Sunday, April 18, 2021

वैभवसंपन्न हम्पी

 






वैभवसंपन्न हंपी


पौराणिक खुणा जपणारं, देशोविदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारं हंपी शहर. हंपी इतकं सुंदर आहे की तिथल राहाणीमान,तिथलं वातावरण ,तिथली संस्कृती ,तिथला सुर्योदय,तिथला सुर्यास्त व तिथल्या सावल्यांचा खेळ हा वेगळाच व हवाहवासा वाटणारा आहे. देशातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपले पाहिजेत. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर, एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.येथे स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना पाहता येतो. ऐतिहासिक महत्व तसेच पौराणिक कथांची परंपराही या शहाराला लाभलेली आहे. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे.   


हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. कर्नाटकात १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेले हंपी जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावून आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते.हंपीतील दगड व शिलांमध्ये सौंदर्य तिथे गेल्यावर अनुभवता येते. वर्षानुवर्ष या वस्तू जशाच्या तशा अवस्थेत आहेत,ही निर्सगाची अभ्दूत किमया हंपीत अनुभवायाला मिळते.वर्तमान व भूतकाल या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन झंपी आजही उभं आहे,हेच हंपीचं वैशिष्ट्य. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे.  


हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच.

विठ्ठल मंदिर हे हंपीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत.विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे.

कमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास उलगडत जातो. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसहित मांडलेली पाहून संस्कृती पाहता येते.

कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. 

हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे.

नरसिंह, हा विष्णूचाच अवतार असल्याने वैष्णवांमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. सात नागाच्या फण्याने आच्छादित केलेल्या या मूर्तीच्या मांडीवर पूर्वी लक्ष्मी बसलेली होती. म्हणून लक्ष्मी-नरसिंह असेही संबोधले जायचे. 

लक्ष्मी-नरसिंह मूर्तीजवळ नऊ फूट उंचीचे शिवलिंग आहे. एकाच काळ्या पाषाणात हे शिवलिंग कोरलेले आहे. हे पाण्यात असून बडवीलिंग मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

हजारा राम मंदिर हे हम्पीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विजयनगर शैलीतील हे देखणे मंदिर असून, यामध्ये रामायणाचे प्रसंग कोरलेले आढळून येतात. 

महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल ,ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्‍यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र.

तुंगभद्रा नदीवरील मोठे धरण असून, धरणाच्या पायथ्याशी वृंदावनची छोटी आवृत्ती असलेला बगीचा आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच टेकड्यांवरून धरणाचे विहंगम दृश्य पाहता येते. 


हंपी एक असं शहर आहे जे अतुलनीय सौंदर्य, ऐतिहासिक वैभव, भारतातल्या एका समृद्ध हिंदू राजेशाहीच्या खुणा आणि तिचा भयाण शेवट हे सगळं एकत्र घेऊनच जगतं. वर्तमानात राहून ऐतिहासिक चव असलेलं हे शहराला  आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच. पण हंपीचे सौंदर्य पाहण्यासाठी वेळ काढून जायाला पाहिजे.

No comments:

Post a Comment