Thursday, May 11, 2017

देखणा जलदुर्ग जंजिरा११.०५.२०१७   रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>      देखणा जलदुर्ग जंजिरा

खूप दिवस वाट पाहिल्यानंतर ’जंजिरा’ या जलदुर्गावर जाण्याचे संधी मिळाली.’जंजिरा’  हा इतिहासप्रसिद्ध जलदुर्ग आहे. ह्या जलदुर्गाचे     बांधकाम पाहून      चकित झालो.     या गडाचे     समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात रक्षण कारणे सोपे नाही.किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज. लाटांच्या तडाख्याने या तटबंदी च्या पायथ्याला जरी खिंडारे पडली तरी अजून आत कणखर कातळ तसाच आहे.म्हणुनच महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.३५० वर्ष अजिंक्य किल्ला यासाठी कुतूहल आणि सिद्दीने केलेले अत्याचार, मराठ्याना न जिंकता आल्याचा राग.मराठयानी महाराष्ट्रावर, भारतावर सत्ता गाजवली. जमीन आणि सागरावर नियंत्रण मिळवले, पण जंजिराने कायमच मराठ्याना हुलकावणी दिली. मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो. 
महाराष्ट्रात रायगड हा जिल्हा गड कोटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जितका हा जिल्हा निसर्गाने व वनराईने समृद्ध व डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे. तितक्‍याच प्रचंड व व विस्तीर्ण प्रकारचा समुद्र किनारा ही या जिल्ह्याला लाभला आहे.

महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या किनारपट्टीचे पूर्वी अनेक जलदुर्ग बांधले गेले.  या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते.जंजि-याच्या तटबंदीवरुन विस्तृत पसरलेला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीचा मनोरम्य प्रदेश दिसतो. समुद्रात बांधलेला कांसा उर्फ पद्मदुर्ग पाहू शकतो.जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन आलेला आहे. जझीराचा अर्थ बेट असा होतो.रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्‍यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा असलेल्या राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्‍याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे.कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिद्ध आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरूडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.


जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर पुणे मुंबई मार्गेअलिबाग गाठायचे.पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते.कोकणातून यावयाचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे - बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.


मुरूड पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरूडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर सौंदर्यात आणखीनच भर टाकतो.राजापुरी गावाच्या किना-याहून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.शिडाच्या होड्यांतून केलेला प्रवास आनंददायी असतो.इथे शिडाच्या होड्यातून जंजि-यावर जाण्याची वेगळीच मजा आहे.इतिहासात असलेल्याचा भास होतो.आपण दंडा राजपुरीच्या किनाऱ्यावरून बोट पकडून सागराच्या लाटांवर स्वार होत थोडक्‍या वेळात जंजिरा किल्ल्याच्या समीप पोहचतो. जंजिरा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या दोन प्रचंड बांधणीच्या बुरूजांमध्ये लपविल्यामुळे त्यांच्या समोर गेल्याशिवाय आपणास ते दिसत नाही. समुद्राच्या लाटांमुळे हेलकावणाऱ्या नावेतून पटकन उडी मारून आपण जंजिरा किल्ल्याच्या पायऱ्यांवर उतरायचे.
प्रवेशद्वारावरील पांढऱ्या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्हीबाजूच्या भिंतीवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेले शिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते.  दोन दरवाजांच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाव्दारावर नगारखाना आहे.जंजि-याची तटबंदी बुलंद आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पाय-या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलाडबांगडी’ असे आहे.जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.किल्ल्यावर दोन मोठाले गोड्या पाण्याचे तलाव आहेत.किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. त्यांच्या शेजारीच सिद्धी घराण्यातील मंडळींच्या कबरी आहे.  या पंचायतनाच्या पटांगणातच काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.येथून बाहेर पडल्यावर समोरच तीन मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच ’सुरुलखानाचा वाडा’ असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्‌कोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. गडावर दोन तलाव आहेत.विशेष म्हणजे सागरी किल्ला असून देखील किल्यातील तलाव हे गोड पाण्याचे आहेत.बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत हीच ’सदर’ आहे.तलावाच्या बाजूने बांधीव पाय-यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.गडाच्या पश्‍चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. पीर पंचायतन, सुरूलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरूज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरूजावरून बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.किल्ल्यामध्यील लोकांसाठी तीन मोहल्ले वसविले होते ज्यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांसाठी होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती जी राजाश्रय संपल्यानंतर तेथून उठून गेली.गडाची ही माहीती तेथील गाईड देतात.पण हा गड पाहण्यास खुपच वेळ देतात.दिलेल्या  वेळेत पळत पळत हा दुर्ग पाहावा लागल्याने गडप्रेमी नाराज होतात. ज्यावेळेस राजपुरीला आपल्याला बोट नेऊन सोडते त्यावेळेस शिवरायांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न ‘त्याची देही, याचि डोळा’ पाहिल्याचे समाधान प्रत्येक दुर्ग प्रेमीच्या चेहऱ्यावर विलसत असते. 

शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.
कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.


जलदुर्गाची इतिहास  


                       जंजिरा किल्ल्यालाच "किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ.स १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला. 
                       इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते.सन १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण,हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिस-या स्वारीचे वेळी शिवाजी महाराजानी व्यंकोजी दत्तो यास फौजेनिशी रवाना केले. त्यानी प्रयत्नाची शिंकस्त फार केली. पण,हा प्रयत्न देखील फसला. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजि-यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले. 


पश्‍चिम किनारपट्टीवर बलदंड जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा मुरूडचा जंजिरा जलदुर्ग अपराजित दुर्ग म्हणून इतिहासात ओळखला जातो. इतिहास काल्पनिक गोष्ट नसल्याने ही गोष्ट मान्य करणे भाग पडते. एवढा बलाढ्य जलदुर्ग जंजिरा पाहण्यासाठी देश-विदेशातूनही पर्यटक प्रचंड संख्येने येत आहेत. याचे रहस्य यात दडलेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जंजिरा किल्ल्याची व्यवस्था आणि निगा राखण्याची जबाबदारी केंद्रीय पुरातन खात्याकडेच आहे.


एकदा तरी हा देखणा जलदुर्ग जंजिरा पाहावा. 

No comments:

Post a Comment