Friday, April 19, 2024
स्वप्नवत सफर
Thursday, February 1, 2024
Thursday, July 28, 2022
चित्त तिचं पिल्लापाशी
मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाचे आंमत्रण दिले. लग्न नागपुरात असून जुन महिन्यात होते. लग्नापूर्वी ताडोबा जंगलात सफारी करण्याची आम्ही मित्रांनी ठरवले. उन्हाचा त्रास होणार आहे. पण या काळात वाघांचे दर्शन होते अशी जाणकारांकडून माहिती मिळाली. लगेच जाण्याचे नक्की करून तिकीटे बुक केली.
नागपुरात पोहचलो.उन्हाचा कडाका होता.पण धाम येत नव्हता. खाण्याच्या पदार्थात तिखटाचा जाळ होता. आम्ही दहीभातावरच दिवस काढले.पहिल्या दिवशी आम्ही नागपूर पासून ८० किलोमीटर असलेल्या ’उर्मेड’ या अभयारण्यात दुपारी ओपन जीपमधून सफारीला सुरुवात केली. सुकलेल्या व जळलेल्या रानातून जीप जात होती. लांबवर हरणे व नीलगाय दिसले. पक्षी उडताना दिसले.काही झाडांना नवी पालवी फुटलेली दिसली.रानडुकरांचा कळप पाहिला.पण वाघ काही दिसला नाही. उन्हाने हैराण झालो होतो. वाघाच्या नियमित येण्याच्या ठिकाणावर जाऊन आलो.जीप गाड्या इकडून तिकडे घावत होत्या. संघ्याकाळ झाल्यावर जंगलातून हताश होऊन बाहेर आलो.सगळे नाराज झाले होते.
दुस-या दिवशी ताडोबाला निघालो.गेटवर जाऊन नोंदणी करुन दुपारच्या उन्हात जंगलात शिरलो. कॅमेरे जवळ घेतले होते. ’उर्मेड’ पेक्षा ’ताडोबा’ चे जंगल मोठे असून दाट आहे. ’ताडोबा’ मघ्ये कोअर व बफर असे दोन झोन आहेत. दोन्ही झोनची वेगवेगळी फी आहे. वाघ कोणत्याही झोन दिसू शकतो. गवे,हरणे व रानडुक्कर दिसते होते. मोर व लांडोर दिसले. पाण्याच्या ठिकाणांवर जाऊन थांबलो. वाघाची वाट पाहिली. फक्त पक्षी पाहिले. उन्हाने करपलो होतो. जीपचे चालक व गाईड फोनवरून कोठे तरी वाघ दिसल्याची माहिती घेत होते. संपूर्ण जंगल पालथे घातले. आजपण वाघचे दर्शन होणार नाही असे वाटले.आम्ही नाराज झालो होतो.
इतक्यात गाईडचा फोन वाजला. त्याच्या भाषेत संभाषण झाले. चालकानी गाडी वेगाने वळवली आणि पळवली. वाघ झाडीतून बाहेर आलेल्याची खबर मिळाली होती. जीप चालकाने जीप योग्य ठिकाणी उभी केली. डावीकडच्या झाडीतून वाघ बाहेर पडला आहे,असे गाईडने आम्हाला सांगितले.आमच्या मागे आणखी दोन जीप उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात जंगलातून ’घरणी’ नावाची वाघीण आमच्या दिशेत येताना दिसली.आम्ही सर्वजण वाघ दिसला म्हणून खूष झालो.वाघीणीने झाडीतून रस्ता काढत आमच्या जीपच्या समोरून रस्ता ओलांडून उजवीकडच्या झाडीत घुसली. आपल्याच तो-यात चालली होती.तिला कसलेच भय वाटत नव्हते पण आम्हाला गाडीत असूनही भिती वाटत होती. जंगलातील मुक्त वाघीणीच्या दर्शनाने आंनद झाला.
