निसर्गसंपन्न तांबळडेग
मित्राने, त्याच्या गावाला ’विठ्ठल रखुमाई’ चा सप्ताह असल्याने येतोस काय? अशी विचारणा केली. मी कोकणात जाण्यास कधीच नाही म्हणत नसल्याने लगेच तयारी करुन निघालो. कोकणातील ’देवगड’ जवळील ’मिठबांव’ गावाच्या बाजुला असलेल्या ’तांबळडेग’ या गावी पोहचलो.तांबळडेग गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तांबलडेगच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला खाडी असल्याने समुद्र व खाडीच्या मिलापाने सुंदर सौंदर्य प्राप्त झाले आहे. तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. गावात जागोजागी आमराई व नारळाच्या बागातून लपलेली कौलारु घरं दिसत होती.घराला लागून असलेल्या वाडीत कामे करणारी माणसं दिसत होती.
सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. तांबळडेग या गावाला प्रशस्त आणि स्वच्छ असा सुमारे ४ कि.मी. लाबींचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन सोनेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मिती केली असावी. तांबळडेग चा समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असल्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो.
समुद्र किनारी जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. निरनिराळ्या असंख्य पक्षांचा विहार सुरु असतो. समुद्रात मच्छिमारी नौका लांबवर दिसतात.अशा सुंदर समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आंनद लुटता येतो.या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीत करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा सुरक्षित समजला जातो. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.गावात मासेमारी करुन आणलेली मासळी देवगड बाजारात जाते.तेव्हा गावाच्या पुर्वेला असलेल्या खाडीचा मासेमारी करीता चांगला उपयोग होतो.
समुद्र किना-याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता ’गजबा’ देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. माता गजबादेवी मंदिरापासून समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नसते.
देवगड तालुक्यातील समुद्रकासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तांबळडेग. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची या प्रजातीच्या कासवांसाठी उपयुक्त आहे.ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडतात.
तांबळडेग नगरीत सात दिवस विठू माऊली प्रगट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.संपूर्ण गाव भक्तीमय झालेला असतो.मुंबईहून
बरीच मंडळी या सप्ताहाला आवर्जून येतात. नेत्रदीपक श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती, कलाकुसर असलेले मंदिर, आकर्षक विद्युत रोषणाई, भजन असा सोहळा पहायला मिळतो. रात्री दिंडीच्या कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळी जमतात.
तांबळडेग समुद्रकिनारी चांदण्या रात्री फिरण्यास वेगळाच आंनद मिळतो. समुद्राची गाज ऐकत थंड हवेचा गारवा झेलत वाळूच्या किनारी फिरण्याचा अनुभव आंनद देतो. वेगवेगळी ताजी मच्छी खाण्याचा आंनद घेता येतो.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना याची फारशी माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या गावी आवर्जून येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चित भेट द्यावी.
No comments:
Post a Comment