Friday, March 8, 2013

कोहोज किल्ला



मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला.









महाराष्ट्रात घडवण्यासाठी किती लढले किती धारातिर्थी पडले, कितींनी आपले प्राण गमावले याला गणती नाही. अशा या महाराष्ट्राचा इतिहास आजही काही गड कोटांमध्ये दडलेला आहे. असे अनेक गड किल्ले आपल्यासारख्या भटक्यांची वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे इतिहासाला कित्येक मावळे, कित्येक गुप्तहेर माहीत नाहीत, त्याचप्रमाणे कित्येक किल्ल्यांबद्दलचा इतिहास सांगता येत नाही. त्यापैकीच एक किल्ला आहे ठाणे जिल्ल्ह्यातील कोहोज नावाचा गड होय.











मुबंई व ठाण्याहून अकरा जण, दोधे कल्याण हून तर चौघे भांयधर हून वाड्याला भेटलो तेथून नाणे गांवात पोहचलो.














समुदसपाटीपासून १९०० फूट उंच उंचावर हा किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी वाडा तालुक्याहून थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावापर्यंत एसटीनं जाता येतं. गडावर दक्षिणोत्तर प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे, तर गडाचे अनेक बुरूज आणि तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत. 














गडावर कुसुमेश्वराचं मंदिर आहे. मंदिराजवळ दोन पाण्याच्या टाक्या आहेत. थोडं पुढे गेल्यावर एक गुहेसारखं तळघर आहे. या गुहेत पाकोळ्यांची वस्ती असल्यानं आत शिरताच उग्र वास आणि पंखांचा फडफडाट ऐकायला येतो. 













पण गडावर चढताना आजूबाजूचा निसर्ग आपलं मन मोहून टाकतो. गडाच्या उत्तरेककडून देहरजा तर दक्षिणेकडून पिंजाळ या तानसा नदीच्या उपनद्या असल्यानं तिथला परिसर हिरवागार झालेला आहे.









गडावर जाण्यासाठी असलेली वाट बरीच वेडीवाकडी आहे. वाटेत अनेक पर्णझाडी वृक्षांचं जंगल आहे. मुंबईपासून जवळ असल्यानं अनेक गिरीमित्र सुट्टीत इथं येताना दिसतात. गडावर पाण्याची चांगली सोय आहे.










 त्यामुळे अनेक गावकऱ्यांची इथं सतत ये-जा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. गावक-यांकडून समजलं की या कोहोज गडावर पूर्वी अनेक तोफा होत्या. पण काही उचापतखोर लोकांनी त्या गडावरून खाली ढकलल्या.












गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावामध्ये समोरच्या चौकात चौथ-यावर ठेवलेली तोफ आपलं स्वागत करते.








गड माथ्यावर गेल्यावर कुसुमेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूने ढाले किल्ल्यावर जाता येतं. वाटेतून वर जाताना मारूतीचं मंदिर दिसतं आणि खडकात खोदलेली पाण्याची कुंडं आपलं लक्ष वेधून घेतात.










काही पर्यटकांनी इथल्या पुरातन वास्तुंवर स्वत:ची नावं लिहून त्याचं सौंदर्य नष्ट केलं आहे. गडाच्या सर्वात वरच्या ठाण्यात एक अष्म रूपातील मानवी शिळा आपलं लक्ष वेधून घेते. त्यामुळे गडावरून कोणी पहारेकरी टेहळणी करत असल्याचा भास होतो.









गडाच्या वाटेवर असताना मध्येच  इस्काँनचे भक्तगण भेटले. विचारपूस केल्यावर त्याच्यासह त्याच्या भक्तीगीतावरच्या नाचात आम्ही सहभागी झालो.








गडावर पाण्याची उत्तम सोय असल्यानं इथं तंबू ठोकून राहता येतं. गडावरील वस्तूंचे भग्नावशेष पाहून त्याचं भूतकाळातील वैभव आपल्या लक्षात येतं.







 भूतकाळात जिवंत असलेल्या या वास्तु आज वर्तमानातही आपल्यासारख्या भटक्यांची वाट पाहत आहेत, असं जाणवत राहतं मग चला तर...कोहोज गडावर!

No comments:

Post a Comment