इथे क्लिक करावे ===>> प्राचीन विसापूर
सह्याद्रीच्या रांगेतील लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मीती करण्यात आली होती.पवन मावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक.चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच असा हा विसापूर किल्ला चहूबाजूंनी कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरूष आहे. लोहगडपेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा पण तितका प्रसिद्द नसलेला हा किल्ला.किल्ल्यावर प्रशस्त पठार आहे, हीच खरी
या किल्ल्याची खासियत आहे. या गडाची आगळीवेगळी, अद्वितीय आणि आजही अखंडित असलेली अशी तटबंदी. विसापूरचा हा तट म्हणजे निष्ठेचा एकेक दगड चढवत विणलेला जणू भरजरी शेलाच आहे.
मावळ तालुक्यामधला एक भरभक्कम किल्ला. अगदी लोहगडच्या शेजारी वसलेला,३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.नव्या ट्रेकरर्सना ट्रेकिंगची सुरुवात करण्यास हा किल्ला अगदी योग्य आहे.
लोहगड व विसापूर किल्ले लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली इथून जवळ आहेत. तिथून भाजे गावात जायचे. वाटेत सुरुवातीला बौद्धकालीन भाजे लेणी लागतात.भाजे लेणी पाहून साधारण दिडेक तासात लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडीत पोहचता. तेथून एका बाजूला विसापूर तर दुस-या बाजूला लोहगड किल्ला आहे.
विसापूर तीन वाटांनी गाठता येतो.एक वाट लोहगड आणि विसापूर यांमधील गायमुख खिंडीवरून जात फुटक्या तटबंदीतून वर चढते जी आता बरीच रूळलेली आहे. विसापूरला येणारे बहुतेक भटके याच वाटेने वर चढतात. भाजे लेण्यांवरून दुसरी वाट ओढ्याच्या मार्गाने जाते, तर तिसरी वाट पाटण गावातून वर जाते. दुसरी आणि तिसरी वाट वरच्या पठारावर एकत्र होऊन विसापूरच्या पूर्वीच्या राजमार्गाला भिडते. माहितगाराशिवाय या दोन्ही वाटाने गडावर जाणे कठीण आहे.
भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना आहे अशा या गडाच्या पठारावर येताच पलीकडचा त्याचा मोठा भाऊ लोहगड रामराम घालतो.विसापूरच्या या सदरेच्या मागे गडावरील बालेकिल्ल्याची टेकडी आहे.पण किल्लेदाराच्या वाडय़ाचे आणि शिबंदीच्या काही घरटय़ांचे अवशेष सोडले तर हा बालेकिल्ला फक्त आडनावापुरताच उरला आहे.कोरीव चिऱ्यांमधले बांधकाम, आखिव-रेखीव रचना, रूंद रस्ता, जागोजागी ठेवलेले जिने-पायऱ्या,आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही अशी तटाची उंची, अर्धवतुळाकार बुरुज, या तटबुरुजांना माऱ्यासाठी जागोजागी ठेवलेल्या जंग्या-खिडक्या, तटावरील
देवतांची शिल्पे-मंगल प्रतीके, तटाच्या आतील शिबंदीची घरे, पाण्याच्या
टाक्या, दारूगोळ्याची कोठारे, तटाच्या पोटातील खोल्या आहेत.
‘किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये, असल्यास तो त्याच्या आहारी आणावा. ते शक्य न झाल्यास त्यास तटबंदी घालून मजबूत करावा.’ शिवरायांच्या आज्ञापत्रातील हा नियमच विसापूरच्या दुर्गारोहणास कारणीभूत ठरला असावा. किल्ल्यावर गुहा,मंदीरे,टाक्या व वाड्याचे अवशेष आहेत. गडावर फेरी मारताना
वाड्यांचे अवशेष,तोफा वगैरे लागतात.पाण्याची टाकी आहेत्,त्यावर हनुमंताचे मोठे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पाचे टाकीतील पाण्यात प्रतिबिंब फार सुरेख दिसते.गडाच्या काही भरभक्कम बुरुज व तटाबुरुजांच्या भिंती दिसतात. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.बांधकामासाठी लागणारा चुना मळण्यासाठी लावलेली घाणी आजही इथे या पश्चिम तटाशेजारी त्याच्या चाकासह उभी आहे.गडावरुन तुंग,तिकोनाव पवना डॅम दिसते.
गडावर ’सह्याद्रिचे शिलेदार संघा’ तील शिलेदारांनी नविन वर्षाच्या सुरवातीलच एक दमदार मोहिम पार पडली.जमिनी खाली गाडले गेलेला गुप्त दरवाज्यांला मोकळा श्वास मिळवून दिला. तसेच अपार कष्टांनी पाच फ़ुट जमिमीनी खाली गाडली गेलेली तोफ़ बाहेर काढली.१८१८ नंतर विसापुर वर २ तोफ़ा असल्याची
नोंद होती व आता त्यामध्ये तिस-या तोफ़ेची नोंद झाली. या शिलेदारांनी इतिहासाच्या खुणा उजेडात आणण्याच्या कामाबद्द्ल आम्ही त्यांचे अभिनंदन
केले.
गडाचा इतिहास शोधू जाता तो थेट सातवाहनकाळात जातो.विसापूरातल्या पोटातल्या भाजे लेणी, नजीकच्या बेडसे लेणी इतक्या जुन्या, तर त्यांचे संरक्षण करणारा हा दुर्ग त्यापेक्षाही अधिक प्राचीन असलाच पाहिजे.
आल्या मार्गी किल्ल्याचा निरोप घ्यायला आमची पाऊल ढासळलेल्या तटबंदीच्या दिशेने वळाली.गडावरून उतरताना ढासळलेल्या तटबंदीतून एक दगडांनी भरलेला तीव्र उतार विसापूरची कातळभिंत संपवून खालच्या गायमुख खिंडीत घेऊन जातो. दगडांवरची ती उतरण थोड्याच वेळात पदरातल्या दाट झाडीत घेऊन जाते.दाट झाडीतून थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याची ती पायवाट उतरून लोहगड आणि विसापूर यादरम्यानच्या गायमुख खिंडीत पोहोचतो.
नववर्षाला या ट्रेकने सुरुवात केली आहे.
परत भेटूच एखाद्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत…
सह्याद्री असा भुरळ घालतो,वेड लावतो मनाला !ते वेगळंच ..!
No comments:
Post a Comment