Sunday, December 27, 2015

दुर्गरत्न रतनगड





                                        इथे क्लिक करावे  ===>>  दुर्गरत्न रतनगड
                     








    महाराष्ट्राचा गौरव म्हणजे सह्याद्री. ज्याला बघून महाराष्ट्रीयन माणसाचा उर अभिमानाने भरून  येतो तो म्हणजे " सह्याद्री ". सह्याद्रीच सौदर्य म्हणजे तिथले गड आणि किल्ले.महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके. यासाठीचदुर्गप्रेमींची पावले कायम गडाकडे वळलेली असतात.गडावर गेल्याशिवाय थांबत नाहीत.कितीही वेळा गेलात तरी प्रत्येक वेळी गडाचे वेगळे सौंदर्य पाहावयास मिळते.प्रत्येक वेळी मिळणारा आनंद मात्र काहीतरी नवीन अजून छान बघितल्याचा अनुभव देऊन जातो.  





  रतनगड हा अतिशय दुर्गम आणि देखणा असा गड आहे.अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई    करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे.  रतनगडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे.रतनगड म्हटले की रतनवाडी हे पायथ्याचे गाव आलेच. रतनवाडीस इगतपोरी,घोटी,बारी भंडारदरामार्गे किंवा संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.रतनगड हा सुमारे सव्वाचार हजार फूट उंचीचा गड आहे.रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते.या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. 





    रतनवाडीला हेमाडपंत बांधणीचे अतिशय प्राचीन असे 'अमृतेश्वर मंदीर' आहे.हे  मंदीर आपल्याला  थेट आठव्या शतकात घेऊन जाणारं हे हेमाडपंथी शिल्प म्हणजे इथल्या भव्य इतिहासाची एक जिवंत साक्षच मानायला हवी. या मंदीराचा मुख्य दरवाजा हा मागच्या बाजूने आहे.तेथून आत शिरले असता छोटेसे सभागृह नजरेस पडते.तिथेच कोरीव खांब नजरेस पडतात.मंदिराच्या आतून व बाहेरून कोरीव काम  केलेले आहे. भंडारदरा धरण  पूर्ण भरते तेव्हा या मंदिरातील शंकराची पिंड पूर्णतः पाण्याखाली जाते.जसे जसे कमी होते तसे तसे  शंकराची    पिंड दिसू लागते.बाजुला काळ्या दगडातले  पुष्करणी तलाव आहे.












       समोर घनदाट जंगल, आणि माथ्यावर गड."हर हर महादेव!" चा जल्लोष करून आम्ही चढायला सुरुवात केली.  रतनगडावर जाणार्‍या वाटेची सुरवात ही प्रवरा नदीच्या बाजूनेच होते.येथे  प्रवारेचं    पात्र म्हणजे   एखाद्या   ओढ्याहून    मोठे नाही.  भातखाचरांमधून      वाट   काढीत बांधा-बांधावरून चालत, उजवीकडे दिसणाऱ्या  दोन-तीन कौलारू घरांकडे निघायचं आणि इथून खरा ट्रेक सुरू होतो. निसर्गाची अनोखी धुंदी अनुभवत. इथे माहौलच काही और होता.पक्षांची किलबील,ना कसला गोंगाट, ना कसला धिंगाणा. माणसांची मुजोरी नाही, की जिवाला पोखरणारी दुनियादारी नाही. पायवाटेने जाताना मात्र लक्षात आले, की आपण ओढ्यापलीकडच्या डोंगररांगेला समांतर   जातोय. रतनवाडीच्या ओढ्याच्या पलीकडून आपण    बांधावरून जात एका चार-दोन  घरांच्या वस्तीजवळ येतो.या प्रवरावर नव्याने बांधलेल्या धरणाच्या बाजुने पुढे जात वर चढावे लागले. एकदा चढाई सुरु झाली की दम काढणारे जेमतेम दोन तीन चढ आहेत.तिथूनच एका छोटया मोकळ्या पठारावर येतो.   