ती वाघीण तिच्या पिल्लाला भेटण्यास निघाली आहे,गाईडने आम्हाला सांगितले व चालकानी गाडी सुरु करून निघाला.वाघीणीचा पिल्लू कोठे आहे चालकाला व गाईडला माहित असल्याने त्याच दिशेने जीप घावू लागली. चालकाने एका पाणवठ्यावर जीप आणून बंद केली.ताडबतोब दहा ते पंधरा जीप आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.गाइडने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आम्ही वाघीणीची वाट पाहत होतो.कॅमेरे तयार ठेवले होते.संध्याकाळ होत होती.
लांबवर झाडीत हालचाल दिसली आणि वाघीणीची चाहूल लागली. वाघीण झाडीतून बाहेर येऊन उघड्यावर माळरानावर आली होती. वाघीण जंगलाच्या राणीच्या अविर्भावात ऐटीत चालत येताना दिसली. काय तिचा रुबाब होता. चालण्यात एक लकब होती. आपल्या वनक्षेत्राची ‘सम्राज्ञी’ चालत निघाली होती. आम्ही तिची ती चाल पाहत राहोली व तिचे फोटो काढत होतो. लांबून दिसणारी ती वाघीण आता जवळ जवळ येत होती. अर्धी चिखळाने माखलेली होती. उन्हाला जास्त असल्याने गार पाण्यात खूप वेळ बसून बाहेर पडली होती.
आता ती पाणवठ्याच्या दिशेने निघाली होती. आमच्या समोरून ती पुढे सरकली होती. मध्येच दोन झाडांच्या बुंध्या जवळ रेगांळली व तेथे वास घेऊन पुढे निघाली. आम्ही तिची हालचालीवर नजर ठेवून होतो.पाणवठ्याला वळसा घालताना ती दिसत नव्हती. पाणवठ्याच्या बांधावरून वर आल्यावर पुन्हा दिसू लागली.ती पुढे झाडीच्या दिशेने पुढे जात होती.तीने कसला तरी आवाज केल्यावर त्या झाडीतून तिचा बछडा दुडुदुडु करीत बाहेर आला. दोघेही एकमेकांच्या दिशेने पुढे जात होते.बछडा तिच्याजवळ आला आणि तिच्या पायात गोल फिरू लागला.तिच्या अंगावर उड्या मारू लागला. ती त्याला चाटू लागली. त्या दोघांची ती भेट पाहत राहवीशी वाटत होती.ती भेट पाहून भरून आले.आई व मुलाचे एकमेकावरचे प्रेम तेथे दिसत होते. त्यांना बोलता येत नसले तरीही कृती ते प्रेम व्यक्त करत होते. वाघीणीने बछड्याला खेळ खेळवत व गोंजारत त्याला पाणवठ्याच्या जागेतून बाहेर काढले व दोघे निघाले व झाडीत घुसले. तेथील सर्व प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. आपण काय पाहिले ते खूपच चांगले पाहिले.
ही वाघीण चार ते पाच दिवसांनी या बछड्याला भेटली असल्याचे गाईडने आम्हाला माहिती दिली.हा बछडा त्या झाडीतच बसून तिची वाट पाहत होता. या बछड्याच्या भावडांना तेथील वाघाने मारले असल्याने वाघीणीने या बछड्याला वाघापासून लांब सुरक्षित ठिकाणी लपवले होते. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती. ही गोष्ट कळल्यावर ह्या वाघीणीची व तिच्या बछःड्याची झालेल्या भेटीचे महत्व अधिक वाढले.आम्ही आवाक झालो. त्या बछःड्याशिवाय वाघीणीने एवढे दिवस कसे बाहेर काढले असतील? आणि आई शिवाय बछडा कसा जगला असेल? एकमेकांच्या आठवणीवर हे दोघे कसे जगले असतील का? हे निर्सगातले कोडेच आहे.
