Monday, May 16, 2016

घाटरक्षक....मृगगड.                                               घाटरक्षक....मृगगड.
सह्यादीच्या घाटवाटांचं आणि किल्ल्यांचं मोठं जिवाभावाचं नातं. जिथं घाट तिथं किल्ला हवाच. घाटातून होणाऱ्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी आणि सशस्त्र आक्रमकांना अटकाव करण्यासाठी पूवीर्च्या काळी डोंगरी छावण्यांची निमिर्ती केली जात असे.
देशातून कोकणात वाहतुकीसाठी उतरणारे अनेक घाट महाराष्ट्रात इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. नाणेघाटासारख्या प्रसिद्ध घाटवाटेबरोबरच सवाष्णी, नाणदांड, बोराटय़ाची नाळ, कावळय़ा घाट या घाटांची नावंही चटकन डोळय़ांसमोर येतात. लोणावळय़ाच्या ‘टायगर्स लीप’ पॉइंटपासून एक सरळसोट घाट कोकणातल्या भेलीव गावात उतरतो. भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ जरी या घाटाला ‘पायमोडी’ घाट म्हणत असले तरी इतिहासात हा मार्ग ‘सव घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या सव घाटावर बारीक नजर ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा, पण भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. पुण्या-मुंबईवरून एका दिवसात आणि कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा एक सदाबहार किल्ला म्हणजेच रायगड जिल्हय़ातला ‘मृगगड’ ऊर्फ ‘भेलीवचा किल्ला’.


मृगगडाला भेट देण्यासाठी गिर्यारोहकाला प्रथम खोपोली गाठावं लागतं. या खोपोलीपासून पालीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर अंबा नदीच्या पुरानं हाहाकार माजवलेलं प्रसिद्ध असं जांभूळपाडा हे गाव आहे. मृगगडाला जाण्यासाठी जांभूळपाडय़ाहून माणगाव मार्गे भेलीवला व्यवस्थित डांबरी सडक असून हे अंतर साधारणपणे १२ कि.मी.चं आहे. भेलीवकडे येतानाच आपल्याला पूर्वेकडे पसरलेली सहय़ाद्रीची अजस्र रांग दृष्टीस पडते आणि त्यापासून सुटावलेला बेलाग असा मोराडीचा सुळकाही दिसतो.भेलीवच्या अलीकडे अंबानदीच्या वरचा पूल लागतो. समोरच कातळभिंती सारखा उभा असणारा सह्यादी यामुळे आपलं मन एका वेगळ्याच विश्वात जाते. 

भेलीवच्या मागेच मृगगडाचा तीनचार शिखरांचा छोटा डोंगर गावाला कुशीत घेऊन उभा आहे. या शिखरांपैकी शेवटच्या दोन शिखरांच्या मधल्या घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात केली.मृगगडाची संपूर्ण पायवाट झाडीतून असल्यानं आणि मुख्य पायवाटेला अनेक ढोरवाटा फुटल्यानं पहिल्यांदा जात असल्यास गावातील माहीतगार व्यक्ती बरोबर असणं आवश्यक आहे.भेलीव गावात मृगगडाची एक डोंगरसोंड बाजूच्या उंचवट्याना स्पर्श करून खाली उतरते. गाव मागे टाकून डोंगरसोंड चढणीला लागलं की पंधरा मिनिटातच वरच्या पठारावर पोहोचतो. गावातून साधारणपणे पाऊण तासाची सोपी चढण संपते ती वर उल्लेख केलेल्या छोटय़ा घळीपाशी. या घळीतून वर जाताना एक सोपा कातळटप्पा पार करून पुढे डावीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून आपला किल्ल्याच्या छोटय़ा पठारावर प्रवेश होतो. या पठारावरून दोन वाटा फुटतात. डावीकडची खोदीव पायऱ्यांची वाट आपल्याला सर्वोच्च माथ्यावर घेऊन जाते, तर उजवीकडची कातळात खोदलेली अतिशय अरुंद अशी वाट आपल्याला किल्ल्याच्या पोटातल्या खोदीव पण कोरडय़ा टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट अत्यंत अरुंद आणि धोकादायक असून पावसाळय़ात या वाटेवरून जाण्याची जोखीम पत्करू नये. हे टाकं बघून आपण पुन्हा मागे पठारावर आलो की समोर कातळात खोदलेल्या भक्कम खोदीव पायऱ्यांवरून पंधरा मिनिटांत आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या मुख्य माथ्यावर जातानाच उजवीकडे दगडावर दगड रचून बांधलेली तटबंदी आहे.मृगगडाचा मुख्य माथा तसा लहानच असून पुढे गेल्यावर उजवीकडे देवीची एक मूर्ती एक शिवलिंग आणि एक छोटी दगडी दीपमाळ आहे. मृगगडाच्या या पहिल्या शिखरावर डावीकडे पाण्याची दोन खोदीव टाकी असून दोन्ही कोरडी आहेत. आता ही टाकी पाहिली की आपण किल्ल्याच्या मधल्या शिखराकडे जायला लागयचे. या वाटेनं जात असतानाच उजवीकडे एक छोटा उतार उतरून गेल्यावर कातळात खोदलेलं एक मोठं गुहावजा खांबटाकं असून त्यातही पाणी नाही. 

