Tuesday, May 18, 2021

बदामी

 






बदामी, मंदीरांचे शहर 


’हंपी’ पाहून झाल्यावर ’बदामी’ ला भेट दिलीच पाहिजे. ’हंपी’हून ’बदामी’ला जाताना रस्त्यात ’ऐहोले’ व ’पट्टडकल’ ही सुंदर ठिकाण लागतात. ही दोन्ही ठिकाणं पाहूनच बदामी शहरात पोहचावे.   बदामी, पट्टदकल व ऐहोळे या तीन ठिकाणी चालुक्यांनी बांधलेली मंदिरे व गुंफा आजही पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरल्या आहेत. प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे.बदामीत जैन, बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळतो. 


कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातला बदामी हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा एक भाग आहे.हे भारतातील पारंपारिक मंदिर वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.’बदामी’ आपल्या समृद्ध इतिहास आणि प्राचीन वास्तुकलासाठी प्रसिध्द आहे. बदामी  सुरुवातीच्या चालुक्य राज्याची प्राचीन राजधानी होती. चालुक्यांनी स्थापत्यकलेच्या एका अद्वितीय शैलीचा पाया रचला, जो उत्तर भारतीय नगारा शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैलीतील स्थापत्यशैलीचे उत्तम मिश्रण आहे. भारत सरकारने बदामीला भारतातील एक हेरिटेज शहर म्हणून घोषित केले आहे.


बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदीरं आहेत.एकेक मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. बदामीमध्ये शैव,वैष्णव आणि बौध्द धर्माच्या परंपराचे दर्शन घडवणा-या गुंफा आहेत.नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती,अर्धनारी नटेश्वराचं शिल्प,हरीहर,महिषासूरमर्दीनी,विष्णूचे दशावतार,पद्नपाणी बुध्दाचे शिल्प. डोळ्यांचे पारणे फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत.लाल वालुकाश्मामध्ये या सा-या गुंफा खोदून काढलेल्या आहेत. बदामी येथील गुहेतील शिल्पे आपल्याला अनोख्या विश्वात घेऊन जातात  


लाल लाल दगडांचे डोंगर फोडून एकाच कातळात कोरलेल्या ह्या लेण्या बघायला लांबून पर्यटक येतात. मुख मंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेली मंदिरे इथे लेण्यांच्या आतमध्ये कोरलेली दिसून येतात.पहिली लेणी शिव मंदिर आहे. येथील शिवतांडव हे कोरीव शिल्प शिवाचे नटराज रूप दर्शवते. त्या बाजूला गणेश आणि नंदीचेही दर्शन होते.त्याच मंदिरात महिषासुरमर्दिनीचे शिल्प आणि मोरावर स्वार असलेले कार्तिकेय भगवंताचे शिल्प देखील आढळून येते. यक्ष आणि अप्सरांची कोरीव शिल्प लक्ष वेधून घेतात.दुसरी आणि तिसरी लेणी विष्णू मंदिर आहे. येथे विष्णूच्या अवतारातील वामन, वराह इत्यादी कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. विष्णुपुरणातील प्रसंग देखील कोरलेले दिसून येतात.तर चौथी लेणी जैन मंदिर आहे. जिथे पार्श्वनाथ, महावीर आणि बाहुबलीची शिल्पे आढळून येतात. बदामी लेण्यांजवळ असलेले अगस्त्य तीर्थ ह्या तळ्याकाठी बांधलेले भूतनाथ मंदिर देखील आवर्जून पाहण्यासारखे आहे. तलावाच्या बाजुला संग्रहालय असून तेथून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.बदामी किल्ला बदामी लेण्यांच्या अगदी अगदी समोर आहे. किल्ला पाहण्यासारखा असून तेथून बदामी शहर पाहता येते. गिर्यारोहणासाठी चांगली जागा आहे. 


बनशंकरी देवी मंदिर, हे मंदिर बदामीपासून जवळ चोलचगुड येथे आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण या ग्रंथातील कथेप्रमाणे स्थानिक लोकांना त्रास देणाऱ्या असुराला बनशंकरीच्या रूपात पार्वतीने ठार केले व शांतता प्रस्थापित केली.महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. येथे मोठा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. अतिशय जागृत देवस्थान असलेल्या बनशंकरी मातेचे पवित्र दर्शन आपल्याला नक्कीच सुखावते. 


बदामीपासून ३२ किमी अंतरावर असलेले ’ऐहोळे’ येथे प्रामुख्याने लाडखान मंदिर, हुचप्पायगुडी मंदिर, दुर्गा मंदिर, मेगुति जैन मंदिर, रावणपडी गुंफा मंदिर, गौडा मंदिर, सूर्यनारायण मंदिर व संग्रहालय आणि कलादालन बघण्यासारखे आहे. ऐहोळे ही चालुक्यांची पहिली राजधानी होती. किल्ल्याच्या तटबंदीसारखे असलेले दुर्गमंदिर (दुर्गा मंदिर) हे ऐहोळे येथील एक मुख्य आकर्षण आहे. मंदिरसमूहात वेगवेगळ्या देवदेवतांची सुंदर मंदीर आहेत.ऐहोळे नावाच्या गावात, तिकडची मंदिरं, संग्रहालय पाहून आपण काहीतरी खूप छान पाहत आहोत याचा अनुभव प्रत्येक क्षणाला येत असतो.


बदामीपासून २२ किमी अंतरावर असलेले ’पट्टदकल’  हे एक मोठा ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटनस्थळ आहे. कलेच्या इतिहासकारांची ’पट्टदकल’ ही स्वप्ननगरी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सोपस्कारानुसार तिकिटे खरेदी करून आम्ही त्या संकुलात प्रवेश केला.  संकुलात प्रवेश केल्या केल्या दुतर्फा तीन-चारशे मीटर लांबीच्या हिरव्यागार गालिच्याने आच्छादलेला परिसर नजरेत भरतो. त्याच विस्तीर्ण प्रांगणावर सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यान उभारल्या गेलेली दहा मंदिर पहावयास मिळतात. भारतातील विविध शैलीतील मंदिरांचा समूह येथे पाहण्यास मिळतो. यातील चार मंदिरे दाक्षिणात्य पद्धतीची, तर चार मंदिरे उत्तर भारतीय नागरशैलीतील आहेत. पापनाथ मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गळगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वीरुपाक्षझा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ही मंदिरे येथे आहेत. दगडातील ही सुंदर मंदिरे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रचिती येते.  



पट्टडकल, ऐहोले आणि बदामी येतील सगळी हिंदू मंदिरे द्राविडी स्थापत्य पद्धतीने बांधण्यात आली आहेत. काळाच्या ओघात आणि परकीयांच्या आक्रमणात मंदिरांची नासधूस झालेली असली तरी सुंदर कलाकुसर, कोरीव शिल्प तिथे अजूनही बघायला मिळतात.



No comments:

Post a Comment