पुन्हा जीप चालकांने सर्व जीपच्या गर्दीतून आमची जीप बाहेर काढत वाघाणीच्या मागावर निघाले. एका ठिकाणी जाऊन थांबले.पण यावेळी आमच्या पुढे काही जीप उभ्या राहिल्या होत्या. त्यांना अंदाज होता वाघीण व तिचा बछडा या रस्त्याने येतील.अंधार पडत चालला होता.आम्ही त्या दोघांची वाट पाहत होतो.थोड्यात वेळात ती दोघं आम्हाला लांबून येताना दिसली.बछडा वाघीणीच्या पायात सारखा येत होता. त्या दोघांनी आमच्या समोरुन रस्त्या ओलांडला. जीप गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. बछडा तिच्या पासून थोडा मागे रेंगाळला. दोघांमध्ये थोडे अंतर पडले होते.ती तिच्यात तो-यात चालत होती.एक जीप तिच्या पुढे गेल्यावर तीने त्या जीपवर एक कटाक्ष टाकला.वाघीणीच्या एका नजरेने सर्व धाबरले होते.ती तेथेच थबकली.मागे पाहिले.तिला तिचा बछडा लांबवर दिसला.वाघीणीने त्याच्याकडे पाहिल्या बरोबर बछडा पळतपळत वाघीणी जवळ आला. त्याला पुढे झाडीत घुसवून वाघीण नंतर झाडीत घुसली. आता ती नजरेआड झाली होती. सर्व शांत झाले.
वाघीणीचा वीस ते पंचवीस मिनिटांचा तो प्रवास आम्ही जवळून पाहिला. वाघ दिसला नाही म्ह्णून नाराज झालेले आम्ही भारावून गेलो.त्या दोघांची ती भेट आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आताही ती दोघं नजरेसमोर दिसत आहे. आई व तिच्या मुलाचं नातं निव्वळ वात्सल्याचं असतं.
Friday, December 31, 2021
निसर्गाचे विलोभनीय दर्शन
मायावी सौंदर्याची दुर्मिळ अनुभूती
बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे,निळेशार पाणी, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान.सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं विलोभनीय दर्शन! अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे.तसेच अंदमान म्हटलं की, आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!
अंदमानच्या पोर्ट ब्लेअर,नील,हॅवलॉक व रॉस या बेटावरील रमणीय समुद्रकिनारे पाहून झाल्यावर आम्ही ’बारातांग’ च्या दिशेने निघालो. अगदी मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्रातून जातानाचा आनंद हा अगदी अवर्णनीय मनाला आल्हाद देणारा होता. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जहाजांनी गेल्यानंतर जिपने पुढचा प्रवास सुरू झाला रस्त्यांनी जाताना ’जारवा’ आदिवासी दिसले ते बरेचदा आपल्या गाडीजवळ येऊन आपल्या जवळचे कॅमेरे, खाण्याच्या वस्तू हिसकतात म्हणून तिथे गाडी न थांबवता जोरात नेली जाते. आदिवासी लोकांना छायाचित्रण, संवाद किंवा खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. ’जारवा’ आदिवासी राखीव क्षेत्राच्या मर्यादित क्षेत्रातून जाण्य़ासाठी काही ठराविक वेळा आहेत ज्या दरम्यान काफिल्याच्या सुरवातीला आणि शेवटी पोलिसांसह वाहनांना काफिल्यात जंगलात सोडले जाते. जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल.परत येताना मड आयलड पाहिले. येथे जिवंत ज्वालामुखी पाहता आला.
