Thursday, June 22, 2017

सागरी गडकोट सिंधुदुर्ग

                    सागरी  गडकोट सिंधुदुर्ग 

२२.०६.२०१७  रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>     सागरी गडकोट सिंधुदुर्ग




मालवण तालुक्यामधील सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे सागरी किल्ल्यांमधील एक सर्वांगसुंदर किल्ला म्हणावा लागेल.मराठा साम्राज्याचे शासक किती दूरदृष्टीचे, राज्यनिपुण, महत्त्वाकांक्षी आणि संपन्न होते हे जर आपणाला पहायचे असेल तर महाराष्ट्राच्या कोंकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या महाराष्ट्राच्या सागरीगडकोट किल्ल्यांच्या शृंखलेतील एक अद्वितीय किल्ला सातासमुद्रावरून येणाऱ्या गोऱ्या युरोपीयन आक्रमकांच्या उरात धडकी भरवणारा किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे.अप्रतिम दुर्गबांधणी व अष्टावधानाचे प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला २२ एप्रिल २०१६ रोजी तब्बल ३५0 वर्षे पूर्ण झाली.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवणमधला सिंधुदुर्ग





सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वराज्य रक्षणार्थ सागरी नाकेबंदीची नितांत आवश्यकता आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हेरली आणि मालवणपासून समुद्रात २ किलोमीटरवर असलेल्या एका खडकाळ बेटावर अरबी समुद्रात सागराच्या लाटा झेलणारा सिंधुदुर्गचा किल्ला उभा केला. याच्या आजूबाजूला समुद्रात इतस्ततः विखुरलेल्या खडकांमुळे या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे.  मराठी आरमारासाठी समुद्रातील एक सुरक्षित नाविक तळ म्हणून पण याचा खूप उपयोग झाला.






भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.

मालवणच्या सागरी किनाऱ्यावर दगड-खडकांनी वेढलेल्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग आहे.येथे जाण्य़ास मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्गकिल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते. 





 या किल्ल्यास ३२ बुरूज आहेत. तटाची रूंदी सरासरी १० फूट आहे. तटबंदी नागमोडी वळणाची असून, शत्रूवर तोफा आणि बंदुका यांचा परिणामकारक मारा करण्यासाठी तटाची रचना कौशल्यपूर्ण केली.





सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते.प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.  हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. सिंधुदुर्गकिल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे. 






तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे.  प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन  गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागतेहे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

तटाच्या आत आले की मुख्य रस्ता राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.





वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. 


बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ (चौपाटी) म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत. 
  
किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत.

जेव्हा किल्ला पूर्ण बांधून झाला, तेव्हा तो पाहण्यासाठी शिवाजी महाराज स्वत: किल्ल्यावर आले. तो भव्य-दिव्य किल्ला पाहिल्यावर त्यांनी सर्व सैनिकांचे व कारागिरांचे अभिनंदन केले व कौतुकाने पाठ थोपटली. जेव्हा त्यांनी विचारले, ''या कामाबद्दल काय तुम्हाला काय बक्षीस देऊ?'' तेव्हा सर्वांनी या गोष्टीस नकार देऊन आपली आठवण म्हणून आपल्या हातापायाचे ठसे देण्याची विनंती महाराजांना केली. ही विनंती मान्य करून त्यांनी चुन्याच्या मिश्रणाच्या साहाय्याने आपल्या हाता-पायाचे ठसे दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.जलदुर्ग पाहून झाल्यावर मालवणच्या मेव्याचे आस्वाद घेत पुन्हा बोटीने मालवणच्या किनारी यावे लागते.  



सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येतात.  किल्ला दर्शनासाठी लाखो इतिहासप्रेमी, पर्यटक किल्ल्यावर जातात, पण शासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी योग्य माहिती व इतिहास सांगणारा उपक्रम राबविण्यात आला नसल्यामुळे छत्रपतींच्या शौर्याची गाथा ऐकायला मिळत नाही.


महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा देदीप्यमान इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा म्हणून महाराष्ट्रातील गड कोट किल्ल्यांचे जतन व्हायला हवे सिंधुदुर्ग किल्ला एक प्रतीक आहे. पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता यामुळे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.


सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा.

No comments:

Post a Comment