२९.०३.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> ’तैलबैला’च्या कातळ भिंती
’तैलबैला’ च्या कातळभिंती
हे निर्सगाची वेगळीच निर्मिती आहे.सह्याद्रितले हे एकमेवाद्वितीय असे डोंगरशिल्प बराच वेळ पाहत राहतो.नावापेक्षा अगम्य-अजस्त्र अशा दोन कातळभिंती उभ्या आहेत.त्या तेलबैलाच्या गूढभिंती!
लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या कोरीगड किल्ल्याच्या पुढे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील "तैलाबैला'चा कडा गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो. या कड्याच्या दोन प्रस्तारभिंतीवर आरोहण करताना गिर्यारोहकांचे कसब नेहमीच पणाला लागते.सावधानतेचा, कुशल नेतृत्वाचा आणि चांगल्या सामग्रीने हे शक्य होते.
समुद्रसपाटीपासून तेलबैलाच्या या भिंतींची उंची ३३२२ फूट आहे. चारही बाजूने सोलून काढलेल्या भिंती! जणू एखाद्या डोंगरावर अलगदपणे ठेवलेले केकच्या स्लाइसचे हे दोन भलेमोठे तुकडे! या दोन भिंतींच्या मधोमध एक खिंड आहे. जी खालूनही स्पष्टपणे दिसते.
तैलबैलाच्या पायथ्याशी असणार्या तैलबैला गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे अॅबी व्हॅली च्या दिशेने जावे. कोरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठशहापूर गावापासून फाटा अंदाजे ८.५ किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्या रस्त्यावर तैलबैला असा फलक लावलेला आहे.या फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर आहे.रस्ता खराब असल्याने येथे पोहचायला वेळ लागतो.
तेलबैला गावातूनच ही वाट निघते. डोंगराच्या उजव्या धारेने, उजव्या हाताच्या भिंतीखालून अर्ध्या-पाऊण तासात आपण या खिंडीत पोहोचतो. जसजसे आपण या भिंतीजवळ येतो तसे त्यांचे दडपण वाढू लागते. हे दडपण झेलतच या खिंडीत पोहोचलो की एकदम डोळ्यांपुढे वेगळे जग उभे राहते. कोकण, घाटमाथा आणि पाठीमागचा देश असा हा डोंगरदऱ्यांचा मोठा ‘कॅनव्हॉस’ समोर उभा असतो.या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली आहे. तैलबैला हा जुन्या काळातील कोकणातून सवाष्णी घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टॉवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक अवघड मार्गाचा फायदा घेऊन वर लपून बसत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुंग लावून मधील पायऱ्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
तेलबैला हा काहींच्या मते घाटमाथ्यावरचा दुर्ग! पण डाव्या हाताच्या भिंतीच्या पोटात असलेल्या गुहा, पाण्याची खोदीव टाकी आणि बहिरोबाचे (भैरव) स्थान याशिवाय इथे फारसे काही दिसत नाही. पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या भिंतीवर चढणाऱ्या मार्गात काही ठिकाणी खोदीव पायऱ्यांचे अवशेषही दिसतात. याचा अर्थ इतिहासकाळी या भिंतींवरच्या भागात ये-जा सुरू होती. याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असणार. दुसरीकडे तेलबैलाच्या सर्व बाजू या सरळसोट कडे असल्याने त्याला कुठल्याही बाजूने तटबंदीचे संरक्षण देण्याची गरज पडलेली नाही. या साऱ्यांमुळे या भागातून धावणाऱ्या एखाद्या प्राचीन मार्गावर लक्ष ठेवण्याचे काम हा तेलबैलाचा दुर्गथांबा करत असावा.
आभाळात उंच घुसलेले ते कातळ जणू एकमेकांशी स्पर्धा करतच शेजारी ठाकलेले असतात. आकाशी घिरटय़ा घालणाऱ्या घारींचेच ते स्थान! पण कृत्रिम साधनांच्या साहाय्याने काही मावळ्यांनीही या अजस्त्र भिंतींच्या माथ्यावर आपली पावले उमटवली आहेत.
"वाघजाई घाट ". या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड , आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूने सरसगडाचा माथा दिसतो.
No comments:
Post a Comment