पोर्ट ब्लेअर परत न जाता आम्ही दिगलीपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. या प्रवासामध्ये एकदा जहाजातून गाडी टाकून दुस-या बेटावर गेलो. लांबचा प्रवास असल्याने दिगलीपूर येथे पोहचण्यास रात्र झाली. दिगलीपूर हे उत्तर अंदमान बेटावरचे छोटे शहर आहे. दुस-या दिवशी दिगलीपूरच्या ’एरियल बे’ जेट्टीवरून बोटीने ’रॉस आणि स्मिथ’ नावाच्या शांत जुळ्या बेटांवर जाण्यास निघालो. अथांग निळ्याशार समुद्रातून छोट्या फायबर मोटरबोटीने ६ ते १० जणांना प्रवास करावा लागतो. ही दोन्ही बेट दिग्लिपूरपासून ८ किमी अंतरावर आहेत.तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. हा २५ मिनिटांचा बोटीचा प्रवास सुखद अनुभव आहे. या बोटीच्या प्रवासाला वनविभागाचा परवाना आवश्यक आहे.
उत्तर अंदमान मधली स्मिथची भव्य जुळी सुंदर बेटे आहेत. कोणाच्या फारशा परिचयाची नसलेली आणि घनदाट झाडींनी वेढलेली ही दोन बेटे!! पन्नास मीटर-लांब वाळूच्या पट्टीने जोडलेली आहेत. ही रेशमी पांढरी वाळूची पट्टी समुद्राच्या आत उंच भरतीच्या वेळी खाली येते आणि कमी भरतीच्या वेळी पुन्हा वर येते. समुद्रकिनाऱ्यावर कमी भरतीच्या वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालता येते. एक आश्चर्य पाहण्यास मिळते. एक किनारा निळाशार तर दुस-या किना-याला हिरवी झाक दिसते. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. ही अप्रतिम व्हर्जिन किनारे पाहताना आपण चित्र असल्याचा भास होतो.
अंदमान बेटांमधील एक लपलेले नंदनवन जेथे पर्यटकांचा एक नगण्य भाग आहे. त्यांना सुंदर म्हणणे हे कमी लेखणे आहे. या बेटांना भेट देणे म्हणजे 'जगाबाहेरचा' अनुभव आहे. बेटांच्या जोडीमध्ये अप्रतिम विस्तीर्ण व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला उथळ पोहण्याचे क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम डाईव्ह आणि स्नॉर्कलिंग साइट्स आहेत. दोन्ही किनारे सोयीयुक्त असून स्वच्छ ठेवण्यात आले आहेत. दोन्ही बेटांच्या किना-यांवर पोहण्याचा आंनद लुटता आला.
अंदमानमधल्या या जुळ्या बेटांवरून पाय निघत नाहीत पण या सुंदर बेटांवर राहण्याची परवानगी नसल्याने ’दिगलीपूर’ परतावे लागते. या बेटांवर जायाचे असल्यास अंदमान सहलीत तीन दिवस व बराच खर्च वाढतो. यासाठी पर्यटक या बेटांवर जात नाहीत. पण या जुळ्या बेटांना भेट न दिल्यास ’अंदमान सफर’ पूर्ण होणार नाही.
Monday, July 19, 2021
सायकलवरून ....’अष्टविनायक यात्रा’
दि.१९.०७.२०२१ रोजी हा लेख ’महाराष्ट्र टाईम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झाला आहे.
’अष्टविनायक यात्रा’..... सायकलने
दोन चाकावर संपुर्ण जग फिरण्याचे स्वप्न सुरुवातीपासुन होते. काही तांत्रीक अडचणी आल्यामुळे मग कमीत कमी आपल्या महाराष्ट्र राज्य सायकलवर जवळुन पाहण्याचे ठरविले. प्रथम घरातुन या सहसाला विरोध होतो. मित्राबरोबर प्रथम मुबंई ते बोर्डी एका दिवसात प्रवास केला. सायकल प्रवास करुन सुरक्षित घरी परतल्यावर आमच्यापेक्षा घरच्याना आनंद व विश्वास पटला. मग नव्या सफारींना जोरात सुरुवात झाली. भिरा-पाली ते मुबंई, मी व मित्र अरविंद जागडे याच्यासोबत दोन दिवसात पुर्ण केली. काही दिवसात आलिबाग-मुरुड(जंजिरा) हि सफर तीन दिवसात पुर्ण केली. मग मित्रांसह शिर्डी - औरंगाबाद सायकल सफार दहा दिवसात पूर्ण केली होती.असा सायकल प्रवास सुरु झाला होता.
