Wednesday, April 26, 2017

अपरीचित सोंडाई किल्ला


२६.०४.२०१७   रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>      अपरीचित सोंडाई किल्ला


अपरीचित सोंडाई किल्ला


कर्जतच्या जवळ "सोंडाई" नावाचा एक छोटा अपरीचित किल्ला आहे. हा गड तसा प्रसिध्द किंवा जास्त जणांना माहीत नाही. कर्जतच्या आसपास कोथळीगड, भिवगड, सोनगिरी, इरशाळगड, राजमाची, ढाक इ. अनेक परिचित आणि अपरिचित किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांच्या मांदियाळीत एक छोटा आणि आटोपशीर असलेला सोंडाईकिल्ला लपून बसला आहे.  या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.या अशा ओळखीच्या किल्ल्यांव्यतिरिक्त अजूनही काही किल्ले हे उपेक्षिताचे जीवन जगत आहेत.याबद्द्ल वाईट वाटते.


कर्जत किंवा पनवेलवरुन सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी  सोंडेवाडी किंवा वावर्ले या दोन पायथ्याच्या गांवात रिक्षाने पोहचता येते.स्वत:च्या वहानाने येणार्‍यांनी मुंबई - पनवेल मार्गे चौक गाठावे. चौक - कर्जत मार्गावर बोरगाव फाटा चौक पासून ६ किमी आहे.सोंडेवाडी गांव उंचीवर वसलेले असल्यामुळे केल्ल्यावर जास्त चढावे लागत नाही. किल्ला चढाईला अगदी छोटा आणि सोप्पा आहे. माथा गाठायला एक तास पुरेसा आहे. 


 सोंडेवाडी या गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते.काही चढाई नंतर एका पठारावर पोहोचतो.या ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याचा डोंगर प्रथम  उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडे वरून दुसर्‍या पठारावर पोहोचतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं दिसतात. पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे, तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडाची शिडी आहे.वर जाणारा रस्ता हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे या लोखंडी शिडीची सोय आपल्यासाठी मोठा सुखद धक्का ठरतो.येथून पुढचा टप्पा चढतांना आपली पादत्राणे काढून वर जावे लागते. (गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामूळे हा गावकर्‍यांच्या श्रध्देचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा.) गडमाथा छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती सोंडाईदेवीची आहे. गडमाथ्यावरून माथेरानचा डोंगर, मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो.


सोंडाईच्या माथ्यावरून पश्चिमेला दिसतो तो इरशाळगड आणि शेजारीच माथेरानचं विस्तीर्ण पठार! यातही माथेरानची गच्च झाडी आणि झाडीतूनच डोकावणारी आधुनिक बांधकामेही व्यवस्थित दिसतात. एकीकडे पर्यटकांची चैन पुरवणारी माथेरानची व्यावसायिक गजबज आणि दुसरीकडे सोंडाईच्या पायथ्याशी अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत असणारी सोंडेवाडी.

दोन दिवसावर देवीची यात्रा असल्याने गडावर गावातल्या मुलांची वर्दळ होती.मोठी मुलं गडावर येणारी वाट मोठी करुन सुस्थितीत आणत होते.गडावर त्यांनी जेवण बनवल्रे होते.
गाणी गात त्याची कामे सुरु होती,लोखंडाची शिडी रंगवली होती. 


माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामूळे अल्हाददायक व किल्ल्यावरील १५ फूटाच्या कातळ टप्प्यामूळे थरारक होतो. 
किल्ल्यावर टाक्यांशिवाय इतर कोणतेही अवशेष नसल्यामुळे किल्ला बघायला जास्त वेळ लागत नाही. तटबंदी, प्रवेशद्वार आणि इतर वास्तूंचा अभाव, किल्ल्याचा मागे असलेला उंच डोंगर ह्यांच्यावरून सोंडाई किल्ल्याचा मुख्य उपयोग टेहळणीसाठी आणि आजुबाजुच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा.

किल्ला बघून झाल्यानंतर पुन्हा सोंडेवाडीत उतरायचे किंवा नवीन वाटेचा अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्या वाटेने वावर्लेत उतरायचे. वावर्लेतून कर्जतला येण्यासाठी टमटम मिळतात.टेहळणीचे ठिकाण असलेला सोंडाई किल्ला एका दिवसाचा ट्रेक करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

No comments:

Post a Comment