Thursday, April 18, 2019

चुकामुकीमुळे उडाला गोंधळ




’चुकामुकीमुळे उडाला गोंधळ’ हा लेख ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात दि. १८ एप्रिल रोजी प्रसिध्द झाला आहे.





                               
साता-याहून बामणोली गावच्या दिशेने निघायचे.बामणोली गावात चहापाणी करुन बोटक्लबची परवानगी घेऊन मग वनखात्याची परवानगी घेतली.तसेच वासोटय़ाला नेणाऱ्या बोटीत जाऊन बसलो. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी बोटीची व  आमची तपासणी केली. आमच्याकडे दारू, काडेपेटी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी वासोटय़ाकडे जाण्याची परवानगी दिली. शिवसागर जलाशयातून वासोट्याला जाण्य़ाचा बोटीचा प्रवास सुरु झाला.बोटीच्या प्रवासातच वासोटय़ाचे विलोभनीय दर्शन झाले.

बोटीतून उतरल्यावर किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली.दाट जंगल असल्याने सूर्याची किरणे अधूनमधून कधी तरी अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. खूप फुलपाखरे होती.चालून चालून आम्ही थकलो होतो, पण जंगल काही संपायचे नाव घेत नव्हते. या किल्ल्यावर वनविभागाचे रक्षक कार्यरत आहेत. शेवटी किल्ल्यावर पोहचलो.सह्य़ाद्रीच्या मनमोहक स्वर्गीय सौंदर्याने आमचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. 

आम्ही गडाची तटबंदी पार केली आणि समोरच बिन छपराचे मारुतीरायाचे मंदिर दिसले. पवनसुताची एवढी रेखीव मूर्ती आम्ही कोठेही पाहिली नव्हती.मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. माचीच्या टोकावरून नागेश्वर गुहा दिसत होती.पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.बाबुकडा पाहताच आम्हाला आमच्या डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले.

नागेश्वराला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही.नागेश्वर गुहेच्या दिशेने कुच केली.​वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो. वासोटयाकडे जाणार्‍या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो. इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.एकटे पडू नये.ही वाट मात्र वासोटयाच्या वाटेपेक्षा गंभीर वाटली.ह्याच वाटेवरती जनावरे आढळल्याचे ऐकून होतो.नि खरच या जंगलातून जाताना ते जाणवत राहते.इथली वाट वासोटयाच्या तुलनेने छोटी.अधुनमधून दाट रानातून व झाडाझुडूपांतून जाणारी.फारसे 
चढ-उतार नसलेली.पुढे जात असताना आमच्यातल एकजण नसल्याचे आम्हाला निदर्शनात आले.आम्ही धाबरलो.आता याला कोठे शोधायचे असा प्रश्न पडला.त्याच्या नावाने ओरडा सुरु केला.त्याच्याकडून कोणत्याच प्रतिसाद मिळाला नाही.मनात वाईट शंका येऊ लागल्या.काही जणांना मागे पाठविले व काही जणांना दुस-या वाटेने शोधायला लावले.त्याचा शोध लागत नव्हता.आमचा ओरडा ऐकून वनविभागाचे रक्षक आमच्याकडे आले.त्यांनीही शोध मोहीमेत भाग घेतला.दाट जंगलात काळोख असल्याने वनरक्षकांशिवाय इतर जंगलात शिरण्यास भित होते.धावून पळून वनरक्षकही दमले.पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो.विचारविनिमय सुरु होते. इतक्यात एक वनरक्षक त्याला घेऊन तेथे आला.त्याला पाहून आमच्या सगळ्यांचा जीव भांडयात पडला. आम्ही वासोट्याहून नागेशवरला जाण्यास निघालो तेव्हा तो पाण्यासाठी मागे राहील्याने नागेश्वरच्या वाटेकडे न वळता इतर ग्रुपच्या मागोमाग सरळ बामणोलीला जाण्याच्या वाटेने खाली उतरला.काही वेळाने त्याच्या लक्षात आले की आपल्या ग्रुपची व आपली चुकामुक झालेली आहे. तेव्हा तेथे असलेल्या वनरक्षकाची मदत घेतली. त्या वनरक्षकाने त्याला नागेश्वरच्या वाटेने आणून आमच्याकडे सपूर्द केला.आमची चुक आमच्या लक्षात आली.आम्ही त्या सर्व वनरक्षकांचे आभार मानून पुढे निधालो. 

No comments:

Post a Comment