आता उत्साह वाढला होता.नव्या दिशा खूणवत होत्या. जानेवारी १९८६ या सालात श्री.अष्टविनायकांच्या दर्शानाला सायकलवर जायचे ठरले होते. मी, अरविंद जागडे (प्रमुख), सुरेंद्र कोचरेकर व सुरेश सतांनम अशी चार जणांची टिम जमली. फक्त अकरा दिवसात सफर पूर्ण करण्याचे पक्के केले. जोरात सराव सुरु केला. खर्च जास्त येणार असल्याने प्रायोजकाच्या शोधात धावपळ सुरु केली.काही विशेष हाती आले नाही. आपणच सर्व खर्च उचलायचे ठरविले. सफारीच्या मार्गाची आखणी व वस्तु गोळा करीत तयारीला लागलो.माहीती व ओळखी जमवल्या. सफरीचा दिवस जवळ येउ लागल्याने धावपळीला वेग आला.सायकलीचे साहीत्य, औषध, कपडे,पैसे ई.वस्तु पाठीवर टाकुन व काही वस्तु सायकलवर अडकवून घरच्यांचा आशिवार्द व मित्रांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला.
रोजचा १०० ते १२५ किलोमीटर प्रवास करायचा ठरला.आमच्याकडे आतासारख्या अद्ययावत गिअरच्या सायकली नव्ह्त्या.आतासारखे त्यावेळी गुळगुळीत रस्ते नव्हते. सायकल प्रवासात चांगलाच कस लागायचा. आम्हाला जास्त सायकल प्रवास करुन जमणार नव्ह्ते. अकरा दिवस उत्साह टिकवायचा होता. आम्ही रात्रीचा प्रवास मात्र टाळायचो. आता एवढी रस्त्यांवर वाहतुक नसल्याने आम्हाला त्रास कमी झाला होता. मोबाईल नसल्याने नजरेच्या टप्यात राहून सायकल हाकावी लागत होती.रोलचा कॅमेरा घेऊन गेलो होतो.आमचा सगळा संसार सायकलवर असायचा. प्रवासात पोलिसस्टेशन, देवस्थानाच्या धर्मशाळा, मंदीर, शाळेत कोठेही राहायचो.एकदा तर पोलिस स्टेशनमध्ये चोरांच्या बॅ-याक मध्ये रात्र काढली. सुरक्षित ठिकाणी राहायचो. थंडी असल्याने सकाळी प्रवासाला सुरुवात थोडी उशिरा होत असे पण दिवसभर प्रवास सुरु असायचा.कालवे व नद्यांवर आंधोळ करायचो.खाणे बाहेर असायचे.फळ जास्त खात असू.चौघंच असल्याने प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पुर्ण व्हायचा.विश्रांतीला वेळ मिळायचा.देवळातून सकाळची आरती करून निघायचो तर कधी सांज आरतीला मंदीरात असायचो.मंदीरात आतासारखी त्यावेळी गर्दी नसायची.गणपतीबाप्पांच्या सानिध्यात आम्हाला राहता आले.पुजा-यांना आमच्या साहसाची माहीती कळल्यावर आम्हाला आशिवार्द व प्रसाद मिळायचा.आमचा हा सायकल प्रवास पाहून आमचे कौतुक व्हायचे.काहीजण भेटी देत होते.लहानमुलं मागे पळत यायची.आम्हाला पाहिल्यावर बाजुने वेगाने जणा-या गाड्यांचे वेग कमी व्हायचे.त्यावेळी असली साहसं नवीन वाटायची.
