Wednesday, August 16, 2017

सह्याद्रीतले एक माणिक




१७.८.२०१७  रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>        सह्याद्रीतले एक माणिक





















                           
 सह्याद्रीतले एक "माणिक"



पावसाळा सुरू होताच कणखर काळ्या मातीची आणि ओबडधोबड दगडांची ही भूमी वर्षाऋतूत हिरवाईने नटून जाते आणि तिच्या कडेकपारीतले झरे जिवंत होऊन धबाधबा कोसळू लागतात.गडांच्या तटबंदीना हिरवा साज येतो.उन्हाळ्यात ट्रेकना सुट्टी असल्याने पावसाळा सुरु झाल्याबरोबर ट्रेकर गडांच्या दिशेने घाव घेतात. 

 पावसाळ्य़ातील पहिला ट्रेक गर्दी कमी असलेल्या माणिक गडावर जाण्याचे ठरवले.पातळगंगा एम. आय. डी. सी. च्या जवळ असल्याने माणिकगडाच्या पायथ्याच्या 'वाशिवली' गावापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.पनवेल येथुन 'वाशिवली' एसटी पकडून  'वडगांव' फाट्यावर उतरुन चढाई सुरु करता येते..

















         माणिकगडावर प्रथमच जात असल्यास गावातील एखादा वाटाडय़ा बरोबर घेणे चांगले.आदिवासी पाड्यातून वाटाड्या घेता येतो. पाड्यातून गडाच्या दिशेने चालत निघाल्यावर दहा मिनिटात आपण जंगलात शिरतो व लगेचच खडय़ा चढणीला सुरूवात होते. इथुन डोंगराच्या पठारावर जाण्यास एक तास पुरतो. लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या मार्गावरून जाताना डावीकडे एक मारुतीची मूर्ती असलेला चौथरा आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत जंगलातून जाणारी ही पायवाट परिसरातील लोकांच्या वावरामुळे बऱ्यापैकी मळलेली आहे. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या गावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. इथपर्यंतचा हा प्रवास निर्धोक असून या संपूर्ण पायपिटीमध्ये माणिकगडाचे हिरवेगार जंगल आपली सोबत करते.हिरवळीमुळे या पहाडाचे निखळ सौंदर्य न्याहाळण्याची खरी मजा आताच आहे.



















 माणिकगडाच्या मुख्य पहाडावर दोन सुळके आहेत. माणिकगड व त्याच्या शेजारचा डोंगर यांच्या खिंडीतुन ही वाट किल्ल्यावर पोहोचते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून वर चढून गेल्यावर किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. इथुन उध्वस्त तटबंदीतुन आपलागडाच्या खालील भागात प्रवेश होतो. येथे गडाचा दरवाजा असावा कारण किल्ल्याच्या या बाजूच्या कडय़ावर दोन भग्नावस्थेतील बुरूज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. येथे सपाटीवर पाण्याच एक टाक आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. पायथ्यापासून किल्ल्यावर इथपर्यंत येण्यास दोन ते अडिच तास लागतात.संपूर्ण चढाईत पावसाने आम्हाला चांगलेच झोडपत गडावर आमचे स्वागत केले.सोसाट्याच्या वा-याने उभे राहता येते नव्हते.















 किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून सरळ चालत गेल्यास आपण उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पुर्वी येथून खाली उतरण्यासाठी वाट असावी असे दिसते. गडाचा दरवाजा पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या उध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी असुन त्यात एक शेंदुर फ़ासलेली मुर्ती ठेवलेली आहे. गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या प्रवेशद्वाराची चौकट अद्याप तग धरून आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येतो. हा गडाचा बालेकिल्ला असावा व तो तटाबुरुजांनी सुरक्षित केला असावा. येथे उजव्या बाजूस वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाक व त्यापुढे छोटे टाके आहे. ते पाहून पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो.तेथून आपल्यालागडावर येणारी वाट दिसते.बाजुचा परिसर पाहता येतो. 





  पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाक असुन त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथेच एक शेंदुर फ़ासलेली भग्न मुर्त्ती आहे. त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत. त्यातील छोट्या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदुर फ़ासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाक आहे. टाकी पाहून पुढे गेल्यावर आपण पूर्व टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यानी आपल्याला गडावर येता येते. बुरुजावरुन तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते.















 पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरच्या बुरुजापाशी आपण पोहोचतो.या बुरुजाच्या पुढे पायऱ्या आहेत. याठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायाला सुरवात केली त्या जागेपाशी आपण येऊन पोहचतो.माथेरानचे मोठे आडवे पठार त्याच्या बरोबर समोर तेवढेच मोठे आणि सुंदर असे प्रबळगडाचे पठार,कर्नाळा व इर्शाळगडाचा सुळका असे सारे दिसत होते.
















पण या किल्ल्यांच्या यादीमधला हा किल्ला मात्र आजही उपेक्षेचे चटके सोसत उभा आहे. कर्नाळय़ावरून पाहिल्यास घुमटासारख्या भव्य आकाराचा सहज लक्ष वेधणारा हा किल्ला म्हणजेमाणिकगड. रायगड जिल्ह्य़ातील आडवाटेवरचा पण अतिशय देखणा दुर्ग! या किल्ल्याचा उपयोग आजूबाजूच्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी केला जात असे. 



















माणिकगडाचा माथा आटोपशीर असल्याने साधारणपणे तासाभरात किल्ला बघून होतो.
गड पाहून झाल्यावर पाऊस कमी झाल्याने पटकन बरोबर आणलेली शिदोरी खाऊन परतीच्या लागलि.माणिकगडाच्या माथ्यावरून कर्नाळा, ईर्शाळगड, माथेरान, प्रबळ-कलावंतीणगड, सांकशी या किल्ल्यांचे दर्शन घडते.

खोपोली, पनवेल परिसरातील माणिकगड हा एका दिवसाच्या भटकंतीसाठी चांगला पर्याय. कमी श्रमाची, निसर्ग सहवास देणारी ही दुर्गभ्रमंती लक्षात राहणारी ठरते.

No comments:

Post a Comment