किल्ल्याच्या मुख्य शिखरावर आपण पोहोचलो की झाडींनी व्यापलेली काही जोती दिसतात. मृगगडाचा आकार तसा लहानच असल्यानं भेलीवमधून निघाल्यापासून दोन तासांत संपूर्ण किल्ला बघून होतो. या मुख्य शिखरावरून आपण एक छोटा उतार उतरलो की आपण किल्ल्याच्या सर्वात पश्चिमेकडच्या भागावर पोहोचलेलो असतो. या उताराच्या वाटेवरही उजवीकडे दोन कोरडी टाकी आहेत. या मृगगडाच्या या शिखरावरून पावसाळय़ात खाली दिसणाऱ्या भेलीव गावाचं आणि किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेल्या सहय़ाद्रीच्या आकाशाला टेकलेल्या रांगांचं जे काही दृश्य दिसतं त्याला खरोखरच तोड नाही! गिर्यारोहकांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. किल्ल्याच्या वरच्या भागात बघण्यासारखे फार काही नाही. पाण्याच्या टाक्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. किल्ल्यावरून चारही दिशांचा परिसर उत्तमरीत्या न्याहाळता येतो. पूर्वेला दूरवर सरसगड दिसतो. मृगगडावरून समोर एक उंच सुळका दिसतो. अजून एक नमूद करण्यासाखी गोष्ट म्हणजे हा किल्ला प्रदूषण विरहित आहे. हि गोष्ट मनाला अत्यंत सुखावून गेली आणि " किल्ला जितका दुर्गम तितका तो स्वछ" या आमच्या प्रमेयाला सिद्धता मिळाली. किल्लेपणाचे काही अवशेष आहेत; ते पाहिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून जो नजारा दिसतो तो केवळ अवर्णनीय होता. उंबरिखड परिसर, मोराडी सुळका, सव घाट आणि वाघदरी असा विस्तृत दिसणारा प्रदेश स्वत:च्या डोळ्यांनीच पाहावा; तो शब्दात व्यक्त करणं अशक्यच. 

मृगगडावरील एकाही टाक्यात पाणी नसून भेलीवमधून निघतानाच पाण्याचा भरपूर साठा आपल्याजवळ ठेवावा. मृगगडाच्या या शेवटच्या टाक्यांपाशी आपली ही छोटीशी गडफेरी पूर्ण होते. पुण्या-मुंबईकडच्या ज्या गिर्यारोहकांना नेहमीच्या ठिकाणांचा कंटाळा आलाय. त्यांच्यासाठी एका दिवसाच्या ट्रेककरिता मृगगड हा सर्वोत्तम पर्याय आहे.  
दुर्गवीर प्रतिष्ठान किल्ले मृगगडावर श्रमदान मोहिमेचे आयोजन करते.

No comments:

Post a Comment