मोरगावचे मयुरेश्वर,थेऊरचे चिंतामणी,सिद्धटेकचे सिद्धिविनायक,रांजणगावचे महागणपती,ओझरचा विघ्नहर,लेण्याद्रीचा गिरीजात्मज, महडचा वरदविनायक व पालीचा बल्लाळेश्वर यांचे आमच्या सफारीला आशिवार्द लाभल्याने आमची सायकल सफर व्यवस्थित पार पडणार याची खात्री होती. पाली, महड, पुणे, जेजुरी, थेउर, मोरगाव, सिध्दटेक, ओझर, लेण्याद्री, राजंनगाव येथुन खंडाळामार्गे पुन्हा मुंबई असा नऊ दिवसातच सायकल प्रवास पूर्ण करुन घरी सुखरुप पोहचलो होतो. आम्हाला शॉर्ट कट मिळाल्याने आमची यात्रा आम्हाला तीन दिवस लवकर पूर्ण करता आली. पुर्वतयारी चांगली केल्यामुळे प्रवास सुरळीत व कमी त्रासाचा झाला.रोजच्या प्रवासाची माहीती रोज घरी कळवायच्या अटीवरच सफारीला जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे आम्ही घरच्याबरोवर रोज संपर्कात होतो.त्यावेळी पब्लिक फोनने घरची मंडळीशी संपर्क असल्याने ती मंडळी निर्धास्त होती. यात्रा पूर्ण करुउन आल्यावर मित्रांनी जंगी स्वागत केले. एका साप्ताहिकामध्ये आमच्या चौघांची मुलाखत प्रसिध्द झाली होती. ही आमची सफर एकदम स्मरणीय ठरली.
अष्टविनायकांनी आमच्या सारख्या आगळ्यावेगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण केली.
Tuesday, May 18, 2021
बदामी
बदामी, मंदीरांचे शहर
’हंपी’ पाहून झाल्यावर ’बदामी’ ला भेट दिलीच पाहिजे. ’हंपी’हून ’बदामी’ला जाताना रस्त्यात ’ऐहोले’ व ’पट्टडकल’ ही सुंदर ठिकाण लागतात. ही दोन्ही ठिकाणं पाहूनच बदामी शहरात पोहचावे. बदामी, पट्टदकल व ऐहोळे या तीन ठिकाणी चालुक्यांनी बांधलेली मंदिरे व गुंफा आजही पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरल्या आहेत. प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे.बदामीत जैन, बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळतो.
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातला बदामी हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा एक भाग आहे.हे भारतातील पारंपारिक मंदिर वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.’बदामी’ आपल्या समृद्ध इतिहास आणि प्राचीन वास्तुकलासाठी प्रसिध्द आहे. बदामी सुरुवातीच्या चालुक्य राज्याची प्राचीन राजधानी होती. चालुक्यांनी स्थापत्यकलेच्या एका अद्वितीय शैलीचा पाया रचला, जो उत्तर भारतीय नगारा शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैलीतील स्थापत्यशैलीचे उत्तम मिश्रण आहे. भारत सरकारने बदामीला भारतातील एक हेरिटेज शहर म्हणून घोषित केले आहे.
बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदीरं आहेत.एकेक मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. बदामीमध्ये शैव,वैष्णव आणि बौध्द धर्माच्या परंपराचे दर्शन घडवणा-या गुंफा आहेत.नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती,अर्धनारी नटेश्वराचं शिल्प,हरीहर,महिषासूरमर्दीनी,विष्णूचे दशावतार,पद्नपाणी बुध्दाचे शिल्प. डोळ्यांचे पारणे फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत.लाल वालुकाश्मामध्ये या सा-या गुंफा खोदून काढलेल्या आहेत. बदामी येथील गुहेतील शिल्पे आपल्याला अनोख्या विश्वात घेऊन जातात
लाल लाल दगडांचे डोंगर फोडून एकाच कातळात कोरलेल्या ह्या लेण्या बघायला लांबून पर्यटक येतात. मुख मंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेली मंदिरे इथे लेण्यांच्या आतमध्ये कोरलेली दिसून येतात.पहिली लेणी शिव मंदिर आहे. येथील शिवतांडव हे कोरीव शिल्प शिवाचे नटराज रूप दर्शवते. त्या बाजूला गणेश आणि नंदीचेही दर्शन होते.त्याच मंदिरात महिषासुरमर्दिनीचे शिल्प आणि मोरावर स्वार असलेले कार्तिकेय भगवंताचे शिल्प देखील आढळून येते. यक्ष आणि अप्सरांची कोरीव शिल्प लक्ष वेधून घेतात.दुसरी आणि तिसरी लेणी विष्णू मंदिर आहे. येथे विष्णूच्या अवतारातील वामन, वराह इत्यादी कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. विष्णुपुरणातील प्रसंग देखील कोरलेले दिसून येतात.तर चौथी लेणी जैन मंदिर आहे. जिथे पार्श्वनाथ, महावीर आणि बाहुबलीची शिल्पे आढळून येतात. बदामी लेण्यांजवळ असलेले अगस्त्य तीर्थ ह्या तळ्याकाठी बांधलेले भूतनाथ मंदिर देखील आवर्जून पाहण्यासारखे आहे. तलावाच्या बाजुला संग्रहालय असून तेथून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.बदामी किल्ला बदामी लेण्यांच्या अगदी अगदी समोर आहे. किल्ला पाहण्यासारखा असून तेथून बदामी शहर पाहता येते. गिर्यारोहणासाठी चांगली जागा आहे.
बनशंकरी देवी मंदिर, हे मंदिर बदामीपासून जवळ चोलचगुड येथे आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण या ग्रंथातील कथेप्रमाणे स्थानिक लोकांना त्रास देणाऱ्या असुराला बनशंकरीच्या रूपात पार्वतीने ठार केले व शांतता प्रस्थापित केली.महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. येथे मोठा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. अतिशय जागृत देवस्थान असलेल्या बनशंकरी मातेचे पवित्र दर्शन आपल्याला नक्कीच सुखावते.
बदामीपासून ३२ किमी अंतरावर असलेले ’ऐहोळे’ येथे प्रामुख्याने लाडखान मंदिर, हुचप्पायगुडी मंदिर, दुर्गा मंदिर, मेगुति जैन मंदिर, रावणपडी गुंफा मंदिर, गौडा मंदिर, सूर्यनारायण मंदिर व संग्रहालय आणि कलादालन बघण्यासारखे आहे. ऐहोळे ही चालुक्यांची पहिली राजधानी होती. किल्ल्याच्या तटबंदीसारखे असलेले दुर्गमंदिर (दुर्गा मंदिर) हे ऐहोळे येथील एक मुख्य आकर्षण आहे. मंदिरसमूहात वेगवेगळ्या देवदेवतांची सुंदर मंदीर आहेत.ऐहोळे नावाच्या गावात, तिकडची मंदिरं, संग्रहालय पाहून आपण काहीतरी खूप छान पाहत आहोत याचा अनुभव प्रत्येक क्षणाला येत असतो.
बदामीपासून २२ किमी अंतरावर असलेले ’पट्टदकल’ हे एक मोठा ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटनस्थळ आहे. कलेच्या इतिहासकारांची ’पट्टदकल’ ही स्वप्ननगरी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सोपस्कारानुसार तिकिटे खरेदी करून आम्ही त्या संकुलात प्रवेश केला. संकुलात प्रवेश केल्या केल्या दुतर्फा तीन-चारशे मीटर लांबीच्या हिरव्यागार गालिच्याने आच्छादलेला परिसर नजरेत भरतो. त्याच विस्तीर्ण प्रांगणावर सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यान उभारल्या गेलेली दहा मंदिर पहावयास मिळतात. भारतातील विविध शैलीतील मंदिरांचा समूह येथे पाहण्यास मिळतो. यातील चार मंदिरे दाक्षिणात्य पद्धतीची, तर चार मंदिरे उत्तर भारतीय नागरशैलीतील आहेत. पापनाथ मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गळगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वीरुपाक्षझा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ही मंदिरे येथे आहेत. दगडातील ही सुंदर मंदिरे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रचिती येते.
