Monday, June 14, 2021

नेपाळ

 



उंचशिखरांचा देश...नेपाळ  


आपल्या देशाच्या शेजारील एकातरी राष्ट्रात पर्यटनाला जाण्याचा विचार खूप दिवसापासून मनात घोळत होता.’साळुंके टूर’ या कंपनीची जाहीरात वाचून जाण्याचे नक्की केले. कमी पैशांमध्ये ऍडव्हेंचर, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेची परदेशी टूर करायची असेल तर नेपाळ सारखे दुसरे आकर्षक ठिकाण नाही.नेपाळला ‘भटकंतीचा स्वर्ग’ देखील म्हटले जाते.पर्यटन हा नेपाळचा प्रमुख व्यवसाय असल्याने व या देशाचा इतिहास बघितला तर या देशावर दुसऱ्या कोणत्याही देशाने राज्य केले नाही आणि ते कुणाचे गुलामही बनले नाहीत त्यामुळे येथे स्वतंत्रदिवस साजरा केला जात नाही. नेपाळ हा देश जगातील तीन हिंदू राष्ट्रांपैकी एक आहे.हे विषेश असल्याने नेपाळला भेट देण्याची माझी खूप इच्छा झाली होती. भूकंपामुळे या देशाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. सहलीत आम्ही नेपाळ मधील चितवन ,पोखरा, काठमांडू व भारतातील गोरखपूर या शहरांना भेट देणार होतो. नेपाळ मध्ये तसे पासपोर्ट ची गरज लागत नाही तुमच्या कडे कोणतेही एखादे भारतीय ओळख पत्र असेल तर चालते जसे आधार कार्ड. 


भौगोलिक संपन्नतेने नटलेले, अनेक देव देवातांची मंदिरे असलेला हा हिंदुराष्ट्र लहान असला तरी धार्मिक वातावरणाने तो एकमेकांशी भावनिक नात्याने जोडलेले आहे.नेपाळचा उत्तर भाग हिमालयाने घेरलेला आहे. जगातील दहा सर्वात उंच शिखरापैकी आठ शिखरं नेपाळ मध्ये आहेत. जगातील सर्वात उंचशिखर एव्हरेस्टही नेपाळमध्‍ये आहे.मी गिर्यारोहक असल्याने जगप्रसिध्द हिमालयातील उंचशिखर पाहण्यास खास आलो होतो.


गोरखपूर येथून ’सुनौली’ पर्यत प्रवास करून नेपाळ मध्ये प्रवेश केला. पहिले ठिकाण ’चितवन’ येथील ’नॅशनल पार्क’ जंगल सफारीची मजा घेता आली. पहाटे थंडीत खुडखुडत उघड्या जीपमधून जंगल सफारी गेलो.हरीण, डुक्कर व पक्षी पाहायला मिळाले. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले हे जंगल इतिहासकाळात नेपाळच्या राजघराण्याचे शिकारीचे जंगल होते. या अरण्याचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे दुर्मिळ होऊ लागलेल्या घरियाल मगरी, धोक्यात आलेला एकशिंगी गेंडा आणि संरक्षणाची गरज असलेला पट्टेरी वाघ, हे तीन महत्वाचे प्राणी इथे आहेत.



पोखरा हे काठमांडू शहरांपासून २०३ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील फेवा सरोवर जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. सरोवरात नौकाविहारास पर्यटकांची गर्दी असते. फेवा सरोवराच्या शांत निर्मळ पाण्यात दिसणारे माउंट फिशटेल आणि इतर हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहता येते. हिमशिखरांच्या गराड्यात, हिरवाईचा लेवून वसलेलं पोखरा हे नेपाळमधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अन्नपूर्णा रांगेतल्या हिमशिखरांचा बॅकड्रॉप लाभलेले पोखरा आज पर्यटकांना शुध्द हवा, आल्हाददायक वातावरण आणि डोळे सुखवणारा निसर्ग ह्याने खूश करते. पोखराला भेट दिल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण म्हणजे ‘डेवीस फॉल’ हा धबधबा. या धबधब्याच्या जवळच गुप्तेश्‍वर महादेव आहे. नावाप्रमाणे हा महादेव-शंकर अनेक वर्ष जमिनीत गुप्त होता, आता त्याच्या गुहेतील मंदिराचे दर्शन घेता येते. गिर्यारोहणाचा दस्तऐवज जपणारे आणि माउंटेनियर्सचं विश्‍व उलगडून दाखवणारे इंटरनॅशनल माउंटन म्युझियम आहे.



काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. भारतातून नेपाळला येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला दर्शन घ्यायचं असतं ते काठमांडूच्या पशुपतीनाथाचं. नेपाळी पगोडा शैलीत बांधलेल्या या मंदिराला असलेली चार प्रवेशद्वारे चांदीने मढवलेली आहेत. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे आणि गाभार्‍यातील शिवलिंग सुमारे सहा फूट उंचीचं आहे.आम्ही काठमांडू येथे महाशिवरात्री या दिवशी असल्याने पशुपतीनाथाच्या मंदीर परिसरारात खुप गर्दी होती.मोठी जत्रा भरली होती. काठमांडूपासून १० किमी अंतरावर शिवपुरी टेकडीजवळ बुढा नीलकंठ मंदिर आहे. मंदिरात शिवाची चतुर्भुजी मूर्ती पाण्यामध्ये निद्रावस्थेत अतिशय सुंदर आहे.काठमांडूच्या जवळच असलेले भक्तपूर हे शहर १५ व्या शतकात मल्ला राजघराण्याची राजधानी होते.या राजवैभवाच्या खूणा इथल्या दरबार चौकातील वास्तुंच्या रुपाने आजही पाहायला मिळतात. 


पोखरा ते काठमांडु या शहरांच्या मध्ये उंच डोंगरावर वसलेल्या मनोकामना देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. वर पोहचण्यास केबल कारने जावे लागते.खाली वाहणा-या नदीचा नजारा पाहण्यासारखा आहे.


लुंबिनी येथील साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट दिली. एक सुखद आणि मनाला शांती देणारे स्थळ पाहून धन्य झालो. 


भारतात प्रवेश केल्यावर गोरखपूर येथील गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु केला. 


आमच्या सफरीच्या वेळी नेपाळ मधील सगळ्या शहरात ढगाळ वातावरण असल्याने हिमालयातील उंचशिखर पाहता आली नाही. ती शिखरं विमानातून पाहून आमची नाराजी आम्ही दूर केली. पण ती शिखर जमीनीवरून पहायची असल्याने पुन्हा नेपाळ सफर करणार आहे.


No comments:

Post a Comment