Friday, December 31, 2021

निसर्गाचे विलोभनीय दर्शन

 





मायावी सौंदर्याची दुर्मिळ अनुभूती 


बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे,निळेशार पाणी, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान.सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं विलोभनीय दर्शन! अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे.तसेच अंदमान म्हटलं की, आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!


अंदमानच्या पोर्ट ब्लेअर,नील,हॅवलॉक व रॉस या बेटावरील रमणीय समुद्रकिनारे पाहून झाल्यावर आम्ही  ’बारातांग’ च्या दिशेने निघालो. अगदी मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्रातून जातानाचा आनंद हा अगदी अवर्णनीय मनाला आल्हाद देणारा होता. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जहाजांनी गेल्यानंतर जिपने पुढचा प्रवास सुरू झाला रस्त्यांनी जाताना ’जारवा’ आदिवासी दिसले ते बरेचदा आपल्या गाडीजवळ येऊन आपल्या जवळचे कॅमेरे, खाण्याच्या वस्तू हिसकतात म्हणून तिथे गाडी न थांबवता जोरात नेली जाते. आदिवासी लोकांना छायाचित्रण, संवाद किंवा खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. ’जारवा’ आदिवासी राखीव क्षेत्राच्या मर्यादित क्षेत्रातून जाण्य़ासाठी काही ठराविक वेळा आहेत ज्या दरम्यान काफिल्याच्या सुरवातीला आणि शेवटी पोलिसांसह वाहनांना काफिल्यात जंगलात सोडले जाते. जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल.परत येताना मड आयलड पाहिले. येथे जिवंत ज्वालामुखी पाहता आला.


पोर्ट ब्लेअर परत न जाता आम्ही दिगलीपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. या प्रवासामध्ये एकदा जहाजातून गाडी टाकून दुस-या बेटावर गेलो. लांबचा प्रवास असल्याने दिगलीपूर येथे पोहचण्यास रात्र झाली. दिगलीपूर हे उत्तर अंदमान बेटावरचे छोटे शहर आहे. दुस-या दिवशी दिगलीपूरच्या ’एरियल बे’ जेट्टीवरून बोटीने ’रॉस आणि स्मिथ’ नावाच्या शांत जुळ्या बेटांवर जाण्यास निघालो. अथांग  निळ्याशार समुद्रातून छोट्या फायबर मोटरबोटीने ६ ते १० जणांना प्रवास करावा लागतो. ही दोन्ही बेट दिग्लिपूरपासून ८ किमी अंतरावर आहेत.तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. हा २५ मिनिटांचा बोटीचा प्रवास सुखद अनुभव आहे. या बोटीच्या प्रवासाला वनविभागाचा परवाना आवश्यक आहे.


उत्तर अंदमान मधली स्मिथची भव्य जुळी सुंदर बेटे आहेत. कोणाच्या फारशा परिचयाची नसलेली आणि घनदाट झाडींनी वेढलेली ही दोन बेटे!! पन्नास मीटर-लांब वाळूच्या पट्टीने जोडलेली आहेत. ही रेशमी पांढरी वाळूची पट्टी समुद्राच्या आत उंच भरतीच्या वेळी खाली येते आणि कमी भरतीच्या वेळी पुन्हा वर येते. समुद्रकिनाऱ्यावर कमी भरतीच्या वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालता येते. एक आश्चर्य पाहण्यास मिळते. एक किनारा निळाशार तर दुस-या किना-याला हिरवी झाक दिसते. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. ही अप्रतिम व्हर्जिन किनारे पाहताना आपण चित्र असल्याचा भास होतो.


अंदमान बेटांमधील एक लपलेले नंदनवन जेथे पर्यटकांचा एक नगण्य भाग आहे. त्यांना सुंदर म्हणणे हे कमी लेखणे आहे. या बेटांना भेट देणे म्हणजे 'जगाबाहेरचा' अनुभव आहे. बेटांच्या जोडीमध्ये अप्रतिम विस्तीर्ण व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला उथळ पोहण्याचे क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम डाईव्ह आणि स्नॉर्कलिंग साइट्स आहेत. दोन्ही किनारे सोयीयुक्त असून स्वच्छ ठेवण्यात आले आहेत. दोन्ही बेटांच्या किना-यांवर पोहण्याचा आंनद लुटता आला.


अंदमानमधल्या या जुळ्या बेटांवरून पाय निघत नाहीत पण या सुंदर बेटांवर राहण्याची परवानगी नसल्याने ’दिगलीपूर’ परतावे लागते. या बेटांवर जायाचे असल्यास अंदमान सहलीत तीन दिवस व बराच खर्च वाढतो. यासाठी पर्यटक या बेटांवर जात नाहीत. पण या जुळ्या बेटांना भेट न दिल्यास ’अंदमान सफर’ पूर्ण होणार नाही.





No comments:

Post a Comment