Monday, May 16, 2016

उंबरखिंड समरभूमी स्मारक


                                   १५.०२.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 
                                                                
  इथे क्लिक करावे  ===>> उंबरखिंड 

        











 खोपोलीहून पालीकडे जाणा-या रस्त्याला खोपोली पासून १०-१२ किलोमीटर गेल्यावर डाव्या हाताला समरभूमी उंबरखिंडीकडे असा फलक दिसतो. तिकडे वळून आंबा नदीच्या पश्चिम बाजूकडून जाणाऱ्या रस्त्याने जात राहावे.उजव्या हातास नदीपात्रात उतरणारा रस्ता दिसतो व रस्त्याच्या तोंडालाच लढायीची थोडक्यात माहिती देणारा  फलक दिसतो. नदीपात्रात खडकाच्या सपाटीवर अतिशय समर्पक व सुंदर शिल्प उभारलेले आहे. उत्तरेस महाराजांची अश्वारूढ प्रतिमा कोरलेली  आहे. पूर्वेस मुद्रा आहे व लढायीचे थोडक्यात वर्णन आहे. शिल्प चौकोनी चौथऱ्यावर उभे आहे. पूर्णाकृती धनुष्य, ढाल, तलवार, व भाला या सर्व शस्त्रांचा वापर करून अतिशय देखणे व प्रसंगाला अनुरूप असे शिल्प बनविले आहे. उंबरखिंड स्मारक हे गावकरी आणि एक दुर्गप्रेमी/शिवप्रेमी संघटना यांनी संयुक्त विद्यमाने उभारलेले आहे.  




उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण हा चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबानदी उजवीकडे वळण घेते. या नळीत एकदा शिरले की मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकड्या व अंबानदीचे पात्र व पूढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे बूच यामुळे शत्रू आपसूकच कोंडला जातो. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन महाराजांनी मोघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी सैन्याने व कमीत कमी वेळात सपशेल पराभव केला.


पुणे-रायगड जिल्हयांच्या सीमेवर आणि सहयाद्रीच्या कुशीत दडलेली ही ‘उंबरखिंड’. शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारी व इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारी,उंबरखिंडीची इतिहासात आगळीवेगळी ओळख आहे..






इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता. खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.






                         




खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. फौज दुपारपर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असतांना महाराजांच्या सैन्याने अचानक मोघली सैन्यावर हल्ला केला. बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.




अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहीत्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सैन्य रिकाम्या हातानी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले.


छत्रपती शिवरायांनी केवळ आठशे मावळ्यांच्या मदतीने मोगल सरदार कारतलाबखानाच्या हजारांच्या फौजेवर चावणी येथील उंबरखिंडीत गनिमी काव्याने मारा करीत विजय मिळविला. ती समरभूमी शौर्यतीर्थ व्हावी.



इथे गेल्यावर या स्मारकाकड़े पाहिल्यावर अंगात विज चमकुन जाते. उभा राहतो तो इतिहास ३००-३५० वर्षापुर्वीचा, उभा राहतो तो गरुडासारखा भिरभिरणारा सेनापती नेताजी पालकर आणि मराठ्यांची अजिंक्य सेना. 

मुजरा त्या प्रत्येक अनाम विराला ज्यान स्वराज्य राखण्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला .



No comments:

Post a Comment