Monday, January 13, 2014

तोरणा ते राजगड ( राजगड किल्ला ) - भाग 3


                       शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड
अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड ! राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.


या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.

   राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. 
             आज राजगडावरचा बालेकिल्ला व सुवेळा माची पाहून आम्ही खाली उतरण्यास सुरुवात करणार,अशाने ट्रेक
संपणार म्हणून वाईट वाटत होते. माझा आवडता गड असल्याने कधीही या गडावर जाण्यास आनंद होतो.वेगवेगळ्या मोसमाप्रमाणे वेगवेगळे रुप पाहण्यास मिळते.हा गड पाहण्यासारखा आहे.गडावर वेगवेगळ्या वाटेने जाता येते.पण  पुणे-वाजेघर बसने वाजेघरला उतरुन वाजेघर-पाली मार्गाने पाली दरवाज्याने गडावर जाणे सोपे आहे.काल आम्ही  संजिवनी माचीकडून अळु दरवाजाने चढलो होतो. 


थंडी कमी होती.सँक देवळात ठेवून आम्ही सुर्योदय पाहण्यास बालेकिल्ल्याकडे निघालो.दमछाक करणारी उभी चढण चढलो.  गडमाथ्यावरील बोच-या ने  आमचे स्वागत केले.
मावळ खोर्‍यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड.  राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. स्वराज्याची ती राजधानी आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, त्या राजधानीत जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं , जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्वतहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो .


                                                                     
                                                          बालेकिल्ल्याच ते रांगड रूप

राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.  


गुंजवण्यातून गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि भूतोंडेतून अळू दरवाजाने राजगडात शिरता येते. यातली पाली दरवाजाची वाट तेवढी सामान्यांसाठी अन्य वाटा डोंगरदऱ्यात संसार मांडणाऱ्यांच्या साठी.
                                                                         संजीवनी

    चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. चिलखती म्हणजे दुहेरी तटबंदी. शत्रूसैन्याने जीवाचं रान करून बाहेरील तटबंदी पाडली की त्याला आतली तितकीच भक्कम दुसरी तटबंदी दिसते. अवसान गळाल्यासारखी अवस्था होते त्याची. शत्रू पुन्हा तयारी करेपर्यंत मावळे बाहेरील तटबंदी पुन्हा बांधून घ्यायचे. 


 राजगडावर जाऊन आल्यावर प्रत्येक जण शिवप्रेमी आणि दुर्गाप्रेमी होतो हे नक्कीच आहे. राजगडाचे गडपण अजून टिकून आहे , त्यामुळे गडावर जायला चांगले वाटते. 

    संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात.सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते.


                                                                      पद्मावती देवी                                                        पद्मावती  माची


 पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची- दारूगोळय़ाची कोठारे, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते.
                                                                             सुवेळा  माची                     राजगड  अन  तोरणागड  (प्रचंडगड)………. शिवशाहीतली दोन बलदंड-प्रचंड पुराणपुरुष………
एकानं महाराजांनी उधळलेल्या "स्वराज्याच्या" भंडाऱ्यानं स्वतःचं मळवट पहिल्यांदा भरून घेण्याचा मान 
मिळवला……. पोटात लपवलेला खजिना स्वराज्यासाठी राजांच्या पायी रिता केला…… तर दुसऱ्याने पंचवीस वर्ष राजांना निर्धारानं पोलादी पंखाखाली घेतलं…… स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून मरातब मिळवला…….या दोन पुराणपुरुषांचं एकमेकांशी काहीतरी नातं नक्की असणार…… सुवेळा-झुंझार,बुधला-संजीवनी ह्याची नाळ नक्की एकचं असणार……. मेंगाई-पद्मावती नक्कीच बहिणी-बहिणी असणार…… त्याशिवाय काय गेली शेकडो वर्ष झाली सूर्योदयाला राजगडाची सावली प्रचंडगडाच्या भेटीला दौड मारते तर सूर्यास्तावेळी  तोरणागडाची सावली राजगडाच्या गळाभेटीला येते.

गडावरुन पाहिलेला सुर्यास्त पद्मावती तलाव


बालेकिल्ल्याचा महादरवाजा

                                          दरवाजाचे हे शिल्प म्हणजे उभ्या कातळातील एक सुरेख कोंदण! 


                                             बालेकिल्ल्याचा महादरवाल्यातून सुवेळा माचीसुर्योदयाने गडाचा परिसर सोनेरी केला.आमच्या कँमे-याने क्लिक क्लिक सुरु केले. ते द्दश्य नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. बालेकिल्यावर इतिहासाच्या खुपश्या खुणा अस्तिवात आहेत.


सुवेळाचा लयबद्ध आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचे पात्र, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, धुक्यात उलगडत जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या रांगा आणि या साऱ्या चित्रावर आपली पावले उमटवत निघालेली पूर्वा!


