहे.प्रत्येक ट्रेकर एकदातरी  या किल्ल्याला भेट द्यावी.

१५०० मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर हे प्राचीन शिवस्थान आहे.  महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये  रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे.पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच  असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार.रायरेश्वराचे पठार खूप मोठे आहे. ११ कि.मी. लांबी आणि  दीड किमी रुंदी असेल. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके,  अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट .यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.  


महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती.त्या मंदिरात जाऊन दर्शन  घेतले मन प्रसन्न झाले दोन मिनिटांसाठी तो प्रसंग डोळ्यासमोरून गेला  ज्यात शिवाजी महाराज आपल्या मावल्यांसोबत स्वराज्याची शपथ  घेतायेत.पठारावर    पूर्वाभिमुख रायरेश्वराचे मंदिर आहे. ओसरी, सभामंडप 
आणि गर्भगृह अशी याची रचना. मूळ मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार  झालेला आहे. अशाच एका जीर्णोद्धाराचा तपशील सांगणारा एक शिलालेख   मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीवर आहे. गडावर गडावर छत्रपती शिवाजी  महाराजांनी शपथ घेतलेले रायरेश्वराच्या शिवमंदिरा शिवाय जननी देवीचे  मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहेत.या किल्ल्याहून सुर्यास्त व  सुर्योदय विलोभनीय दिसतो.गडावरील जंगम लोकांची वस्ती आहे.ती मडंळी  पर्यटकांची सोय करतात. 

पावसाळ्यात किल्ल्याच्या पठारावर फुलझाडे बहरलेली असतात.त्यामुळे  पावसाळ्यात गडाला भेट देण्यात वेगळीच मजा असते.पठारावर भात शेतीचे  प्रमाणही मोठे आहे. किल्ल्यावरून पांडवगड, वैराटगड, राजगड, तोरणा,  सिंहगड, विचित्रगड, पुरंदर दर्शन होते. किल्ल्यांना आणि महाराष्ट्राला जे सौंदर्य व सन्मान प्राप्त झाले ते महाराजांमुळे. म्हणूनच आपण हे जपले पाहिजे, म्हणजे पुढच्या पिढीला हि ते पाहायला मिळेल. आपण ह्या सौंदर्य चे रक्षक झालो पाहिजे.भक्षक न्हवे.छत्त्रपति शिवाजी महाराज  कि जय.
No comments:

Post a Comment