Monday, October 21, 2019

देवकुंड.....सह्याद्रीतला एक स्वर्गीय अनुभव.






सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा, अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड'.भन्नाट सौंदर्याने वेड लावणारा असा हा धबधबा. गंभीर,निरव आणि अंतर्मूख करायला लावणारं शांततेतलं रुप,शंकराच्या पिंडीवर  अभिषेक केल्यासारखा शांत व सतत आदळणारा धबधबा, हवेतले तुषार,अंगावर कोसळू पाहणारे काळेकुट्ट कडे, थंडगार पाणी,गर्द वृक्षवल्ली व बेफान झालेले पर्यटक असे देवकुंडाचं वैभव आहे.आकाशातून     तुषार असे    कोसळतात जसे स्वर्गातून कुणी जलकुंभ पॄथ्वीवर ओतत असल्याने पर्यटकाना देवकुंड खुणावणार नाही तर नवलच.देवकुंड  अतिशय सुंदर  निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं मनाला शांती देणार रमणीय ठिकाण. हा धबधबा निसर्गाचा अदभुद चमत्कार आहे.








रायगड जिल्ह्यातील     माणगाव तालुक्यातील    भिरा गावाजवळील सह्याद्रीच्या रांगेतून  वाहणारा व कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेला  ’देवकुंड’ नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत   असतो. मुंबई व विशेषत: पुण्यापासून काही     तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या 
आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.देवकुंड हा धबधबा म्हणजे केवळ धबधबा नसुन सुमारे सात किलोमिटरचा असा ट्रेक आहे. देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे.  






भि-यापासून ओढे, डोंगराचे चढउतार पार करुन देवकुंड धबधब्यापर्यत  पोहोचता येते.वाटेवरून जाताना एक दोन कौलारू घरं खुप सुंदर भासली. याच वाटेवर दोन ठिकाणी गावातील लोकांनी   छोटेखानी पाणी सरबत खाऊच्या टपऱ्या मांडल्या होत्या. आता गवताची कुरणं संपून जंगल वाट 
सुरू झाली, तेवढीच उन्हापासून थोडी सुटका. पुढे एक छान मोठा ओहोळ लागला. पाणी वेगात वाहत होते. ओढ्यावरुन जाण्य़ासाठी एक लाकडी  पुल बांधलेला आहे.पावसाळ्यात ट्रेकर्सना याचा वापर    करता येतो.पण तो कमकुवत झालेला आहे. गुडघाभर पाण्यातून दगड गोट्या तून ओढा 
पार करता येतो. तेथून दाट जंगलातील दमवणारी चढण सुरु होते.ही चढण जिथे संपतो तिथुन समोरच भव्य असे दोन कातळ दिसतात.या दोन कातळांना वेगळं करणारी मोठी सांध दिसते, तीच प्लस व्हॅली.या व्हॅलीतून    खाली येणारे पाणी रौद्ररुप  धारण करीत धबधबा निर्माण होतो.या कोसळणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेला मोठाच्या मोठा पन्नास फुट खोल खड्डा   म्हणजे देवकुंड आणि यामध्ये पडणारे पाणी प्रचंड वेगाने पुढे  वाहून नेते ती कुंडलीका नदी. ह्या वाटचालीमध्ये एकाबाजूने अथांग जलाशय, चहुबाजुंनी     सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि गर्द झाडीने नटलेली  वनराई तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते.




पावसाळ्यात  तिथे   जाणे थोडे  कठीण आहे   कारण जाताना दोन    ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे.पावसाळा संपल्यावर या ठिकाणी  जाण्यास योग्य वेळ आहे.त्या ठिकाणचे निसर्गसौदर्य खुप छान आहे.







देवकुंडात कोणीही पोहण्यास उतरू नये, तसेच मुख्य धबधब्याच्या      जवळ जाऊ नये. देवकुंडांचे सौदर्य शापित झालयं. दुर्घटनांचा शाप लागला  आहे.अतिउत्साहात केलेलं  धाडस त्यांच्या जिवावर बेतल आहे.धबधबा सुंदर दिसला तरी मनावर ताबा ठेवला पाहिजे.अतिउत्साहात नसतं धाडस करु नये.नाही तर देवकुंडाची वाट थेट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल.शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये.अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये. निसर्गाला देव  मानून त्याचा आदर करून, त्याच्या नियमांना आव्हान न करता जेवढा निखळ आनंद घेता येईल  तेवढा मनमुराद घ्या.






सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल सह्याद्रीत जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात.निसर्ग पाहण्यासाठी आपण इतर राज्यात लांबचा प्रवास करीत असतो.पण आपल्या जवळील सुंदर निसर्ग   पाहण्यास फिरकत नाही.आपल्या आजुबाजुला इतका सुंदर निसर्ग असुन देखील  ती पाहण्याची व अनुभवण्याची आपल्याकडे क्षमता   व सोयी सुध्दा नसाव्यात,हे  आपलं दुर्दैव.हा निर्सग पाहण्यासाठी सर्वसामान्यांना तेथे जाऊन अनुभवाता येईल अशा सोयी उपलब्ध व्हाव्यात. 






दि.०३.१२.२०२० महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. 

No comments:

Post a Comment