Monday, July 19, 2021

सायकलवरून ....’अष्टविनायक यात्रा’

 


दि.१९.०७.२०२१ रोजी हा लेख ’महाराष्ट्र टाईम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झाला आहे. 




’अष्टविनायक यात्रा’..... सायकलने 


दोन चाकावर संपुर्ण जग फिरण्याचे स्वप्न सुरुवातीपासुन होते. काही तांत्रीक अडचणी आल्यामुळे मग कमीत कमी आपल्या महाराष्ट्र राज्य सायकलवर जवळुन पाहण्याचे ठरविले. प्रथम घरातुन या सहसाला विरोध होतो. मित्राबरोबर प्रथम मुबंई ते बोर्डी एका दिवसात प्रवास केला. सायकल प्रवास करुन सुरक्षित घरी परतल्यावर आमच्यापेक्षा घरच्याना आनंद व विश्वास पटला. मग नव्या सफारींना जोरात सुरुवात झाली. भिरा-पाली ते मुबंई, मी व मित्र अरविंद जागडे याच्यासोबत दोन दिवसात पुर्ण केली. काही दिवसात आलिबाग-मुरुड(जंजिरा) हि सफर तीन दिवसात पुर्ण केली. मग मित्रांसह शिर्डी - औरंगाबाद सायकल सफार दहा दिवसात पूर्ण केली होती.असा सायकल प्रवास सुरु झाला होता.


आता उत्साह वाढला होता.नव्या दिशा खूणवत होत्या. जानेवारी १९८६ या सालात श्री.अष्टविनायकांच्या दर्शानाला सायकलवर जायचे ठरले होते. मी, अरविंद जागडे (प्रमुख), सुरेंद्र कोचरेकर व सुरेश सतांनम अशी चार जणांची टिम जमली. फक्त अकरा दिवसात सफर पूर्ण करण्याचे पक्के केले. जोरात सराव सुरु केला. खर्च जास्त येणार असल्याने प्रायोजकाच्या शोधात धावपळ सुरु केली.काही विशेष हाती आले नाही. आपणच सर्व खर्च उचलायचे ठरविले. सफारीच्या मार्गाची आखणी व वस्तु गोळा करीत तयारीला लागलो.माहीती व ओळखी जमवल्या. सफरीचा दिवस जवळ येउ लागल्याने धावपळीला वेग आला.सायकलीचे साहीत्य, औषध, कपडे,पैसे ई.वस्तु पाठीवर टाकुन व काही वस्तु सायकलवर अडकवून घरच्यांचा आशिवार्द व मित्रांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला. 


रोजचा १०० ते १२५ किलोमीटर प्रवास करायचा ठरला.आमच्याकडे आतासारख्या अद्ययावत गिअरच्या सायकली नव्ह्त्या.आतासारखे त्यावेळी गुळगुळीत रस्ते नव्हते. सायकल प्रवासात चांगलाच कस लागायचा. आम्हाला जास्त सायकल प्रवास करुन जमणार नव्ह्ते. अकरा दिवस उत्साह टिकवायचा होता. आम्ही रात्रीचा प्रवास मात्र टाळायचो. आता एवढी रस्त्यांवर वाहतुक नसल्याने आम्हाला त्रास कमी झाला होता. मोबाईल नसल्याने नजरेच्या टप्यात राहून सायकल हाकावी लागत होती.रोलचा कॅमेरा घेऊन गेलो होतो.आमचा सगळा संसार सायकलवर असायचा. प्रवासात पोलिसस्टेशन, देवस्थानाच्या धर्मशाळा, मंदीर, शाळेत कोठेही राहायचो.एकदा तर पोलिस स्टेशनमध्ये चोरांच्या बॅ-याक मध्ये रात्र काढली. सुरक्षित ठिकाणी राहायचो. थंडी असल्याने सकाळी प्रवासाला सुरुवात थोडी उशिरा होत असे पण दिवसभर प्रवास सुरु असायचा.कालवे व नद्यांवर आंधोळ करायचो.खाणे बाहेर असायचे.फळ जास्त खात असू.चौघंच असल्याने प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पुर्ण व्हायचा.विश्रांतीला वेळ मिळायचा.देवळातून सकाळची आरती करून निघायचो तर कधी सांज आरतीला मंदीरात असायचो.मंदीरात आतासारखी त्यावेळी गर्दी नसायची.गणपतीबाप्पांच्या सानिध्यात आम्हाला राहता आले.पुजा-यांना आमच्या साहसाची माहीती कळल्यावर आम्हाला आशिवार्द व प्रसाद मिळायचा.आमचा हा सायकल प्रवास पाहून आमचे कौतुक व्हायचे.काहीजण भेटी देत होते.लहानमुलं मागे पळत यायची.आम्हाला पाहिल्यावर बाजुने वेगाने जणा-या गाड्यांचे वेग कमी व्हायचे.त्यावेळी असली साहसं नवीन वाटायची.     



मोरगावचे मयुरेश्वर,थेऊरचे चिंतामणी,सिद्धटेकचे सिद्धिविनायक,रांजणगावचे महागणपती,ओझरचा विघ्नहर,लेण्याद्रीचा गिरीजात्मज, महडचा वरदविनायक व पालीचा बल्लाळेश्वर यांचे आमच्या सफारीला आशिवार्द लाभल्याने आमची सायकल सफर व्यवस्थित पार पडणार याची खात्री होती. पाली, महड, पुणे, जेजुरी, थेउर, मोरगाव, सिध्दटेक, ओझर, लेण्याद्री, राजंनगाव येथुन खंडाळामार्गे पुन्हा मुंबई असा नऊ दिवसातच सायकल प्रवास पूर्ण करुन घरी सुखरुप पोहचलो होतो. आम्हाला शॉर्ट कट मिळाल्याने आमची यात्रा आम्हाला तीन दिवस लवकर पूर्ण करता आली. पुर्वतयारी चांगली केल्यामुळे प्रवास सुरळीत व कमी त्रासाचा झाला.रोजच्या प्रवासाची माहीती रोज घरी कळवायच्या अटीवरच सफारीला जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे आम्ही घरच्याबरोवर रोज संपर्कात होतो.त्यावेळी पब्लिक  फोनने घरची मंडळीशी संपर्क असल्याने ती मंडळी निर्धास्त होती. यात्रा पूर्ण करुउन आल्यावर मित्रांनी जंगी स्वागत केले. एका साप्ताहिकामध्ये आमच्या चौघांची मुलाखत प्रसिध्द झाली होती. ही आमची सफर एकदम स्मरणीय ठरली. 


अष्टविनायकांनी आमच्या सारख्या आगळ्यावेगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण केली.




No comments:

Post a Comment