१५.०३.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> कलावंतीण बुरुज
नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गडाच्या बाजुला दिमाखात उभा असलेलाकलावंतीण चा बुरुज. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे.पुणे-मुंबई हमरस्त्यावरून दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची जाणीव करून देणारा बुरुज. कलावंतीणसुळका हे प्रबळगडा शेजारील एक सौंदर्यस्थळ आहे.
पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत प्रबळगड व कलावंतीणवसलेले आहेत.
जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि शेडुंग फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे.छोट्याशा प्रवासानंतर लोणीवली वाडीला
जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. साधारणपणे पनवेल
पासून १५ किलोमीटर वर ठाकूरवाडी, तिथून पुढे प्रबळगड माची अंदाजे ३ किलोमीटर वर आहे.
माचीच्या पायथ्याशी गणपती व बजरंगबलीचे उघडे मंदिर लागले.दर्शन घेऊन पुढे आलो कि
एक पठार लागेल इथून कलावंतीण सुळका अन प्रबळगड अंगावर येत आहेत असेच काहीसे
चित्र भासते. तितकेच ते डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते.कलावंतीण दुर्ग हा खालून पहिले
असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला
त्याची महती पटते.
त्या पायवाटेने वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट प्रबळ गडासाठी तर डावीकडील
वाट कलावंतीणसाठी जाते. डावीकडील वाट पकडावी.घनदाट जंगलातून वाट काढत आपण
प्रबळ व कलावंतीण यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचतो.डोंगरात खोदलेल्या सरळ
असलेल्या पायऱ्या हे कलावंतीणचे मुख्य वैशिष्ट्य आहे .
इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात.
या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरणा-याला अजिबात
दृष्टीभय वाटत नाही. त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!
प्रबळगडाकडे पाठ करून आपण डोंगरकपाऱ्यांच्या आधाराने काही उंचीवर खोदलेल्या पायऱ्या
गाठतो. या पायऱ्या दगडात व्यवस्थित कोरल्या आहेत. एका बाजूला दरी असल्यामुळे इथून
जाताना जरा सावकाश चढाई करावी लागते.डोंगरात खोदलेल्या १ फुट ते दीड फुट उंचीच्या
पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. ही चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे वाटते.माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो
तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या व कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर
जाण्याच्या मध्ये उभा असतो.शेवटी सुळक्याचा माथा गाठण्यास परिश्रम करावे लागतात.
कठीण वर्गात गणल्या जाणार्या कलावंतीण बुरुजावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील
मनात राहतो.पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची
प्रचीती आल्याविना राहत नाही.
माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी
होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार
दिसते, तर ईशाळगड(इर्शाल/विशाल) प्रबळच्या मागे लपलेला(जो प्रबळ गडाहून दिसतो),
पुर्वेला चंदेरी, विकटगड(पेब चा किल्ला) तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे
दर्शन घडते. एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित
पाहून होतो.
कलावंतीण किल्ला “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण नव्याने ट्रेकींग करणार्यांनी
येथे शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर सोबत अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक असावेत.
No comments:
Post a Comment