केदारनाथ...पवित्रता व सुंदरता
चारधाम यात्रेत आम्ही ’गंगोत्री’ ला ’गंगा’ देवीचे दर्शन घेऊन केदारनाथ या महत्वाच्या तीर्थक्षेत्राकडे निघालो. प्रवास कधी उंच पर्वतांच्या कड्याहून तर कधी पायथ्याच्या नदीच्या बाजुने सुरु असतो. सोनप्रयाग पर्यत ४०० किमीचा व नऊ तासाचा प्रवास होणार होता. चार धाम यात्रा ही अत्यंत सुलभ परंतु सर्वात कठीण प्रवासांपैकी एक आहे. हिमालयातील रस्त्यांवर शारीरिक आणि मानसिक त्रास अनुभवण्यासाठी तयारी असली पाहिजे.
सोनप्रयाग हे केदारनाथ घामकडे जाणारे धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे. तेथे आम्ही रात्री मुक्कामासाठी पोहचलो.सकाळी लवकर उठून गौरीकुंड च्या दिशेने निघालो. गौरीकुंड हे केदारनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या १६ किलोमीटरच्या पायी प्रवासाचा सुरुवातीचे ठिकाण आहे.गौरीकुंडमध्ये देवी पार्वती देवीला समर्पित मंदिर आहे, गौरी देवी मंदिर. ही ती जागा आहे जिथे पार्वती देवीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी ध्यान केले होते.
पत्नी बरोबर असल्याने ट्रेक न करता दोन घोड्यांवर दोघांनी बसून गौरीकुंडापासून सकाळी लवकरच प्रवास सुरु केला. मी पहिल्यांदाच घोड्यावर बसलो होतो. फार विचित्र व वाईट वाटत होते. पायी चालणारे यात्रेकरू व समोरुन येणारे घोडे यातून मार्गक्रमण करीत चढाई सुरु होती. एकाबाजूने खोल दरी व दुस-या बाजुला पर्वताचा कडा अशा अरुंद वाटेवरून प्रवास सुरु असतो. वाट चांगली बांधून घेतलेली आहे.दरीच्या बाजुला रेलींग आहे.घोड्यांची घाण उचलायला साफसपाई करणारे कर्मचारी असतात.कोसळणारे धबधबे व हिरवाई असे सुंदर निसर्ग पाहत पाहत प्रवास सुरु होता. काही अंतरानंतर पठारावर आलो. ग्लेशियरच्या बाजुने जाताना थंडावा जाणवत होता. चढ उतारातून वाटचाल सुरु होती. मंदिर कधी दिसते याची उत्सुकता वाढली होती. घोडे थांबले,तेथे आम्ही घोड्यावरून उतरलो. घोड्याचे आभार मानून मंदिराच्या दिशेने पायी निघालो. मंदिर दिसताच नतमस्तक झालो. केदारनाथांचे दर्शनाने समाधान मिळाले व प्रसन्न वाटले. मंदिराच्या बाजुचा निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे. देव व निसर्ग या दोन्ही गोष्टीमुळे एकाच ठिकाणी असल्याने तेथून पाय निघत नाहीत. केदारनाथ येथील सुंदरता अवर्णनीय आहे.
केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन भव्य शिव मंदिर असून रुद्र हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.अतिशय निसर्गरम्यपणे ठिकाण आहे.त्याच्या सभोवताल उंच, बर्फाच्छादित पर्वत आहेत ते उन्हाळ्यात हिरव्या कुरणात व्यापतात. मंदिराच्या पाठीमागे उंच केदारडोम शिखर आहे. केदारनाथ मंदिर परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.त्यावेळी मंदिर बंद असते.
भगवान केदारनाथ मंदिर उंच बर्फाळ पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे.पहाटे या बर्फाळ पर्वतांवर सुर्याची पहिली किरण पडतात.त्यावेळी पर्वतांची शिखरं सोनेरी रंगानी उजळून निघतात. तेव्हा भगवान केदारनाथानी सोनेरी मुकुट परिधान केलेला दिसतो. दिवसभर पर्वतांवर सुर्यकिरण पडतात तेव्हा शिखरं चांदीसारखी चमकतात. भगवान केदारनाथ पहाटे सोनेरी व नंतर दिवसभर चांदीचा मुकुट परिधान करुन असतात. संपूर्ण केदारनाथ धामचे वातावरण भक्तिमय असते.
हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर सहा फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर असलार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड स्लॅब किंवा सिमेंटशिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिराच्या बाहेर पाहरेक-याच्या रूपात नंदीची स्थापना केलेली आहे.
२०१३ मध्ये झालेल्या महाभीषण प्रलयालामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात खुप बदल झाला आहे. मंदिरामागे मोठी शिळा येऊन थांबली आहे, असे म्हणतात की या ’भिमशिळे’ मुळे मंदिराचे नुकसान झाले नाही.
या ठिकाणी वातावरण कधीही बदलत असते परंतु त्यातल्या त्यात एप्रिल, मे महिन्यापासून वातावरण खुप चांगले असते ते नोव्हेंबर पर्यंत. म्हणुनच यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम मंदिराची दरवाजे हिंदू पंचांगनुसार अक्षय तृतीया या दिवशी उघडतात आणि दिवाळी पासून बंद होतात.
भारतातील सर्वात पवित्र व प्रसिद्ध मंदिरापैकी एक केदारनाथ मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही दरवर्षी लाखो श्रद्धाळू केदारनाथ चरणी लीन होण्यासाठी या मंदिराला भेट देतात. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराला जीवनात एकदा तरी भेट द्यावी.
No comments:
Post a Comment