Friday, May 29, 2015

सिंधुदुर्ग किल्ला


हल्लीच कोकण दौरा केला त्या दौ-यात सिंधुदुर्ग या जलदुर्गात जाण्याची संधी मिळाली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतकेउभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.







किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.




     छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय.
चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.





सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे.येथे जाण्य़ास मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात . किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते. 







सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे. 








तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे.  प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.











तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.






वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. 







बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत. 
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.   


                                 सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या डागडुजीचे काम सुरु होते.






 भवानी मंदिर





सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.



हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.  

No comments:

Post a Comment