किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपानच !
स्वराज्याच्या सामर्थ्याचा आणि शिवपराक्रमाचा साक्षीदार.
''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. जावळीच्या खो-यारत पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ''भोरप्या डोंगर'' एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड.सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला बलाढ्य आणि क्रूरकर्मा अशा अफझल खानाचा वध हाच शिवरायांच्या कारकिर्दितील सर्वात रोमहर्षक प्रसंग आहे.राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला होता तो हा प्रतापगडच.शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणींना उजाळा देत अवघ्या प्रतापगडासमोर नतमस्तक होण्यासाठी जावे लागते.
सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. महाबळेश्वरपासून सुमारे पाऊण तासात प्रतापगडापर्यंत पोचता येते. मुंबईहून पोलादपूर येथून आंबेनळी घाटातूनही प्रतापगडावर पोचता येते.प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाणारा गाडीमार्ग, किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंट रस्ते व किल्ल्यावर उपलब्ध असलेली खान पान सेवा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
गडावर जाण्याच्या पहिल्या पायरीला नमस्कार करुन गडावर चढण्यास सुरुवात केली.गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे.
प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये.वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.पहिल्या दरवाज्यानंतरचा दुसरा (पालखी) दरवाजा आज वापरात नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या बाजूने वर जावे लागते. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे.बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर स्थापन केलेल्या मंदिरात पोहोचतो. नेपाळमधून रामोजी मोंबाजी नाईक पानसरे यांनी त्रिशूल गंडकी, श्वेत गंडकी आणि सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्राम पाषाण मिळवून, नेपाळी कारागीराकडून अष्टभूजा भवानीची रेखीव मूर्ती तयार करून घेतली. भवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात.
हा मंदिर परिसर पाहून बालेकिल्ल्याकडे चालू लागायचं,मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जात असताना उजव्या हातालाच आपणास समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते,पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येवून पोहोचतो,मंदिरात भव्य शिवलिंग आहे.या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर असून कित्येक महत्वाचे निर्णय ,न्यायनिवाडे,मसलती या सदरेतच झाल्या.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत.येथे उजवीकडेच बगीचाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता.या तट्बम्दीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम द्रुष्य दिसते.पहिल्यांदा लागतो घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंदी दरवाजा नंतर लागतो. रेडका बुरूज पुढे यशवंत बुरूज तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज.
गडाची फेरी पूर्ण झाल्यावर झुणका भाकरीवर ताव मारुन व थंडगार ताक पिऊन खाली उतरायचे.
काळाच्या ओघात राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काहींची पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे.
शिवाजी महाराजांवर झालेला वार आपल्या अंगावर घेणारे वीर जिवा महाले यांचा पराक्रमही प्रतापगडाने पाहिला. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही म्हण तेव्हापासून प्रचलित झाली. गर्द झाडीने वेढलेला प्रतापगड जिंकणे अवघड नव्हे, अशक्यच होते, हे आजही तेथे गेल्यावर समजू शकते. इतिहासात बरेच महत्व असलेला हा प्रतापगड आजही अभिमानाने उभा आहे.
!! जय भवानी जय शिवाजी !!
No comments:
Post a Comment