अखेर कॅमेरा सापडला.
तोरणा आणि राजगड असा आमच्या मित्रांचा ट्रेक होता. तोरणा आणि राजगड, दोन ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणागड. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. तोरणा गडाच्या पायथ्याच्या ’वेल्हे’ गावातून चढाईला सुरुवात करीत बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आम्ही बालेकिल्ल्यात प्रवेश केला. थोडी विश्रांती करुन गडदर्शनास निघालो. झुंजार माची व बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप. बालेकिल्ल्यावर असलेल्या गडदेवता ’मेंगाई’च्या मंदिरात रात्रीचा मुक्काम केला. दुस-या दिवशी लवकरच दक्षिण फाटय़ावरील ’भगत’ दरवाजातून डोंगरदांडय़ाच्या रस्त्याने राजगडाला निघालो. यामार्गाने उतरणे कठीण असल्याने आम्ही एकमेकाला आधार देत सुरक्षित उतरुन डोंगरवाटेला लागलो. मित्रांचे फोटो काढणे सुरु असल्याने उतरण्यास वेळ लागत होता.त्याकाळी मोबाईलमध्ये फोटे काढण्याची सोय नव्हती. आमच्यातल्या दोघांकडेच कॅमेरे होते.उन वाढल्याने चांगलेच चटके बसत होते.डोंगरवाटेत झाडे कमी असल्याने छोट्या झाडांच्या सावलीत बसून पाणी पित थोडा आराम करीत पुढचे मार्गक्रमण करीत होतो. राजगड व तोरणागडाच्या खिडींत पोहचलो.आम्ही विश्रांती घेण्यासाठी व आणलेला खाऊ खाण्यासाठी थांबलो. कॅमेरा रस्त्यात राहिल्याचे कॅमेरा असलेल्या मित्राच्या लक्षात आले. त्याने सर्वांकडे कॅमे-याबद्दल विचारणा केली. कोणाकडे संबधीत माहीती मिळाली नाही.कोठे राहीला असेल याबद्द्ल त्याला काहीच आठवत नव्हते. कॅमेरा ब-याच किंमतीचा असल्याने तो मित्र नाराज झाला. तोरणागडावरून मोठा पल्ला मारत इथपर्यत पोहचलो होतो.पाठीमागे जाणे व कुठपर्यत जाणे याची कल्पना येत नव्ह्ती.त्यावेळी काय करायचे काहीच सुचत नव्हतं. आमच्यातला एक मित्र कॅमेरा शोधण्यासाठी मागे जाण्यास तयार झाला. पण ज्याचा कॅमेरा हरवला तो थकल्यामुळे स्वत: व मित्रालाही कॅमेरासाठी मागे पाठवण्यास तयार नव्हता.
त्याचवेळी दोन ट्रेकर राजगडावरून खाली उतरुन तोरणागडाच्या दिशेने निघाले होते. ते दोघे आम्ही आलेल्या वाटेनेच तोरणागडावर जाणार होते. त्या ट्रेकरशी बोलताना, आम्ही आमचा कॅमेरा मागे वाटेवर राहील्याचे त्यांना सांगितले. तुम्हाला वाटेत कॅमेरा सापडला तर आम्हाला आमच्या मोबाईलवर कळवा. पुढे काय करायचे ते नंतर ठरवू. ते दोघे ट्रेकर निघून गेले. आराम करुन निघण्याच्या वेळेला त्या ट्रेकरचा फोन आला. आम्हाला आपला हरवलेला कॅमेरा झाडावर अडकवलेल्या स्थितीत सापडला आहे. आम्ही कॅमेरा घेऊन तोरणागडावर जात आहोत. ज्याचा कॅमेरा हरवला होता, तो खुष झाला. पण आता कॅमेरा मिळवायचा कसा? हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला होता. कॅमे-यासाठी त्यांच्यापर्यत पोहणे गरजेचे होते. कॅमेरावाला मित्र थकल्याने मागे जाण्यास तयार नव्ह्ता.मित्राचा कॅमेरा मिळवण्यासाठी दुसरा मित्र जाण्यास तयार झाला. एकट्याला कसे पाठवायाचे म्हणून सोबतीला आणखी एक मित्र तयार झाला. त्या दोघांना सर्व माहीती,पैसे व खाऊ दिला.ते दोघे निघाल्यावर आम्ही राजगडाकडे कुच केली.कडक उन्हातून उभी चढाई चढताना खुपच त्रास झाला.
चारच्या दरम्यान आम्ही गडांचा राजा ’राजगडा’वर पोहचलो होतो.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे.राजगडावरील ’पद्मावती’ देवीच्या मंदिरात आमची राहण्याची सोय झाली. कॅमेरा मिळविण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा फोन आला. तोरणा गडावर गेल्यावर आमचे मित्र त्या दोन ट्रेकरना भेटले व ओळख दिल्यावर त्यांनी कॅंमेरा आमच्याकडे दिला.त्यांनी त्यांचे आभार मानले व ती रात्र त्या मित्रांसोबत गडावर काढून ते सकाळी लवकरच गड उतार होऊन मुंबईला निघाले.
आम्ही दुस-या दिवशी सकाळी राजगड दर्शन करुन दुपारी गड उतार झालो.या ट्रेकमध्ये हरवलेला कॅमेरा मिळाल्याचा आंनद सर्वांना झाला. पण आमच्यातल्या त्या दोघा मित्रांना राजगडचा ट्रेक करता आला नाही. याचे दु:खही झाले. मुंबईत दोन दिवसानी त्याचा कॅमेरा त्याला दिला पण पार्टी वसुल केली. मित्राला हरवलेल्या कॅमे-यापेक्षा पार्टी महागात पडली होती.ट्रेकचे फोटो बघताना तोरणा राजगड ट्रेकची आठवण कायम येते.
No comments:
Post a Comment