Thursday, May 25, 2017

कासा उर्फ पद्मदुर्ग


२५.०५.२०१७    रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>     कासा उर्फ पद्मदुर्ग








जंजिरा जलदुर्गाच्या शेजारीच ’कासा उर्फ पद्मदुर्ग’ हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे.मुरुड हे गाव तालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे.किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्‍याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.








मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्‍यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपण संख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही.सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगाऊ चौकशी करुन किंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.येथे जाण्यासाठी ’कस्टम’ ची परवानगी घ्यावी लागते. मुरुड जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पहाण्यासाठी जात नाहीत, कारण जंजी-याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पद्मदुर्ग ला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. 









मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गे मुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुड गाठता येते.








पद्मदुर्ग (कासा किल्ला ) ला भेट देण्यासाठी मुरूड कोळीवाडयातील एकदरा गावातून खाजगी बोटीने जावे लागते.एकद-यापासून किंवा राजापूरीपासून नावेने अर्धा तासाच्या आत कासा किल्ल्याला पोहोचतो.येथे जेटी नसल्याने पाण्यातच उतरावे लागते.समुद्राला ओहोटी असल्यास दुर्गावर जाण्यास योग्य वेळ समजली जाते.बोट खडकाला लावतात.तेथे शेवाळ असल्याने सावधानता बाळगावी. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्‌मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.चोहोबाजुंनी समुद्राने वेढलेल्या या पद्मदुर्गला जाताना बोटीत निवांतपणे बसून प्रवास करणे हे आपले  भाग्यच मानले पाहिजे.







कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्‍या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे.  








दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. कासा किल्ल्याच्या महाव्दाराने प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्‍या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत.या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्‍याच्या मार्‍याने झिजलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.

 काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे.तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.आम्ही किनार्‍याकडे निघालो ते एका अविस्मरणीय गडभेटीची आठवण घेउनच.

इतिहास :- 

जंजी-याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता.  त्याला आळा घालणे आवश्यक होते.  त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला.  त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.   

हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या.  त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती.  परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती.  किल्याची  रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती.  या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती.  शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली.  इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही.  मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली.  पद्म्दुर्गावर काम करणा-या अष्टगारातील सोनकोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले.  एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले.  अंधाराचा फायदा घेत जंजी-याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारक-याची वाट पाहीत राहिला.  पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही हा पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला. 

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला.  पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली.  यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव "पालखी" ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले.  याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची "सरपाटीलकी" दिली. 








संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता.  संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात मिळतो.  त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला.  मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.






ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेला हा किल्ला अजूनही तसा अपरिचित. 

No comments:

Post a Comment