पट्टडकल, ऐहोले आणि बदामी येतील सगळी हिंदू मंदिरे द्राविडी स्थापत्य पद्धतीने बांधण्यात आली आहेत. काळाच्या ओघात आणि परकीयांच्या आक्रमणात मंदिरांची नासधूस झालेली असली तरी सुंदर कलाकुसर, कोरीव शिल्प तिथे अजूनही बघायला मिळतात.
Sunday, April 18, 2021
हरीहर गडाची सफर
वैभवसंपन्न हम्पी
वैभवसंपन्न हंपी
पौराणिक खुणा जपणारं, देशोविदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारं हंपी शहर. हंपी इतकं सुंदर आहे की तिथल राहाणीमान,तिथलं वातावरण ,तिथली संस्कृती ,तिथला सुर्योदय,तिथला सुर्यास्त व तिथल्या सावल्यांचा खेळ हा वेगळाच व हवाहवासा वाटणारा आहे. देशातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपले पाहिजेत. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर, एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.येथे स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना पाहता येतो. ऐतिहासिक महत्व तसेच पौराणिक कथांची परंपराही या शहाराला लाभलेली आहे. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे.
हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. कर्नाटकात १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेले हंपी जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावून आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते.हंपीतील दगड व शिलांमध्ये सौंदर्य तिथे गेल्यावर अनुभवता येते. वर्षानुवर्ष या वस्तू जशाच्या तशा अवस्थेत आहेत,ही निर्सगाची अभ्दूत किमया हंपीत अनुभवायाला मिळते.वर्तमान व भूतकाल या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन झंपी आजही उभं आहे,हेच हंपीचं वैशिष्ट्य. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे.
हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच.
विठ्ठल मंदिर हे हंपीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत.विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे.
कमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास उलगडत जातो. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसहित मांडलेली पाहून संस्कृती पाहता येते.
कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत.
हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे.
नरसिंह, हा विष्णूचाच अवतार असल्याने वैष्णवांमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. सात नागाच्या फण्याने आच्छादित केलेल्या या मूर्तीच्या मांडीवर पूर्वी लक्ष्मी बसलेली होती. म्हणून लक्ष्मी-नरसिंह असेही संबोधले जायचे.
लक्ष्मी-नरसिंह मूर्तीजवळ नऊ फूट उंचीचे शिवलिंग आहे. एकाच काळ्या पाषाणात हे शिवलिंग कोरलेले आहे. हे पाण्यात असून बडवीलिंग मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
हजारा राम मंदिर हे हम्पीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विजयनगर शैलीतील हे देखणे मंदिर असून, यामध्ये रामायणाचे प्रसंग कोरलेले आढळून येतात.
महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल ,ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र.
तुंगभद्रा नदीवरील मोठे धरण असून, धरणाच्या पायथ्याशी वृंदावनची छोटी आवृत्ती असलेला बगीचा आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच टेकड्यांवरून धरणाचे विहंगम दृश्य पाहता येते.
हंपी एक असं शहर आहे जे अतुलनीय सौंदर्य, ऐतिहासिक वैभव, भारतातल्या एका समृद्ध हिंदू राजेशाहीच्या खुणा आणि तिचा भयाण शेवट हे सगळं एकत्र घेऊनच जगतं. वर्तमानात राहून ऐतिहासिक चव असलेलं हे शहराला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच. पण हंपीचे सौंदर्य पाहण्यासाठी वेळ काढून जायाला पाहिजे.

















