Tuesday, December 29, 2015

सह्याद्रीचा मुकुटमणी.. हरिश्चंद्रगड​


९ जानेवारी २०१६ च्या ’ प्रहार ’ या वृतपत्रात ’ सह्याद्रीचा मुकुट्मणी हरिश्चंद्रगड’ माझा लेख प्रसिध्द झाला आहे.


                                    इथे क्लिक करावे  ===>>  सह्याद्रीचा मुकुटमणी हरिश्चंद्रगड 






       सह्याद्रीचा मुकुटमणी.. हरिश्चंद्रगड​ 



                 सह्याद्री आणि महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे सौंदर्याचे मानबिंदूच जणू...!!!त्यातील एक  हरिश्चंद्रगड.  हरिश्चंद्रगड​ एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणे कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेवाद्वितीय नाव समोर येते.








अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्र गड ’भटक्यांची पंढरी’ आहे. 'हरिश्चंद्रगड' या शब्दाला भटक्यांच्या जीवनात एक आगळेवेगळे स्थान आहे. हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’ म्हणून ओळख असलेल्या या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल द-या, उरात धडकी भरविणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेणी समूह.महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. 














   माळशेज घाटाच्या डावीकडे उभा   असणारा व ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवरील  अजस्र् पर्वत म्हणजे हरीश्चंद्रगड.या दुर्गप्रेमींना गडावर विविध वाटीने   जाता येते. पुण्याकडून   जाणारी खिरेश्वरची वाट, नगर-राजूरकडून   येणारी पाचनईची वाट,    जुन्नर दरवाजाची आडमार्गे वर    जाणारी वाट तसेच कल्याणहून चढणारी सावर्णे-बेलपाडाकडील उभ्या कडय़ाला अंगावर घेत चढणारी वाट अशा अनेक वाटा या गडावर चढतात. यातील नळीची वाट ही जातीच्या भटक्यांना सतत खुणावत असते.सगळ्यात सोपी वाट पाचनई गावातून व नलीची वाट अवघट आहे.








गडमाथ्यावरील हरिश्चंद्रेश्वराच्या प्रांगणात येऊन दाखल होतो. या अनगड रानात एक देखणे शैलमंदिर समोर उभे असते. पावसाळय़ात आला तर त्याभोवती रानफुलांची प्रभावळ असते. हे मंदिर, डावीकडची लेणी, पाण्याने भरलेली पुष्करणी हे सारे पाहून   थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि नव्या उमेदीने गडदर्शन सुरू होते. 









     गडावर आल्या आल्या डोळय़ांत भरणारे हे कातळशिल्प! संत चांगदेवांनी नाव दिलेल्या मंगळगंगा नदीच्या  काठावर एका लवणात हे देखणे शैलमंदिर उभे आहे.  मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कळसापर्यंत पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पायऱ्यांवर  आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पूर्व व   पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील    बाजूस कोरीव गणेशमूर्ती   असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव   मंदिराच्या   प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन  ऐसपैस गुहा आहेत. त्यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे      सांगितले जाते.काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे.साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. 









तारामती शिखरावरून वाहत येणारा एक ओढा, यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते.मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला     केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि 
२ मीटर    लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर     पाणी आहे. ही गुहा खरंतर      चार खांबावर 
तोलली       होती पण सद्यःस्थितीला    एकच खांब शाबूत आहे.    याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या         हाताच्या भिंतीवर   शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे.   या शिवलिंगाला 
प्रदक्षिणा              घालावयाची        असल्यास                  बर्फतुल्य   पाण्यातून जावे लागते.








      हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे.या कुंडांच्या दक्षिणेला चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान  होत्या. देवालयाची व या बांधीव  तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णुमूर्ती गायब    झाल्या तर उर्वरित    विष्णुमूर्ती मंदिरामागील  गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत.  








          मंदिरात जाऊन दर्शन  घेतल्यानंतर थोडा आराम करुन गडावरील सर्वात उंच शिखर असलेल्या तारामती शिखराकडे निघायचे.उंची  साधारणतः ४८५० फूट्.शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत.त्यातही    राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते.या शिखरावरून   समोरच दिसणारी     शिखरे, जंगल, घाटाचा रस्ता आणि  कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर      जाताना वाटेत अनेक   गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत. तारामती या गडाच्या सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.तेथूनच समोर दिसणा-या रोहिदास शिखरकडे     निघालो.कड्यावरून वाट     असल्याने   सावकाश उतरावे. रोहिदास शिखरावरून कोकणकडा दिसतो.त्याच दिशेने खाली उतरायला    सुरुवात केल्यावर खालच्या पठारावर आलो.








सगळीकडे फक्त काळे दगड दिसत होते.खाली उतरावयाची वाट दिसत नव्ह्ती .आता खाली कसे आणि कोठून उतरायचे ते कळत नव्हते.काही     ठिकाणी निशाण   म्हणून दगडावर दगड ठेवलेले दिसले त्या दिशेने गेल्यावर खाली शिडी दिसली.ही शिडी सावकाश    पार केल्यावर  पुन्हा नव्या पठारावर येतो.या पठारावर मात्र दुस-या शिडीचा  वरचा भाग दिसतो.ही पहिल्या   शिडीपेक्षा मजबूत आहे.हि दुसरी शिडी खाली उतरवल्यानंतर आपण कोकणकड्याच्या दिशेने   निघतो.  










        हरिश्चंद्रगडाचे    सर्वांत जास्त आकर्षक      ठिकाण म्हणजे    पश्चिमेकडे असलेला कोकणकडा.३०००       फुटांपेक्षाही उंच असा हा कडा       महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची      सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे    आविष्कार    आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात.संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा   नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.त्या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहळताना अनामिक भीतीने    अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने तेथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप 
पुन्हा पुन्हा   पाहत बसतो; डोळ्यांत साठवण्याची    धडपड करतो. तेथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच! 





आम्ही तारामती व रोहिदास ही शिखरे करुन कोकणकड्यावरुन पुन्हा हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे आलो.मस्त    पैकी  बाजरीची भाकरी,पिठल,ठेचा,कांदा,लोणचे व पापडावर ताव मारला.पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व खाली उतरायला लागलो.        





 पावसाळ्यात हरिश्चंद्रगडावरून कोकणकड्यावर अनेकांनी, अनेकदा इंद्रवज्र पाहिलेले आहे.निसर्ग नवल इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर जाऊन बसतात .








हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट  राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत   चांगदेवांनी तपश्चर्या केली  होती. 



इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार   वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी  तुटलेल्या  रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.








    ‘हरिश्चंद्रा’  चे जंगल देशातील समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी,    कीटक व सरपटणारे प्राणी   या सगळ्यांचे तेथे वैपुल्य आहे. गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासून परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.

    गडाच्या    पायथ्याशी असलेल्या     कोथळे,      पाचनई, लव्हाळी,      कुमशेत,   खिरेश्वर येथील गावक-यांचे चे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. मोठ्या    भक्तिभावाने   व श्रद्धेने हे लोक दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात.

   फक्त पाऊलखुणा मागे सोडून सोबतीला आयुष्याला पुरेल एवढी आठवणींची शिदोरी घेउन पुन्हा लवकरच सह्याद्रीच्या कुशीत माघारी येण्यासाठी !!!

No comments:

Post a Comment