Monday, October 21, 2019

आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'



दि.२१.०१.२०२१ महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. 





            आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'


 ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या खेटून असणाया  दुर्ग धाकोबाच्या कुशीत गणपती गडद ही लेणी वसलेली आहेत.निसर्गरम्य गणपती गडद, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील ही सुंदर लेणी आहेत.खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागतो.येथे जाण्यास कल्याण सरळगाव, उमरोली, धसई ,पळु आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो.”गणपती गडद” हा माळशेज धारेवरील ढकोबाच्या अंगावर कोरलेला अप्रतिम लेणी समूह याची साक्ष आहे.






सोनावळे गावातून चहापाणी करुन चालण्यास सुरुवात केली.रस्ता हिरवाईने बहरलेला.लाल मातीने वाट रंगलेली.समोरच सह्याद्री ढगात लपलेला व अंगावर धबधब्यांच्या रांगा असा सुंदर नजराणा पाहत अनुभवत लेण्याच्या दिशेने निधालो.वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.त्यामुळे गावापासून लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणाऱ्या निसर्ग श्रीमंतीची ओळख होत होती. वाटेत ओहळातून आवाज करीत पाणी वाहत होते. कातळ पहाडातले हे ठिकाण दूरवरून पाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात आणि आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. रस्ता गर्द झाडीतून जातो पण ठिकठिकाणी वाहत्या पाण्यामुळे निसरडे असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. या डोंगरात कोरलेल्या लेण्या पळूजवळच्या सोनावळे गावातून साधारण दीड तासाच्या चढाईने गाठता येतात.






आपण गणपती गडद या लेण्यांच्या खोदीव पायऱ्यांवर येऊन पोचतो. तेथे क्षणभर बसून सह्याद्रीचे सुंदर रूप आणि नीरव शांतता अनुभवून लेण्यांमध्ये प्रवेश करावा. गणपती गडद हा लेण्यांचा समूह आहे. मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे. त्यातील मधल्या लेण्यांमध्ये सुंदर गणेशमूर्ती आहे. या गणेशमूर्तीच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी बऱ्याच गणेशमूर्ती ठेवल्या आहेत. या गणेशमूर्तींच्या समोर अत्यंत सुंदर कोरीव खांब आहेत आणि त्यांच्यावर विविध यक्षांच्या मूर्तीदेखील कोरलेल्या आहेत. अशा या सुंदर गुहांमध्ये मुक्काम करून सह्याद्रीचे दर्शन घेऊन आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम करता येतो.गुहेतला गणपती बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते.





 पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.पावसाळ्याच्या या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गुहेच्यासमोर पाहायला मिळते.मुख्य लेण्यापासुन खाली १८० फुटाचे रॅपलींग करता येते.हाही एक थरारक अनुभव याठिकाणी घेता येतो.





निसर्गात डोंगरद-यात फिरणा-यांसाठी ही लेणी म्हणजे भटकंतींचे उत्कृष्ट ठिकाणच म्हटले पाहिजे.गणपती गडद लेण्यांना भेट देण्यासाठी दोन ऋतु चांगले आहेत.पाहिला म्हणजे पावसाळा. या ऋतुत या लेण्यासमोर  स्वर्गच अवतरतो.अर्धवर्तळाकार असलेल्या या लेण्यासमुहासमोरुन मोठा धबधबा कोसळत असतो.दुसरा ऋतु म्हणजे उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्रीचा. नाईट ट्रेकींगला येथे मुक्काम करण्यासारखा आंनद नाही.    






अफाट जंगलात, नाणेघाट, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, गोरखगड किल्ल्याच्या वेढलेल्या खडकात वसलेल्या ह्या लेण्या अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे.






एक दिवसात करण्याचा हा एक सुंदर ट्रेक आहे.सह्याद्रीतल्या आडवाटेवर लपलेल्या गणपतीबाप्पाचे शेवटचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागतो.काहीतरी गवसले याचे समाधान मनाला मिळते याचा आंनद होतो.




No comments:

Post a Comment