                                              बालेकिल्ल्याहून दिसणारी  संजीवनी माची


बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते                            स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो उत्कर्ष, सारे, सारे या गडाने पाहिले.
                                                                       सुवेळा  माची


 या गडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळासारख्या तीन लढाऊ माच्या मिळाल्या. जणू स्वराज्यासाठी लढणाऱ्या या महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि कालीच!  स्वराज्याच्या राजधानीचे हे जणू बलदंड बाहू.मुघलांच्या आक्रमणावेळी या माच्यांनीच अगोदर हा गड लढवला.
 सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी 'नेढे' म्हणतात.
                                                                म्यान दरवाजा

                                                                       राजदरवाजा

 काल गडावर पोहचल्यानतंर वाटेवर बाया ताल विकायला बसलेल्या दिसतात. आम्हीही ताक घेतले.ताक पिताना गप्पा मारताना त्या ताकवाली बाईने आमच्या पुढच्या कार्यक्रामाची माहीती घेत आम्हाला उद्याचे जेवण गडावरून खाली उतरल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवात देण्य़ाचे  प्रस्ताव मांडला.गडाच्या पायथ्यापासून तिच्या घरापर्यत व घरापासून पूण्यापर्यत जाण्यास गाडीची (ट्रकस्)करून देण्याचाही प्रस्ताव मांडला.आमच्यातल्या काहीनी तिचे फोन नंबर घेऊन उद्या कळवतो असे सांगून आम्ही पुढे निघालो.

रात्री आम्ही सर्वानी  ताकवालीने दिलेल्या प्रस्तावाचा विचार केला व सोयीचे ठरल्याने उद्या तिला फोन करून
जेवण करण्यास सांगायचे ठरले. दुस-या दिवशी तिला तसा निरोपही दिला.जेवणाचा प्रश्न सुटलेला असल्याने व पायथ्याशी गाडीची सोय असल्याने सगळे निर्दास्त झाले होते. बालेकिल्ला व सुवेळा माची पाहून आम्ही पद्मावती वरील देवळातून सँक उचलल्या व धोषणा देत खाली उतरण्यास सुरुवात केली.फोटो काढीत काढित पाय-याने पाली दरवाज्याने पटापटा खाली उतरत होतो.गडावर जाणा-यांची गर्दी होती.दम टाकीत मंडळी चढत होती.

   आम्ही लवकर पायथ्याला पोहचलो.ती ताकवाली व तिचा नवरा आमची वाट पाहत होता.आम्हाला पाणी देऊन आमचे स्वागत केले. आम्ही गाडीची चौकशी केली. गाडीला यायला वेळ लागेल .मागच्या  गावात आलेली आहे. गाडी  येईपर्यत  आपण  आमच्या    घरी  जाऊया    तेथे     तुम्ही जेवा तोपर्यत गाडी पोहचेले.असे तिच्या
नव-याने आम्हाला आश्वासन दिले.दोन दिवस घरचे जेवण न मिळाल्याने वेगळीच भूक लागली होती.आम्ही तिच्या घरी जेवण्यास निघालो.

पाली गांवातून तीचे घर तीन किलोमीटर दूर होते.त्याचवेळी मला तिचा नवरा आम्हाला फसवित असल्याचे कळले. रस्त्यात मी त्याला गाडीबद्द्ल सारखे विचारत होतो. मला काळजी लागलेली जर गाडी आली नाहीतर आपल्याला हे तीन किलोमीटर पुन्हा चालत पाली गांवात यावे लागणार आणि नतंर गाडीची सोय पाहावी लागणार.तो गाडी येण्याचे आस्वासन देत होता.पण मला  आपण फसल्याचे कळले होते.यानी आपल्याला गाडीचे  आमिश दाखवून जेवणाचे गि-हाईक कापले होते.धापा टाकीत स्वत:लाच  शिव्या देत तिच्या घरी पोहचलो.कसेतरी जेवलो.जेवणाकडे लक्ष नव्हते.माझे कान गाडीच्या आवाजाकडे होते.जेवण झाले.ठरल्याप्रमाणे जेवणाचे पैसे दिले.तरीही गाडी आली नव्हती.तिचा नवरा फोन करीत होता.मी  त्याच्यावर भडकलो होतो.तू आम्हाला फसविले याबद्द्ल आम्हाला वाईट वाटले. लांबलाबून लोक या गडावर येतात त्यांच्याकडे गाड्या नसतात . सार्वजनिक वाहनानी प्रवास करणा-या मंडळीना असे आड रस्त्याला आणून गाडीचे  आमिश दाखवून जेवणाचे पैसे लाटून फसवू नका. असे सांगून मी मित्रासाह तेथून दहा किलोमीटर चालत आलो.तेथून वाहने बदलत पुण्याला साडेसहा पोहचलो.मुंबईला घरी पोहचण्यास रात्रीचे
बारा वाजले.

आपल्या ट्रेकर मित्रानी आमच्या सारखे फसू नये.यासाठी ही माहीती दिली आहे.


असे त्या ताकवालीचे जेवण महागात पडले.ट्रेक मस्त झाला .हरवलेला कँमेरा मिळाला.पण आपण फसलो गेलो याची  मात्र खंत लागून  राहीली.                                                            नवख्यांसाठी खास सोय 

No comments:

Post a Comment