१४.०९.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> सागरगड
सागरी किनारपट्टीचे रक्षणकर्ता , सागरगड
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून अवघ्या सात किलो मीटर अंतरावर पोयनाड गावानजीक सागरगड आहे.अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला.शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती.या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे.
सागरगडला जाण्यासाठी प्रथम अलिबागची एसटी पकडायची. तर अलिबागच्या अलीकडेच पाच किमी अंतरावर खंडाळे या गावात उतरुन चालण्यास सुरुवात करायची.डांबरी सडक संपून उजव्या हाताला दगडाचा कच्चा रस्ता निघतो तो थेट गड पायथ्याशी जातो. पायथ्यालाच वर चढण्यास दगडाच्या पाय-या आहेत.अर्ध्यावर गेल्यावर एका धबधब्याचे विलोभनीय दर्शन होते.
गडफेरी पूर्ण करुन खाली उतरताना या धबधब्याची मजा घेता येते.पण कातळावर शेवाळ असल्याने निसरडे आहे. धबधब्याकडे जाण्याचा रस्ता आणि गडाकडे जाण्याचा रस्ता वेगवेगळा असल्या कारणे आम्ही फक्त धबधब्याचे दूरूनच दर्शन घेऊन पुढे सिद्धेश्वर आश्रमाच्या दिशेने निघालो. तिथून थोड्याच अंतरावर सिद्धेश्वर मंदिर व आश्रम आहे.
आश्रमपर्यंतची वाट तशी सोपी होती, दगडांवर खुणा असल्याने चुकण्याचा प्रश्नच नसतो.तासभरात आम्ही सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचतो.मंदिराजवळ आपल्या पूर्वजांची म्हणजे माकडांची टोळी आपल्या स्वागतासाठी हजर असते.दर्शन घेऊन मंदिरासमोरच्या वाटेने गडाच्या दिशेला निघावे लागते. आणखी थोडे पुढे गेल्यावर सागरगड वाडी लागते.गावात सोलार उर्जेवरची वीज लावली आहे.
या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी 'वानरलिंगी' सुळका दृष्टीस येतो. पण घुक्यात हरवलेला होता.थोड्याच वेळात थोडे घुके बाजुला सरले आणि आम्हाला 'वनारटोक' दिसले.
डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. समुदसपाटीपासून साधारण ३५० मीटर उंचावरचा हा गड चांगला प्रशस्त आणि मोक्याचा होता, हे लक्षात येत गडाची तटबंदी बऱ्याच अंशी ढासळलेली आणि खचलेली आहे. तर गड बांधकामासाठी काही ठिकाणी जांभ्याच्या दगडांचा वापर केलेला दिसतो. गडावर फिरण्यासाठी तटबंदीच्या बाजूने जाणा-या मुख्य पायवाटेचा वापर करायचा.
सर्वत्र हिरव्यागार गवताचा गालिच्याच पाहण्यास मिळाला. या गवताच्या गालिच्यावर पावसाच्या पाण्याचे टपोरे थेंब एखाद्या हि-याप्रमाणे चमकत होते. येथे सोबतीला होता भन्नाट गार वारा, ढगांचे पुंजकेच्या पुंजकेच सर्वत्र विहार करताना दिसत होते. वातावरण मात्र ओलसर कुंद होते. सर्वजण या वातावरणात रोमांचित झालेले होते. येथून जरा वर चढून येताच आमचा गड प्रवेश झाला.कारण आमच्या स्वागताला समोरच सागरगडाचा बुलंद बुरूज हजर होता.
बुरुज जीर्ण झालेले आहेत.बुरुज ओलांडल्यावर एका घनदाट जंगलातून जावे तसा फील देणारी एक वाट आली. सगळीकडून झाडी,पायात चिखल आणि अरुंद वा पार केल्यावर आम्ही एका पठारावर पोहोचलो. प्रथमच डाव्या हाताला पत्र्याचं छप्पर असलेले महादेवाचं मंदिर दिसते. इथूनच पुन्हा खाली उतरून उजव्या हाताला पाण्याचं कुंड दिसते.या कुंडाचं विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही गोमुख असलेला पाषाणातून सतत पाणी पडत दिसते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने कुंडात कचरा न टाकता पाणी घ्यावे. हीच वाट पुढे वानरटोक सुळक्यासमोर जाते. वाटेत जुन्या वाड्याचे अवशेष आणि पाणी नसलेला छोटा तलावही दिसतो. तर काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाचीवर मात्र दाट जंगल आहे. तर अनेक वाड्याचे चौथारेच पाहायला मिळतात. पठार मोठे आहे.सागरगडावर निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिक-यांनी इथे वास्तव्यासाठी बंगले बांधले होते.येथुन अलिबागचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्रातील बेटे पाहण्यास मिळतात.पुर्वेला घरमतरची खाडी आहे.कर्नाळा,मानिकगड दिसतात.
वनरटोक नावाचा एक सुंदर कळस दिसतो. हा कळस सागरगडालाच लागून आहे या कळसावर पोहोचणे तसे कठीण आहे . हा गडाचा शेवट म्हणता येईल. पण वनरटोक बघून आलेला क्षीण कुठेच्या कुठे पळून गेला.वानरटोक हा कडा पाहत असताना रायगड जिल्ह्याचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडले.
सागरगडाच्या बांधणीवरून तो निजामशाहीत बांधला गेला असावा .इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरून खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदुर्गचा) समावेश होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
चारही दिशांनी निसर्गाने परिपूर्ण अशा इतिहासाच्या मूक साक्षीदाराला एकदा तरी आवर्जून भेट द्या.
No comments:
Post a Comment