Wednesday, September 15, 2021

स्वप्नवत वाटणारी सफर

 



         दि.१६ सप्टेंबर २०२१... महाराष्ट्र टाईम्स ..पुरवणी



स्वप्न सफर...नुब्रा व्हॅली 


लेहमधली प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन दुस-या दिवशी नुब्रा व्हॅलीच्या दिशेने निघालो. रस्त्यात ’खारदुंगला पास’ पार करावा लागतो. लेहलडाखची सहल उत्सुकता, उत्साह व भीती या संमिश्र भावनांनी सुरु होते. वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता.जसे जसे वर जात जातो तसा हवेतला ऑक्सिजन कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत राहतो. खारदुंगला टॉपला पोचलो तेथे अधिक वेळ न दवडता पटकन दोन फोटो काढून आम्ही पलीकडल्या बाजूस उतरायला सुरुवात केली. नुब्रा आणि श्योक खोर्‍यांना लेहशी जोडणारा हा संपूर्ण रस्ता जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनकडे जाणारा असल्याने कायम कडेकोट बंदोबस्तात असतो. लष्कराचे अस्तित्त्व पावलोपावली जाणवते. तेवढीच मेहनत रस्ता कायम सुरू ठेवणासाठी घेतली जाते. वळणावळणाचे रस्ते असले तरी खड्डे नसलेली डांबरी सडक होती. डावीकडे उत्तुंग पर्वत आणि उजवीकडे अतिशय भयावह खोल, पाताळाचाही ठाव लागणार नाही अशा घळी.त्यांच्या मधून जाणारा अतिशय अरुंद रस्ता.गाडीत जीव मुठीत धरुन बसावे लागते.


देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण खार्दुंगला पासच्या खाली असलेल्या छावण्यांमध्ये सजग असणार्‍या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन आपल्याला थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत ह्याचीही जाणीव होते.


श्योकनदीच्या काठाकाठाने पुढे सरकत होतो तसा श्योक आणि नुब्रा खोर्‍यांचा अद्भुत सौंदर्याचा अजोड ठेवा आमच्यासमोर उलगडत होता.नुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता आणि त्याची सोनेरी आभा आसपासच्या पर्वातांवर उमटली होती. सर्व शिखर सोनेरी दिसत होती. पायथ्याशी रुप्याचं पाणी घेऊन वाहणारी श्योक नदी. नदीकाठावर चिमुकली गावं आणि काही ठिकाणी आर्मीची क्वार्टर्स. या खोर्‍यात उतरल्याबरोबर काहीतरी वेगळ्यात विश्वात आल्याचा भास होत होता. सगळाच सोन्याचा चमचमाट, नदीत रुप्याच लखलखाट. दूरवर धुंद झालेले पर्वत संध्याकाळ जवळ आल्याची नांदी.


डिस्कीट येथे नुब्रा आणि श्योक नद्यांचा संगम होतो. दोन वेगवेगळ्या खोर्‍यांतून आलेल्या नद्या आपापले अस्तित्व विसरुन एकमेकांत लीन होतात. पुढचा पूर्ण रस्ता श्योक नदीच्या काठाने होता. श्योक नदीचे अवाढव्य पात्र बघून असे वाटत होते कि हिला खरोखर शोकांतिका लागली आहे. एवढे मोठे पात्र असून पण नदी पूर्ण कोरडीच आहे. तो नजारा रस्त्यातून पाहत पाहत पुढे हुंडरचा प्रवास सुरु ठेवला.  

 

हुंडर हे गाव (cold desert) थंड वाळवंट, तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता या साठी प्रसिद्ध. पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव. बाजूला शेती.झुळझुळ वाहणारी नदी. उंच उंचीच्या थंड वाळवंटांनी वेढलेले एक आश्चर्यकारक निसर्ग,  वाळूचे ढिगारे व नयनरम्य पर्वत - थोडक्यात, ही नुब्रा व्हॅली आहे. नुब्रा व्हॅलीच्या अद्वितीय हुंडर प्रदेशाच्या सौंदर्याबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, ही एक जादुई भूमी आहे जी शब्दात पकडली जाऊ शकत नाही! विस्तीर्ण वाळूच्या पात्रात प्रवाहाने रांगोळय़ा रेखत जाणारी शायोक नदी, वाळवंटातील वाळूवाळूच्या टेकडय़ा, तिच्यामध्येच हिरवळ, रंगीबेरंगी बोडके डोंगर आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट! सृष्टीतील सर्व वैविध्यं तिथं एकवटलेलं. हुंडरमध्ये वाळूचे ढिगारे आणि श्योक नदीचा विस्तृत विस्तार आहे. सुमारे दहा हजार फूट उंचीवर वसलेले, हंडर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे. नेत्रदीपक परिसराला नयनरम्य पार्श्वभूमी प्रदान करते. नदीच्या किनारी पसरलेलं वाळवंट आणि त्यामागोमाग उत्तुंग पर्वतरांगा व त्यावरील बर्फाच्छादित शिखर अशा निसर्गातील परस्परविरोधी गोष्टी एकाच जागी दिसण्याचा चमत्कार केवळ नुब्रा व्हॅलीतील हुंडर या ठिकाणी अनुभवता येतो. नुब्रा व्हॅलीचं वैशि‍ष्ट्य म्हणजे पाठीवर दोन उंचवटे असणारे उंट इथे बघायला मिळतात. प्राचीन व्यापार मार्गाने प्रवास करणारे व्यापारी हे उंट माल वाहण्यासाठी वापरत असत. या उंटावर बसून वाळवंटात बसून सफर करता येते. वाळवंटातील ही सफर म्ह्णजे एक वेगळाच अनुभव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे. सतत बदलत राहणारे लँडस्केप हि लडाख ची विशेषता.


नुब्रा व्हॅलीतील या रस्त्यावर डिस्कीट ही जगप्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. ही लडाख मधील सर्वात जुनी आणि मोठी मॉनेस्ट्री समजली जाते. चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाहुन दुर दुर पर्यन्त मानवी वसाहतीची कुठलीही खूण दिसत नाही.  मॉनेस्ट्री च्या बिल्डिंग वर १०६ फूट उंचीचा श्योक नदी कडे तोंड करून मुकुट घातलेला जाम्पा (मैत्रेय) बुद्धाचा बसलेला पुतळा आहे.  मॉनेस्ट्री च्या अंगणातून श्योक नदीचा सुंदर देखावा दिसत होता.


मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्‍याचं काळं करणारं रणरणतं ऊन निसर्गाची वेगवेगळी म्हणजे अप्रतिमपासून अक्राळविक्राळ रौद्र रुपं बघून आपण स्तिमित होतोच पण निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही हे प्रकर्षाने जाणवतं. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्‍या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. हेच ते लडाखी स्वप्न. लेहलडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न साकार झाले. 


लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन तृप्त होत नाही. निसर्गाने निर्मलेल्या या अनोख्या विश्वाची प्रत्यक्ष भेट घेण हाच खरा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय अनुभव असेल!

No comments:

Post a Comment