   कातळाच्या   खोबणीत रोवलेली शिड्यांवरून सावधानतेने व रीतसर पार करताच रतनगडाचा गणेश दरवाजा दिसू लागला आणि मन अभिमानाने  भरून येत.कातळ पायऱ्या तुटल्याने गडावर जाण्यास या शिड्यांचा एक भक्कम आधार मिळतो.  शिडया  पार करुन वरती आलो की एक वाट उजवीकडे हनुमान दरवाज्याकडे वळते      तर दुसरी  डावीकडे  गुहेकडे जाते.पुढे रत्नाईदेवीचे मंदिर छोट्या गुहेत आहे.यारत्नादेवीच्या गुहेतच दुर्गकन्या     प्रवरेच  उगम आहे.जिथे      रत्नादेवीची शेंदुर लावलेली पाषाणमुर्ती आहे.कड्यात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई,रत्नाबाई व कात्राबाई या तिन बहीणी होत्या. म्हणून या तिघींच्या नावांचे तीन मोठे डोंगर यांच्या नावाने प्रसिध्द आहेत.बाजुला मोठी गुन्हा आहे.गडावर रहाण्याच्या सोईसाठी या दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे.










     तेथे आराम करुन पुढे गड पाहण्यास निघता येते. गुहेच्या रांगेतच थोडा वरती पण अगदी जवळ हा हनुमान दरवाजा लागतो.इथेही बाहेरून आणि बाजूस रिद्धी सिद्धी असलेला गणपती यांची शिल्पे आहेत. हनुमान दरवाज्याजवळच्या भिंती पार करताच उजवीकडे एकांडा बुरूज उभा असल्याचे दिसते.कडेलोट करण्याची ही    जागा आहे.समोर  'कात्राबाई    कडा ' शब्दात वर्णन कारण अशक्य आहे. समोरचा उंच डोंगर आणि त्याला वा-याने पडलेले       कडे यांचा वर्णन करण्यापेक्षा  ते स्वतःच्या डोळ्यांनी बघणेच चांगले.सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. हनुमान दरवाज्यातून   उजवीकडे वळलो     तर राणीचा हुडा (भग्न बुरुज) स्वागतासाठी उभा आहे.    राणीच्या हुडाच्या   अगदी मागे एक छोटे पाण्याचे टाके लागते.पण पिण्यास योग्य अश्या पाण्याच्या टाक्यासाठी     अजून थोडे पुढे  गेले की तीन खोदलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात.चार-पाच पाण्याच्या टाक्‍यांची शृंखला  आहे. रतनगडावरचे नेढे ही जागा गडावरील सर्वात       उंचावर आहे. साहाजिकच       नेढयापर्यंत       पोचण्यासाठी       दम काढावा लागतोच.    पण एकदा नेढयात पोहोचलो की सगळा दम भरुन येतो.किल्ल्यावरची अत्यंत रमणीय  जागा    म्हणजे     दीड-दोन मीटर उंचीचे आणि चार-पाच मीटर रुंदीचे एक निसर्गनिर्मित नेढे आहे.






समोरचा नजारा व     बेधुंद वाहणारा वारा यात आपण   स्तब्ध   होऊन जातो.भटक्यांचे हे आवडते ठिकाण.येथून  साम्रद गाव, सांधण दरी व करोली घाट ते डेहणे हा सारा परिसर दिसतो.तेथून उतरुण लगेच थेट त्र्यंबक दरवाजा गाठतो. खूपच सुंदर नि     भरभक्कम    असा दरवाजा.पुढे दरवाज्यातून उतरण्यासाठी    मोठया उंचीच्या दगडात    कोरलेल्या पायर्‍या आहेत.अगदी समोरच दरी डोळ्यात दिसत     असल्याने या पायर्‍या उतरताना खबरदारी    घेउनच उतरावे लागते.पायर्‍या संपल्या की  डोंगराच्या कपारीतून जाणारी वाट पाउलवाट अगदी खुटा आणि रतनगडयांना जोडणार्‍या घळीत येउन थांबते.इथूनच रतन वाडीला परतलो.







गडावरुन भंडारदारा धरण तसेच अलंग,मदन,कुलंग,कळसूबाई चे शिखर दिसतात.दक्षिणेला  आजोबा व कात्राबाईच्या गगनचुंबी पहाड पाहवयास मिळतात.  








रतनगड आपली कसोटी पहाण्य़ास कसीलीही कसूर करीत नाही.इच्छा, शारीरिक क्षमता आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित केल्यासरतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहते.येताना मात्र पुढच्या ट्रेकबद्दल ठरवायला विसरलो नाही. 














No comments:

Post a Comment