Thursday, May 12, 2016

पट्टागड उर्फ विश्रामगड

पट्टागड उर्फ विश्रामगड

महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभलेय. तसेच ते अकोले तालुक्याच्याही वाट्यालाही आलेय. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्री पर्वताची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. त्यात नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गांची मालिकाच आपल्याला भेटते. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. यासगळ्या किल्ल्यांतील पट्टा उर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय. महाराजांच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.पुलकित झालीय.

नगर आणि नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आजही हा गड ताठ मानेने मोठ्या दिमाखात उभा आहे. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे.


या किल्ल्याची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. एरियल व्ह्युने पाहिल्यास या किल्ल्याचा आकार आकाशातील पंख पसरलेल्या गरुडाप्रमाणे दिसतो! पट्टा किल्ला एका अर्थाने हिंदवी स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्दच होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एक हजार ३९२ मीटर (४५६६ फूट) इतकी आहे. इतिहास काळातल्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यास फार मोठा इतिहास या गडाला असल्याचे कोठे सापडत नाही. पण गडाचे तालेवार सोबती पाहता, तेथील भग्नावशेष पाहता या गडाचा उपयोग इतिहासकाळात नक्की झाला असेल,याची खात्री पटते.
एके काळी शत्रू सैन्यावर आग ओकणारी बुलंद तोफ आज मात्र गडाच्या पायथ्याशी निद्रिस्त अवस्थेत आहे. पूर्वेकडून चढाई करीत वर गेले की, पहिल्या टप्प्यात एका सरळसोट कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. गडावर जाताना एका गुहेत थोर तपस्वी लक्ष्मण महाराजांची समाधी लागते. दुसऱ्या गुफेत काळ्या कातळातून पाझरलेले थंडगार पाणी आहे. आणखीन थोडे चढून वर गेले की, उत्तराभिमुखी त्र्यंबक दरवाजा येतो. त्याचे बांधकाम इतके भक्कम आहे, त्यामुळे आजही तो एकदम सुस्थितीत आहे.
किल्ल्याच्या पठाराकडे जाताना मध्येच एक देवीचे मंदिर लागते. भगवती देवीच्या मंदिराचे सध्या बांधकाम सुरु आहे. या मंदिराभोवती पुन्हा पाण्याची टाकी आहेत. ती कातळात कोरलेली आहेत. बहुदा ही यादवकालीन असावीत. अक्षया तृतीयेच्या दिवशी गडावर अष्टभुजा उर्फ भगवती या देवीची यात्रा भरते. परिसरातील आदिवासी भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात.

एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या घटका मोजतोय. पावसाळ्यात गाई-गुरांना निवारा म्हणून गुराखी या राजवाड्याचा वापर करतात. किरकोळ डागडुजी केल्यास हा महाल पुन्हा दिमाखाने उभा राहील. याखेरीज ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावरून निसटण्यासाठी येथे चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा म्हणजे शिवकाळातील स्थापत्य विशेषाचा एक आदर्श असा नमुनाच. गडावर तब्बल ३० पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.


पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात तिकडे तऱ्हेतऱ्हेची रानफुलं फुलतात. अनेक औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. वर पोहोचल्यावर गडावरून पाहिले की, सभोवार चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. लांबवर पश्चिमेस कळसूबाई,अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्गत्रिकुट खुणावत राहते. दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा जणू आपल्याला हात पालवताहेत. इगतपुरी म्हणजे महाराष्ट्रातील धरणांचा तालुका. विश्रामगडावरच्या पश्चिम टोकाला उभे राहून पाहिले की विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयांचे विहंगम दृश्य डोळ्यांना सुखावते. या गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात.आधी उल्लेख केल्याप्रमाणे अकोल्यातल्या इतर गडांपेक्षा विश्रामगड जास्त भाग्यवान म्हटला पाहिजे. कारण शिवस्पर्श झाल्याने ही भूमी पावन झालीये. सन १६७९मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज पुढे चालले होते. नाणेघाटमार्गे कल्याणवरून रायगड असे जाण्याचे नियोजन होते.
दरम्यान, महाराज सोने-नाणे अशी लूट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर पिसाळलेला मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळ दोन्ही सैन्यांची गाठ पडली. दिनांक १८, १९ आणि २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. संघोजी निंबाळकर खानाबरोबर भिडला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. अखेर तो धारातीर्थी पडला. महाराजांबरोबर असलेल्या साडेआठ हजार सैन्यापैकी चार हजार सैन्य कामी आले. शत्रू सैन्याने महाराजांना घेरले होते. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येऊन धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे व्हायचे. बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली.

राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज मध्यरात्री संगमनेरहून पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. दाट जंगल आणि हिंस्र श्वापदे यांचा वावर. रामायण काळातले दंडकारण्य म्हणतात तो हाच परिसर. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करीत महाराज गडावर सुखरूप पोहोचले. अर्थातच यात बहिर्जीचा मोठा वाटा होता.

संगमनेरजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे जवळपास १७ दिवस वास्तव्य या किल्ल्यावर होते. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्बेत खालावली होती. येथील थंडगार, शुद्ध हवा आणि जीवाला जीव देणाऱ्या आदिवासीं महादेव कोळ्यांच्या कडेकोट पहाऱ्यात थकलेल्या राजांना विश्रांती मिळाली. पुढे राजे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले. गडावरून परतताना दस्तुरखुद्द राजांनीच या किल्ल्याचे नामांतर 'विश्रामगड' असे केले. परंतु याला पट्टा (किल्ला) का म्हणतात त्याचा मात्र उलगडा होत नाही. त्याचे तसे उल्लेख कुठे सापडत नाहीत. बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य काही काळ गडावर होते.सह्याद्रीच्या या पुण्यभूमीला वंदन करायला, गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळायला आणि त्यावरचा इतिहास वाचायला आतुरलेले अनेक दुर्गभटके इथल्या रानवाटा तुडवत बाराही महिने फिरत असतात.पहाटेच गावातून अत्यंत मळलेल्या वाटेने आम्ही पंधरा मिनिटांतच एका गुहेसमोर पोहोचलो. ही गुहा म्हणजे लक्ष्मणगिरी महाराजांचे समाधीस्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी येथील पंचक्रोशीतील अनेक भक्तांचा राबता असतो. पौर्णिमेच्या दिवशीच या गुहेचं दार उघडत असल्याने या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळेच या परिसरातील भक्तमंडळी पट्टागडाला लक्ष्मणगिरी महाराजांचा डोंगर म्हणूनदेखील ओळखतात. आम्हीही पौर्णिमेच्या दिवशीच आलो असल्याने येथे माथा टेकवूनच पुढे निघालो असता काही पाय-या पार करून दुसरी गुहा व त्याच्या शेजारीच गडाची अधिष्ठात्री पट्टाईदेवी समोर! ‘देवीच्या नावामुळेच या गडाचे  नाव पट्टागड पडले असावे’. तीन कमानीची अतिशय सुंदर व सुस्थितीत गडावर असलेली एकमेव वास्तू अंबारखाना.अंबारखाना डोळय़ात साठवतच आमची पावले गडाच्या दुस-या टोकाकडे चालली होती. वाटेतच बारा टाक्यांचा समूह भेटला. ‘बारा टाकी’ म्हणून प्रसिद्ध असलेली व एका रांगेत असलेली ही पाण्याच्या टाक्याची माळ मात्र थांबून पाहावी अशीच आहे. 

 पट्टागडाच्या टोकावर उभे राहिलो आणि समोरचा नजारा काय वर्णावा..? अहाहा.. व्वा.. जबरदस्त.. असे शब्द सर्वाच्याच तोंडातून अन् तेही एकदम उमटत राहिले. पट्टागडाची एक सोंड समोरच्या औंढया किल्ल्याकडे अर्धवर्तुळाकार गेली आहे. ही अर्धवर्तुळाकार डोंगरधार जमिनीपासून तीन स्तरांमध्ये आहे .पट्टागडाच्या टोकावर उभे राहिलो आणि समोरचा नजारा काय वर्णावा? सुंदर रमनीय देखावा. पट्टागडाची एक सोंड समोरच्या औंढया किल्ल्याकडे अर्धवर्तुळाकार गेली आहे. ही अर्धवर्तुळाकार डोंगरधार जमिनीपासून तीन स्तरांमध्ये आहे.


विरंगुळय़ाची ‘अनमोल’ शिदोरी पाठीशी बांधून देणारा हा पट्टागड एकदा तरी अनुभवावा असाच आहे.No comments:

Post a Comment