१२.०४.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> कोरीगड
अखंड तटबंदीचा कोरी गड
गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा.
मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात.लोणावळ्याच्या कुशीत विसावलेले कोरी गड अनेक ट्रेकर्सचे लक्ष वेधते.नवख्या ट्रेकरला ट्रेकींगची सुरुवात कोरीगड किल्ल्याच्या भ्रमंतीने करायला हरकत नाही. पावसाळ्यात ह्या गडाचा ट्रेक रमणीय असतो.कायम धुक्यात लपलेला असतो. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करतो.
लोणावळ्यापासून सुमारे बावीस किलोमीटरवर आहे. लोणवळा एस.टी.स्टँडला जात भांबुर्डे किंवा आंबवणे गावात जाणारी एस.टी. पकडायची व पेठ शहापूर या गावात उतरायचे.
खासगी वाहनाने लोणावळ्याहून बुशी डॅमच्या रस्त्याने पुढे पेठशहापूर गाठायचे.
तिथं रस्त्याच्या डावीकडे कोरीगड उभा आहे. कोरीगड उजवीकडे ठेवत मळलेली पायवाट तुडवायला सुरुवात की गिर्यारोहक पंधरा मिनिटांत किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचतो. गडावर वपर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या सुंदर पाय-या बांधलेल्या आहेत.गडाच्या मध्यावर येताच उजव्या हाताला एक सुंदर लेणे पाहण्यास मिळाले..एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. गडावरील एका प्राचीन खोदीव लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव पडले. दरवाजाच्या कमानीलगत दोन्ही अंगांना फुलांची नक्षी कोरलेली. आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या किंवा अलंगा. गणेश दरवाजा ओलांडून आत गेले, की उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. याशिवाय गणेश आणि महादेवाचे देऊळही गडावर आहे. यातील महादेवाच्या मंदिरासमोर काही स्मारक शिल्पेही दिसतात. गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. तिची लांबी दीड किलोमीटर एवढी असून त्यावरून गडाला फेरफटका मारता येतो.
कोरीगड किल्ला तीन हजार फूट उंच आहे.पेठशहापूर गावातून कोराई एखाद्या भिंतीसारखा भासतो. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! किल्ल्याचा माथा म्हणजे एक विस्तृत पठार. मात्र त्याला चौफेर तटबंदी आहे. तटबंदीकडे बघुन आश्चर्यचकित व्हायला होतं. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. पठारावर दूरवर कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी 'लक्ष्मी ' तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंखचक्र गदापद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे.सहसा गडावर शिवमंदिर, देवीचं मंदिर, फार तर गणेश मंदिर आढळतात. मात्र तेथील विष्णू मूर्तीचे अस्तित्व कुतूहल निर्माण करते.
गडावरून खाली कोकणातला कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरानचे पठार, ढाकचा किल्ला, तिकोना, राजमाची, लोहगड, विसापूरच्या किल्ल्याचे सुंदर दर्शन होते.
श्रीमंतांचा सहारा या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र अवघडून गेला.सहारा नगरापासून गड जपायला हवा, न जाणे कधीतरी गडही गिळंकृत करायचे! कोरीगडाला त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!
No comments:
Post a Comment