Thursday, August 26, 2021

ट्रेकर्ससाठी एक पर्वणी

 






                                      ‘कलावंतीण’ दुर्ग   


 नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गडाच्या बाजुला दिमाखात उभा असलेला ‘कलावंतीण’ चा बुरुज. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.

पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. कलावंतीणसुळका हे प्रबळगडा शेजारील एक सौंदर्यस्थळ आहे. पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत ’प्रबळगड’ व ’कलावंतीण’ बुरुज वसलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि ’शेडुंग’ फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे.छोट्याशा प्रवासानंतर लोणीवली वाडीला जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. 

माचीच्या पायथ्याशी ’गणपती’ व ’हनुमान’ यांचे उघडे मंदिर लागते. दर्शन घेऊन पुढे आलो कि एक पठार (प्रबळमाची) लागते.’शेडुंग’  मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते.गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते.’कलावंतीण’ बुरुज हा खालून पहिले असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याच्या भयानकेतेची महती कळते. 

पायवाटेने प्रबळवाडीची वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट ’प्रबळगडा’ साठी तर  डावीकडील वाट ’कलावंतीण’ साठी जाते. डावीकडील वाट पकडावी.घनदाट जंगलातून वाट काढत आपण प्रबळ व कलावंतीण यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचतो.डोंगरात खोदलेल्या सरळ असलेल्या पायऱ्या हे ’कलावंतीण’ चे मुख्य वैशिष्ट्य व आर्काषण आहे. इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात. या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरणा-याला अजिबात दृष्टीभय वाटत नाही. त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!

प्रबळगडाकडे पाठ करून आपण डोंगरकपाऱ्यांच्या आधाराने काही उंचीवर खोदलेल्या पायऱ्या गाठतो. या पायऱ्या दगडात व्यवस्थित कोरल्या आहेत. एका बाजूला खोल दरी असल्यामुळे इथून जाताना जरा सावकाश चढाई करावी लागते.डोंगरात खोदलेल्या एक फुट ते दीड फुट उंचीच्या पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. ही चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे वाटते. माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या व कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर  जाण्याच्या मध्ये उभा असतो.शेवटी सुळक्याचा माथा गाठण्यास परिश्रम करावे लागतात. 


कठीण वर्गात गणल्या जाणा-या कलावंतीण बुरुजावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात राहतो.पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची प्रचीती आल्याविना राहत नाही. माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी  होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसते,  तर ईशाळगड प्रबळच्या मागे लपलेला( जो प्रबळ गडाहून दिसतो), पुर्वेला चंदेरी, विकटगड तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे दर्शन घडते. एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित पाहून होतो.



कलावंतीण बुरुज हा “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण येथे नवख्याने ट्रेकींगसाठी शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक सोबत असावेत. पावसाळ्यात पाय-यांवर चिखल व शेवाल असल्याने हा ट्रेक जास्त धोकादायक आहे,याचे ट्रेकरनी नोंद घ्यावी”कलावंतीण दुर्ग’चा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.’कलावंतीण दुर्ग’चे गिर्यारोहण एक पर्वणी आहे


No comments:

Post a Comment